Tuesday, June 23, 2026

Minister Mangal Prabhat Lodha : किंग एडवर्डची तुलना थेट 'कसाब'शी; केईएम रुग्णालय नामांतरावरून विधान परिषदेत खडाजंगी!

Minister Mangal Prabhat Lodha : किंग एडवर्डची तुलना थेट 'कसाब'शी; केईएम रुग्णालय नामांतरावरून विधान परिषदेत खडाजंगी!

'गुलामगिरीचे प्रतीक' हटवण्यावर सरकार ठाम : मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : विधानपरिषदेत आज केईएम (KEM) रुग्णालयाच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजला. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. ब्रिटिश सत्ताकाळ हा भारताच्या पिळवणुकीचा आणि शोषणाचा काळ होता, असे नमूद करत त्यांनी 'किंग एडवर्ड' या नावाला तीव्र विरोध दर्शवला. "किंग एडवर्ड हे भारताच्या गौरवाचे प्रतीक नसून ती गुलामगिरीची आठवण आहे. या काळात देशाला लुटून संपत्ती इंग्लंडला नेण्यात आली, त्यामुळे अशा व्यक्तीचे नाव आजही आपल्या रुग्णालयाला असणे चुकीचे आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.

नामांतराचा मार्ग मोकळा

मंत्री लोढा यांनी किंग एडवर्ड यांच्यावर कठोर शब्दांत टीका करत त्यांची तुलना थेट दहशतवादी कसाबशी केली. "ज्याप्रमाणे कसाबने निष्पाप लोकांचा जीव घेतला, तसेच किंग एडवर्डच्या धोरणांमुळे लाखो भारतीयांचे बळी गेले आहेत. अशा व्यक्तीच्या नावाचे समर्थन करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो," असे ते म्हणाले. प्रशासनाच्या वतीने नामांतरासाठी तीन नावांचे पर्याय देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यातील कोणतेही नवीन नाव स्वीकारले तरी त्याचे संक्षिप्त रूप 'केईएम' (KEM) असेच राहील, जेणेकरून रुग्णालयाची मूळ ओळख कायम राहील आणि ऐतिहासिक वारसा बदलण्याची प्रक्रियाही पूर्ण होईल, असे लोढा यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प टॉवर आणि व्यक्तिगत वादावर लोढांची रोखठोक प्रतिक्रिया

या चर्चेदरम्यान विरोधकांनी ट्रम्प टॉवरच्या नामांतराबाबत प्रश्न उपस्थित केला असता, मंत्री लोढा (Mangal Prabhat lodha) यांनी तत्काळ खुलासा केला. ट्रम्प टॉवरचे नाव हे पूर्णपणे व्यावसायिक भागीदारीचा भाग असून त्याचा भारताच्या गौरवाशी किंवा इतिहासाशी कोणताही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळेस विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी लोढा यांच्या व्यवसायावर टीका करण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर देताना लोढा म्हणाले, "माझा व्यवसाय काय आहे आणि माझ्या उत्पन्नाचे स्रोत काय आहेत, हे संपूर्ण जगाला माहित आहे. तुम्ही मात्र जनतेला हे कधीच सांगत नाही. तरीही तुम्ही माझ्यापेक्षा महागड्या आणि मोठ्या गाड्यांमधून फिरता, मग तुमचा मूळ व्यवसाय नक्की काय आहे, हे तरी जनतेला कळू द्या," अशा शब्दांत त्यांनी नार्वेकर यांना आरसा दाखवला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >