सहकार, साखर आणि सत्ता समीकरणे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इचलकरंजी दौरा सहकाराच्या चौकटीपलीकडे जात पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांचा संकेत देणारा ठरला. सहकार, साखर आणि वस्त्रोद्योगाच्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दौऱ्यातून भाजपने सहकार क्षेत्रातील आपली पकड मजबूत करण्याचा संदेश दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.


केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांचा नुकताच झालेला इचलकरंजी दौरा हा केवळ एका सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनापुरता किंवा कारखान्याच्या नामविस्ताराच्या कार्यक्रमापुरता मर्यादित राहिला नाही. दौऱ्यापूर्वी या भेटीकडे सहकार क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, साखर उद्योगाच्या अपेक्षा आणि वस्त्रोद्योगाला मिळू शकणाऱ्या संभाव्य दिलाशाच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात होते. मात्र, कार्यक्रमानंतर शहा यांच्या भाषणातील मुद्दे आणि त्यातून देण्यात आलेल्या राजकीय संदेशामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. इचलकरंजी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन मुख्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त राज्यभरातील नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी, साखर कारखान्यांचे पदाधिकारी तसेच भाजपचे नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले.



या निमित्ताने शहरी सहकारी बँकांच्या संचालकांच्या कार्यकाळावरील निर्बंध, डिजिटलायझेशन, सायबर सुरक्षा आणि नियामक अडचणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, शाह यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित राहिला नाही. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणावर भाष्य करतानाच त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, घुसखोरी आणि विरोधी पक्षांच्या राजकारणावरही थेट भूमिका मांडली. "भारत ही काही धर्मशाळा नाही," असे म्हणत त्यांनी काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अधिक तीव्र शब्दांत टीका केली.या वक्तव्याचे राजकीय विश्लेषण करताना एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे आवश्यक ठरते. पश्चिम महाराष्ट्र हा राज्याच्या राजकारणात नेहमीच प्रभावशाली प्रदेश राहिला असून, विशेषतः सहकार चळवळीचा तो पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो.



साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी पतसंस्था आणि विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून येथील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेची घडी अनेक दशकांपासून बसलेली आहे. या सहकार व्यवस्थेवर दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी संबंधित नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपने सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकारी संस्थांमध्ये अधिक सक्रिय सहभाग वाढवणे, नव्या नेतृत्वाला संधी देणे आणि पारंपरिक राजकीय समीकरणांना आव्हान देण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील हालचालींना सध्या विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. इचलकरंजीची निवडही याच व्यापक राजकीय रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या या शहराचा सहकार क्षेत्राशीही मोठा संबंध आहे.



इचलकरंजीतून दिलेला राजकीय संदेश केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित राहत नाही, तर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांपर्यंत त्याचा प्रभाव जाणवू शकतो. त्यामुळे या भागातील राजकीय पकड मजबूत करण्यासाठी भाजपकडून या दौऱ्याकडे संघटनात्मक विस्ताराची संधी म्हणून पाहिले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच भविष्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात स्थान निर्माण करणे हे भाजपच्या राजकीय अजेंड्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे दिसते. पारंपरिक सहकार राजकारणातील बदल, नव्या राजकीय समीकरणांची निर्मिती आणि ग्रामीण भागातील संघटन वाढवण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.



दुसरीकडे, सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष या दौऱ्यातून काही ठोस निर्णय आणि तातडीच्या उपाययोजनांकडे लागले होते. पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या सहकार क्षेत्रासाठी साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणारी मदत, ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सहकारी बँकांसमोरील नियामक व आर्थिक अडचणी, तसेच डिजिटल सुविधांचा विस्तार यासंदर्भात सकारात्मक घोषणा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, दौऱ्यात मांडलेल्या विचारांमध्ये सहकार क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात व्यापक धोरणात्मक भूमिका दिसून आली असली तरी, प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने तातडीच्या निर्णयांची अपेक्षा असलेल्या घटकांना काही प्रमाणात निराशा जाणवली. सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या रोजच्या अडचणी, शेतकरी आणि कारखानदारांसमोरील आर्थिक प्रश्न, तसेच सहकारी बँकांच्या कामकाजातील अडथळ्यांवर ठोस घोषणा न झाल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी दौऱ्याचे राजकीय आणि सामाजिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.



दौऱ्यापूर्वी सहकार, उद्योग आणि विकास हे प्रमुख मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते; मात्र दौऱ्यानंतर राजकीय संदेश, विचारधारा आणि सहकाराच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या नव्या समीकरणांवर अधिक चर्चा सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर दीर्घकाळ प्रभाव असलेल्या पारंपरिक राजकीय नेतृत्वाला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका आणि स्थानिक नेतृत्व यांच्यामध्ये नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्याची रणनीती या दौऱ्यातून अधिक स्पष्ट झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भाजपकडून सहकार क्षेत्राला केवळ आर्थिक किंवा प्रशासकीय विषय म्हणून न पाहता, त्याला राजकीय विस्ताराचे माध्यम म्हणून वापरण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसून येते. मात्र, हा प्रयत्न प्रत्यक्षात कितपत यशस्वी होईल, हे आगामी काळात सहकारी संस्थांमधील निर्णय, स्थानिक नेतृत्वाची भूमिका आणि शेतकरी वर्गाचा प्रतिसाद यावर अवलंबून राहणार आहे. एकूणच, इचलकरंजी दौरा हा केवळ एका नेत्याचा कार्यक्रम न राहता पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि राजकारणाच्या बदलत्या प्रवाहाचा संकेत देणारा ठरला आहे. आता खरी परीक्षा ही असेल की, या दौऱ्यातून दिलेला संदेश केवळ भाषणांपुरता मर्यादित राहतो की सहकार क्षेत्रात प्रत्यक्ष धोरणात्मक बदल घडवून आणत नव्या राजकीय आणि आर्थिक अध्यायाची सुरुवात करतो.

Comments
Add Comment

अस्थिरतेचे नवे आव्हान

मध्यपूर्वेतील इतिहासाने वारंवार दाखवून दिले आहे, की हिंसेतून टिकाऊ समाधान मिळत नाही. शस्त्रांपेक्षा संवाद,

परीक्षेचा क्षण

यंदाचा मान्सून अद्यापही अनिश्चिततेच्या सावटाखाली आहे. कमी पावसामुळे शेती, जलसाठे आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम

BEST Bus Strike : बस थांबल्या, प्रश्न उभे राहिले!

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट सेवेसमोर संपाचे संकट उभे ठाकले आहे. संप किती काळ चालेल हे स्पष्ट नसून, प्रशासन

मृग नक्षत्र लांबले, कोकण कोरडे पडले!

हिरवाई, पाऊस आणि निसर्गाच्या लयीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणावर यंदा बदलत्या हवामानाची छाया गडद झाली. पावसाची

India-US Relations : तणावात मैत्री

भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी-७

शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

४४ दिवसांच्या उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ‘शाळा प्रवेशोत्सव’च्या