Nashik Simhastha Kumbh Mela 2027 : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, साधू-महंत, आखाडे, कुंभमेळा प्राधिकरण आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यासाठी रामेश्वर नाईक यांची ‘समन्वयक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाकडून याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय मुंबई येथून २२ जून २०२६ रोजी काढण्यात आलेल्या कार्यालयीन आदेशानुसार, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन यशस्वी व्हावे, यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
कुंभमेळ्याच्या यशस्वितेमध्ये साधू-महंत आणि आखाड्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामुळे कुंभमेळा प्राधिकरण, स्थानिक प्रशासन, राज्य शासन आणि साधू-महंत यांच्यात सुसंवाद राखणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक यांच्याकडे कुंभमेळा आयोजनाचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहेत. नाईक यांच्यावर आता साधू-महंत, आखाडे आणि विविध शासकीय यंत्रणांमधील दुवा म्हणून काम करण्याची जबाबदारी असणार आहे.






