Nashik : नवरी निघाली तीन मुलांची आई ! शेतकरी तरुणाची ३ लाखांची फसवणूक; नेमकं काय घडलं ?

Nashik : नाशिक आणि सोलापूर ( Solapur ) जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने हतबल झालेल्या एका शेतकरी तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या महिलेशी तरुणाचा विवाह लावून देण्यात आला, तिचे आधीच लग्न झालेले असून तिला तीन मुले असल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मुख्य संशयित महिलेला अटक (Arrest) करण्यात आली आहे.



नेमकं काय घडलं ?


गेल्या काही वर्षात शेतकरी कुटुंबातील (Farmer family) शेतकरी असलेल्या मुलांना मुलगी भेटणे कठीण झाले आहे. मुलीकडील अपेक्षा वाढल्याने अनेक गावांमध्ये शेतकरी मुलं लग्नाचे वय उलटूनही अविवाहितच राहत आहेत. लग्नासाठी कुठे मोर्चे तर कुठे तरुणाच्या आत्महत्या होत आहेत. अशाच परिस्थितीचा फायदा घेत काही टोळ्या सक्रिय झाल्या असून लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.


सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ (Mohol) तालुक्यातील नरखेड येथे अशीच एक घटना घडली. २४ वर्षीय विशाल धावणे हा तरुण शेतकरी असून त्याच्यासाठी वधू शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. यादरम्यान त्याची सोलापूरमधील एका दलालाशी ओळख झाली. या दलालाने नाशिकमधील दुसऱ्या एजंटशी संपर्क साधत विशालसाठी मुलगी मिळाल्याचे सांगितले. मात्र, या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठा कट रचण्यात आला होता. याची कल्पना तरुणाला नव्हती. धक्कादायक म्हणजे संबंधित महिला आधीच विवाहित असतानाही ती अविवाहित असल्याचा बनाव रचण्यात आला. विशालला विश्वासात घेत लग्न ठरविण्याचे नाटक करण्यात आले. त्यासाठी दलालांकडून पैशांचीही मागणी करण्यात आली.



नवरी गायब , नवरदेव हतबल


पोलिसांच्या माहितीनुसार, या व्यवहारात एका संशयित दलालास ५० हजार रुपये देण्याचे तर कथित वधूच्या वडिलांच्या भूमिकेत असलेल्या संशयितास तब्बल २ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. लग्नाच्या आशेने विशालने ही रक्कम दिली. त्यानंतर ७ जून रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यातील कसबे वणी येथील एका मंदिरात मोठ्या थाटामाटात विवाह सोहळाही पार पडला. लग्न झाल्यानंतर विशाल आणि त्याचे नातेवाईक नव्या संसाराची स्वप्ने पाहत नववधूसोबत वाहनाने रवाना झाले. मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक वाहन थांबवण्यात आले. त्यावेळी एका संशयिताने नवरीला गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. काही क्षणांतच ती महिला रहस्यमयरीत्या गायब झाली.


अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विशाल आणि त्याच्या कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी महिलेचा शोध घेत चौकशी सुरू केली. मात्र, चौकशीदरम्यान समोर आलेली माहिती ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या महिलेशी विवाह लावून देण्यात आला होता, ती आधीच विवाहित असून तिला तीन मुले असल्याचे समोर आले. आपण मोठ्या फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचे विशालच्या लक्षात आले.



वणी पोलिसांकडून तपास सुरु


इतकंच नाही, तर महिलेकडील मंडळींकडून धोका असल्याची भीतीही त्यांना वाटू लागली. त्यामुळे तेथून निघण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी एका विनाक्रमांकाच्या मोटारीने त्यांच्या वाहनाचा पाठलाग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी, पंचवटी तसेच सोलापूर जिल्ह्यातील नरखेड आणि मोहोळ परिसरात घडला. फसवणूक झाल्यानंतर विशाल धावणे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र घटनास्थळ वणी पोलीस ठाण्याच्या (Wani Police Station) हद्दीत येत असल्याने हा गुन्हा वणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.



आधी चौकशी मगच लग्नाची बोलणी करा


या प्रकरणी वणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये विनाक्रमांकाच्या वाहनातील संशयित, बापू अंधारे, नाशिकमधील काही संशयित, अज्ञात दलाल, तीन महिला आणि अन्य दोन जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या टोळीतील मुख्य संशयित महिलेला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, ही टोळी याच पद्धतीने आणखी कित्येक तरुणांची फसवणूक करत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लग्न जुळवताना अशा दलालांपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात