- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील
शिवम आपल्या मित्रांच्या शंका आनंदाने सोडवत होता.
“आम्ही पाताळ नदी किंवा गुप्त नदीबद्दलही ऐकले आहे. अशी गुप्त नदी कशी निर्माण होते?” कैवल्यने प्रश्न केला.
“सहसा नद्या ह्या जमिनीवरूनच वाहत असतात. पण एखाद्या ठिकाणी जर जमीन आरपार खूप खोलपर्यंत खूपच नरम व भुसभुशीत असली तर पावसाचे पाणी अगदी सहजपणे भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी जमिनीच्या आत झिरपत जाते. त्यावर पुन्हा वरून सतत येणाऱ्या पाण्याचा नेहमी दाब पडत जातो. त्यामुळे हे पाणी जमिनीच्या पोटातून नदीच्या रूपात वाहू लागते. त्या नदीलाच पाताळ नदी किंवा गुप्त नदी असे म्हणतात. आपल्या पुराणात आपल्या भारतातील सरस्वती या गुप्त नदीचा उल्लेख आढळतो. आता तर भूगर्भशास्त्रज्ञांनी तिचा मार्गही शोधून काढला आहे. तसेच इंग्लंड व फ्रान्स देशातही अशा नद्या आहेत.”
“आपल्या शेतातील इतक्या खोल विहिरींना पाणी कोठून येते गड्या?” कुशलने विचारले.
“जमिनीतील पाण्याचा शोध घेण्यासाठी पाणी लागेपर्यंत खोदलेला गोलाकार खड्डा बांधला म्हणजे त्याला विहीर म्हणतात. पाण्याचे प्रवाह हे जसे जमिनीवरून वाहतात तसेच ते जमिनीतूनही वाहतात. जमिनीवरून वाहणाऱ्या प्रवाहांना दृश्य प्रवाह म्हणतात, तर जमिनीखालून वाहणाऱ्या प्रवाहांना अदृश्य प्रवाह म्हणतात. या अदृश्य प्रवाहांनीच विहिरींना पाणी येते.” शिवमने सांगितले.
“आता पाणी कुणीकडे वाहते हे आपणा साऱ्यांना माहीतच आहे.” शिवमने मुद्दामहून प्रश्नार्थक चेंडू टाकला.
“अर्थातच! चढ व उंच भागाकडून उताराकडे.” सर्व एकसुरात बोलले.
“गड्या, पृथ्वीवर तलाव, सरोवरे कसे काय निर्माण झालेत?” कपिलने प्रश्न केला.
“जेव्हा पाणी एखाद्या नैसर्गिक खळग्यात जमा होते तेव्हा त्याला तळे किंवा तलाव म्हणतात, तर मोठ्या व खोल तलावाला सरोवर म्हणतात. पृथ्वी गोठताना तिचा काही भाग सपाट झाला, तर काही ठिकाणी डोंगरदऱ्या निर्माण झाल्यात. त्याचप्रकारे पृथ्वीवर काही ठिकाणी दऱ्यांपेक्षाही अतिशय खोल व आकाराने खूप विशाल असे मोठमोठे खड्डेही पडलेत. म्हणूनच पृथ्वीवरील सर्व नद्या त्या खोल खड्ड्यांकडे वाहू लागल्या व त्यांचे पाणी त्या लहान-मोठ्या खड्ड्यांमध्ये साचून त्यांचे तळे किंवा तलाव बनलेत. तळे किंवा तलाव भरल्यानंतर नद्यांचे पाणी तलावाबाहेर पडून पुढे पुन्हा नदीच्या रूपात वाहू लागले. तसेच पावसाचे पाणीसुद्धा काही स्वतंत्र लहान खळग्यांमध्ये साचून त्यांचेही तळे व तलाव बनलेत. आपणा सर्वांना शेततळ्याविषयी तर माहिती आहेच.” शिवमने विचारले. “हो. आपण सारी शेतकऱ्यांचीच तर मुले आहोत. आजकाल कृत्रिम खड्डा तयार करून त्यात पावसाचे पाणी साठवून शेततळे तयार करतात.” विपूलने उत्तर दिले.
“बरोबर.” शिवम म्हणाला.
“आपल्या महाराष्ट्रात बुलडाणा जिल्ह्यात लोणारचे सरोवर कसे निर्माण झाले?” कौशलने प्रश्न केला.
शिवम म्हणाला, “आपल्या महाराष्ट्रात बुलडाणा जिल्ह्यात लोणारला जगातील एकमेव असे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. ते बसाल्ट जातीच्या खडकावर आकाशातून खूप वेगाने व जोराने येऊन आदळलेल्या अशनीमुळे पडलेल्या अतिशय खोल खड्ड्यामुळे तयार झालेले आहे. ते समुद्रापासून बरेच दूर असूनही त्याचे पाणी खारे आहे. ते पाणी त्यात आढळणाऱ्या क्षारामुळे खारे झाले आहे. पण त्यात आढळणारा जो क्षार आहे तो नेहमीसारखे मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईड नसून सोडियम कार्बोनेट आहे.” अशीच ज्ञानवर्धक व मनोरंजक प्रश्नोत्तरे करीत त्यांचे आतापर्यंत अशारीतीने त्यांनी आपले भोजन आटोपले. भोजनानंतर तेथेच पुन्हा आराम करीत बसले.