सुंदर चित्र

- कथा; रमेश तांबे


एक होता राजा. त्याने एकदा त्याच्या राज्यात चित्रकारांसाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. जो कोणी चित्रकार सुंदर चित्र काढेल त्याला शंभर सोन्याच्या मोहरा बक्षीस मिळतील. एवढं मोठं बक्षीस म्हटल्यावर राज्यातले अनेक चित्रकार या स्पर्धेत भाग घेण्यास तयार झाले. एका महिन्याच्या आत चित्रे सरकारी कार्यालयात जमा करावी असे सांगण्यात आले. या स्पर्धेची माहिती जनतेला देण्यासाठी अनेक दिवस दवंडी पिटवण्यात आली.


एका महिन्यानंतर चित्रे जमा झाली. ती जवळपास एकशे तीस भरली. राजा स्वतःच चित्रांचं परीक्षण करणार होता. एका मोठ्या प्रशस्त अशा दालनात भिंतीवर सर्वांना नीट दिसतील अशा पद्धतीने चित्रे टांगून ठेवली होती. अनेकांनी सुंदर चित्रे काढली होती. त्या रंगबेरंगी चित्रांनी संपूर्ण दालन अगदी खुलून गेले होते.


मग थोड्या वेळाने राजा स्वतः आपल्या मंत्रिमंडळासह चित्रे पाहण्यासाठी आला. एक एक चित्र बारकाईने पाहत राजा पुढे सरकत होता. राजा स्वतः एक उत्तम चित्रकार होता. त्यामुळे चित्रातले बारकावे, रंगसंगती याची राजाला चांगलीच जाण होती. अनेक चित्रे उत्तम अशा रंगात रंगवली होती. कोणी राजवाडा, कोणी निसर्ग, कुणी सुंदर पक्ष्यांचं, तर कोणी जत्रेचं चित्र रेखाटलं होतं. सर्वांनीच विविध रंगांचा आपल्या चित्रात सढळ हस्ते वापर केला होता. एक एक चित्र पाहत राजा प्रसन्न मुद्रेने पुढे सरकत होता.


राजाची शेवटची दोन-चार चित्रे बघायची राहिली होती. तेवढ्यात एका चित्रासमोर राजा उभा राहिला. ते चित्र पाहताना राजाचा आनंदी चेहरा लगेचच उतरला. कारण पुढचं चित्र पेन्सिलनं काढलेलं होतं. काळा आणि पांढरा या दोन रंगाव्यतिरिक्त दुसरा कोणताही रंग त्या चित्रात नव्हता. कचऱ्याच्या मोठ्या ढिगाऱ्याच्या बाजूला बसून एक कृश आई आपल्या दोन मुलांना खायला भरवते आहे, असे ते करूण दृश्य होते! बाईच्या अंगावर रंग उडालेली, जागोजागी फाटलेली साडी होती, तर मुलांच्या अंगावर कपडेच नव्हते. अनेक दिवस अंघोळ नसल्यामुळे ती मुले अगदी काळीकुट्ट दिसत होती. मुलांच्या डोळ्यांत पाणी होतं आणि हातात कचऱ्यात फेकून दिलेले भाकरीचे तुकडे! ते चित्र पाहून झाल्यावर राजा तेथून तडक महालाच्या दिशेने निघून गेला. चित्रदालनात अनेक चित्रकारदेखील उपस्थित होते. त्यांनाही वाटले, असे घाणेरडे चित्र काढून चित्रकाराने राजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्या कलाकाराला शिक्षा मिळायलाच हवी.


आज बक्षीस समारंभ होता. राजवाड्याचे सभागृह पूर्ण भरले होते. राजा सिंहासनावर बसला होता. प्रधानाने स्पर्धेविषयी दोन शब्द बोलून प्रथम क्रमांकाचे चित्र सर्वांना दाखवले. ते पाहून सारेच आश्चर्यचकित झाले. कारण ते चित्र होते कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर बसलेल्या आई-मुलांचे! केवळ पेन्सिलने काढलेले! चित्रकाराने पुढे यावे असे प्रधानाने सांगताच, मळकी, जागोजागी फाटलेली साडी नेसलेली बाई समोर आली.


तोच राजा सिंहासनावरून उठून उभा राहिला. ती बाई आणि चित्रातली बाई सारखीच दिसत होती. अन् राजाच्या मनात चर्र झालं. आपल्या राज्यात खऱ्या कलावंताला कोणत्या अवस्थेत राहावे लागत आहे, हे पाहून राजाचे डोळे भरून आले. आपण आपल्या जनतेला सुखसोयी देण्यात कुठेतरी कमी पडत आहोत ही सल राजाला बोचू लागली. मग राजाने त्या चित्रकार बाईला सोन्याच्या शंभर मोहरा बक्षीस दिल्या. तिच्या घराची व्यवस्था राजाने स्वतः करून दिली आणि तिच्या कलेचा मोठा सन्मान केला. शेवटी राजा म्हणाला, “सप्तरंगात रंगवले म्हणजे चित्र सुंदर होत नसते, जे चित्र पाहाताक्षणी
मनाला भिडते तेच चित्र खऱ्या अर्थाने सुंदर असते.”

Comments
Add Comment

मोबाईल बंद... आयुष्य बंद?

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ संध्याकाळचे ६ वाजले होते. चहाचा कप डायनिंग टेबलावर ठेवून हातात मोबाईल घेतला.

विहिरींना पाणी कोठून येते

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील शिवम आपल्या मित्रांच्या शंका आनंदाने सोडवत होता. “आम्ही पाताळ नदी किंवा गुप्त

Concentration : कामात एकाग्रता असावी

आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात यश मिळविण्यासाठी अनेक गुणांची आवश्यकता असते. त्यापैकी एकाग्रता हा

संचिताची सुरुवात

जीवन संघीत- सद्गुरु वामनराव पै आम्ही या आधीही अनेकदा आमच्या प्रबोधनातून संचित हा विषय मांडला आहे. किंबहुना

कर्माची रंगधुन

ऋतुराज  केळकर “शिशिर फुंकरीच्या... आठवणीत... सावळ्या देहाच्या शिल्पातील देहशाल... कर्माची रंगधून विदग्ध

तत्त्वज्ञान

आत्मज्ञान-प्राची परचुरे-वैद्य मानवाला स्वतःबद्दल, जगाबद्दल आणि जीवनाच्या अंतिम अर्थाबद्दल प्रश्न पडू लागले,