Friday, June 12, 2026

FDA : पनीर बाजारातून गायब होतंय, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा असाही धसका ?

FDA : पनीर बाजारातून गायब होतंय, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा असाही धसका ?

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळीविरोधात जोरदार कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे बाजारातील भेसळयुक्त पदार्थ आता बाजारातून कमी होण्यास सुरुवात झाली आहे. कालपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांमधील मेन्यू कार्डवर ठळकपणे झळकणारे पनीरचे विविध पदार्थ अचानक अनेक ठिकाणी गायब झाल्याचे चित्र आहे. व्यावसायिकांकडून पनीरचा तुटवडा असल्याचे उत्तर दिले जात असले तरी या घडामोडीमागे केवळ पुरवठ्याची समस्या नसून भेसळीविरोधात वाढलेल्या कारवायांचा प्रभाव असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा धसका ?

अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात विशेष मोहीम हाती घेतल्यानंतर विविध भागांतून बोगस पनीर, कृत्रिम दूध आणि भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर कारवाईच्या घटना समोर आल्या आहेत. तपासणी पथकांनी अनेक ठिकाणी छापे टाकून नमुने जप्त करत प्रयोगशाळांमध्ये त्यांची तपासणी सुरू आहे. काही ठिकाणी संशयास्पद पदार्थांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आता शहरांमध्ये इतरही बऱ्याच दुग्धजन्य पदार्थांची बारमाही विक्री करणारे स्टॉल आधीच्या तुलनेत कमी प्रमाणात दिसत आहेत. काही ठिकाणी हे पदार्थ पूर्णपणे गायब झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, इतके दिवस बाजारात उपलब्ध असलेल्या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

बनावट पनीर, आरोग्याला धोका

तज्ज्ञांच्या मते, दर्जेदार पनीर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुद्ध दुधाची आवश्यकता असते. दूध, वीज, प्रक्रिया आणि वाहतूक खर्चामुळे त्याची निर्मिती तुलनेने महाग ठरते. मात्र, काही भेसळखोरांकडून कृत्रिम घटक, खाद्यतेल, स्टार्च, सिंथेटिक रसायने आणि इतर निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून बनावट पनीरसदृश पदार्थ तयार केल्याचे यापूर्वीच्या कारवायांमधून समोर आले आहे. अशा पदार्थांची निर्मिती कमी खर्चात होत असल्याने त्यांची बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आरोग्य तज्ज्ञांनीही अशा भेसळयुक्त पदार्थांबाबत गंभीर इशारा दिला आहे. निकृष्ट दर्जाचे किंवा रासायनिक घटक मिसळलेले पनीर व दुग्धजन्य पदार्थ नियमित सेवन केल्यास पचनसंस्थेचे विकार, विषबाधा, यकृत आणि मूत्रपिंडांवरील दुष्परिणाम तसेच इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ग्राहकांनी पदार्थ खरेदी करताना दर्जा, स्त्रोत आणि विश्वसनीयता तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >