Tuesday, June 9, 2026

Sameer Bhujbal : भविष्यात मंत्रिपदाचा वरिष्ठांकडून शब्द

Sameer Bhujbal : भविष्यात मंत्रिपदाचा वरिष्ठांकडून शब्द

- राज्यसभा हुकली तरी नाराजी नसल्याचा दावा; मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची आशा

मुंबई : "राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मला मंत्रिपदाची संधी देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ऐनवेळी शपथविधीसाठी वेळ अतिशय कमी पडल्याने ते शक्य झाले नाही. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मला शब्द देण्यात आला असून, आगामी मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाच्या वेळी मला निश्चितपणे संधी दिली जाईल," असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी खासदार समीर भुजबळ यांनी केला आहे. राज्यसभा उमेदवारी हुकल्यानंतर भुजबळ कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चांवर पडदा टाकताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभेच्या जागेवर प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड झाली आहे. या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ इच्छुक होते. स्वतः राज्यसभेत जाऊन आपल्या वाट्याचे राज्यातील कॅबिनेट मंत्रिपद पुतणे समीर भुजबळ यांना मिळावे, यासाठी ते आग्रही होते. मात्र, ही मागणी पूर्ण न झाल्याने छगन भुजबळ यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली होती. 'जो न्याय इतर नेत्यांच्या मुला-बाळांना मिळतो, तोच न्याय माझ्या कुटुंबाला का नाही?' असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर समीर भुजबळ यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना पक्षांतर्गत घडामोडींवर भाष्य केले.
राज्यसभा उमेदवारीबाबत बोलताना समीर भुजबळ म्हणाले, "माझा स्वतःचा राज्यसभेवर जाण्याचा कोणताही विचार नव्हता. मंत्री छगन भुजबळ यांची संसदेत जाऊन काम करण्याची इच्छा आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा त्यांना तशी संधीही चालून आली होती, परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे यंदा त्यांच्या नावाची चर्चा होती, माझी नाही. मी लहानपणापासून राजकारणात सक्रिय आहे. सुरुवातीला शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर १९९९ पासून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. पक्षाचा झेंडा तयार करण्यापासून, चिन्हाची निवड करणे आणि षण्मुखानंद व शिवाजी पार्कवरील ऐतिहासिक सभांचे नियोजन करण्यापर्यंतची सगळी पडद्यामागील कामे मी निष्ठेने केली आहेत. आज २५ वर्षांहून अधिक काळ मी पक्षाशी एकनिष्ठ असल्याने भविष्यात मला संधी मिळण्यात कोणतीही अडचण नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
Comments
Add Comment