- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील
मित्रमंडळींना शिवम आनंदाने माहिती सांगत होता.
“नदीच्या प्रवाहात भोवरे कसे तयार होतात?” मंगलने प्रश्न केला.
“नदीमध्ये निरनिराळ्या दिशांनी पाण्याचे प्रवाह सतत वाहत असतात. एका बिंदूत जाऊन मिळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ते जेव्हा जोराने वाहत येतात तेव्हा त्यांची आपसात टक्कर होते. त्यामुळे एका बिंदूत जाऊन मिळण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला त्यांचाच एकमेकांचा अडथळा येतो व त्या प्रवाहांची सरळ गती अडखळते. त्यात मग एका प्रवाहाचा जोर जास्त व दुसऱ्याचा कमी झाल्यास त्या दोन्ही जोरांची वजाबाकी होऊन कमी जोराच्या बाजूला उलट जास्त जोराने पाणी ढकलले जाते. पण ते सरळ रेषेत न जाता दुसऱ्या प्रवाहाला थोडाफार तरी अडथळा करतेे. त्यामुळे पाणी चक्राकार फिरू लागते. त्यालाच पाण्यातील भोवरा असे म्हणतात.” शिवमने सांगितले.
“या नद्यांचा काय काय उपयोग होतो?” कुणालने शंका काढली.
“नद्यांचा उपयोग माहीत नाही तुम्हाला? धरण म्हणजे काय असते सांगा बरं?” मध्येच यात्रेकरू बोलला.
“नदीतील पाण्याच्या प्रवाहाला थोपविणारा किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा अडथळा म्हणजे धरण. धरण बांधतांना दोन डोंगरांमध्ये त्यांचा दोन नैसर्गिक भिंतीसारखा उपयोग करून व नंतर समोरून आडवी भिंत घालून बांधले जाते. धरण पाण्याचा साठा तयार करते व गरजेनुसार पाण्याचा पुरवठा करते. धरणाने शेतीला योग्य पाणीपुरवठा होतो, जमीन सुपीक बनते, योग्य ठिकाणी धरणे बांधून महापुरांना प्रतिबंध करता येतो, धरणावर वीजनिर्मिती केंद्र बसवता येतात.” शिवमने उत्तर दिले.
“जसे धरण उपयोगी आहे तसेच नदीसुद्धा खूप उपयोगी असते मुलांनो.” यात्रेकरूच सांगू लागला, “ही डोंगरातून खळाळत वाहत येणारी नदी खूप वेगाने वाहते. कधी कधी तिला पूर व महापूरही येतात. ती सोबत डोंगरातील भरपूर गाळ आणते. डोंगरातील खनिजेही आणते. तिच्या प्रवाहात कोठे गाळ साचतो तर कोठे प्रवाहातील एखाद्या मोठ्या खडकाने प्रवाहाला अडथळा येतो. अशा अडसरांनी नदीच्या प्रवाहात वळणे तयार होतात. त्यामुळे आणि पुराचे व महापुराचे पाणी सभोवतीच्या प्रदेशात पसरल्याने नदीसोबत आलेला गाळ आजूबाजूच्या प्रदेशात साचून तो भूभाग सुपीक बनतो. अशा या नद्या मानव जातीसाठी खूप उपयोगी आहेत. नद्यांचे पाणी सर्व प्राणिमात्रांना पिण्यासाठी कामी येते तसेच मानवाला शेतीसाठीही वापरता येते; परंतु महापुराने कधी कधी जीवितहानीही होऊ शकते.”
“आपण नेहमी नदीतील गाळ असे म्हणतो पण हा गाळ म्हणजे काय असते हे माहीत आहे का तुम्हाला?” यात्रेकरूने शंका विचारली.
“हो काका,” शिवम् सांगू लागला.
“पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत आलेल्या; परंतु एकाच ठिकाणी साचलेल्या मातीला गाळ असे म्हणतात. हा गाळ जसा भूभाग सुपीक बनवतो तसाच तो नुकसानकारकही असतो. नदीत जर गाळ जास्त साचला, तर ती उथळ बनते. तसेच हा गाळ सिमेंटसारखे कार्य करतो. तो नदीच्या पात्रातून पाण्याचे जमिनीत होणारे झिरपणे थांबवतो. त्यामुळे नदीतील पाणी भूमिगत प्रवाहांना मिळत नाही व विहिरींकडे वाहत जात नाही. पर्यायाने विहिरींचे पाणी कमी होते. तसेच आजूबाजूची जमीनही तहानलेली राहते नि कोरडी व रुक्ष बनते. तळ्यांमध्येही गाळ साचला तर तेही उथळ बनतात. असा हा भयंकर तोटा होतो.”