संचिताचा जीवनावर प्रभाव

आपल्या प्रबोधनाचा विषय म्हणजेच "अंधारातून प्रकाशाकडे" हा पाहताना, आपण इतरही काही महत्त्वाचे विषय समजावून घेण्याचे प्रयत्न केले. हे विषय म्हणजे संचित, प्रारब्ध, क्रियमाण वगैरे. हे विषय घेण्यामागचे कारण म्हणजे, अजूनही या विषयांबद्दल समाजात खूप अंधश्रद्धा, अज्ञान व गैरसमज आहेत. हे विषय जर नीट समजले, तर सुखी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आपल्या हातात येईल. म्हणून हे विषय समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येकाकडून केला गेला पाहिजे. थोडे चिंतन केले तरी नीट समजेल, इतके हे विषय सोपे आहेत.
संचित व प्रारब्ध या गोष्टींबरोबर, प्रारब्ध व क्रियमाण; प्रारब्ध व क्रियमाण या दोन गोष्टींबरोबर क्रियमाण व नियती, असे आपले आयुष्य चाललेलं आहे. पहिले संचित, नंतर प्रारब्ध.




संचित म्हणजे बँकेत ठेवलेला पैसा! बँकेत जसा पैसा जमा होत असतो, अगदी तसेच आपल्या ठिकाणी पूर्वी जे काही केलेले असते, म्हणजेच जन्मापासून अगदी आत्ताच्या या क्षणापर्यंत जे काही आपल्याकडून केले गेले आहे, ते म्हणजे संचित! काही धर्मशास्त्र असेही सांगतात की, माणूस जन्माला येताना मागच्या जन्माचे संचित घेऊन येत नाही. आमच्या मते हे योग्य नाही. हे सिद्ध करता येणार नाही; मात्र तर्कशास्त्र व अनुभवशास्त्रानुसार आम्ही तसे म्हणतो. याचे कारण, दोन मुले एका वेळेला जन्माला आली तरी एक अव्यंग, तर दुसरा अपंग असतो. एक राजाच्या पोटी, तर दुसरा भिकाऱ्याच्या पोटी. एक मोठ्या अधिकाऱ्याच्या पोटी, तर दुसरा सफाई कामगाराच्या घरी.



प्रत्यक्षात त्या मुलाने जन्म घेताना काही पाप-पुण्य केलेले नसते. जन्माला येते तेच मुळी दारिद्र्यात आणि तसे घडण्यासाठी त्याच्याकडून काहीही कर्म केलेले नसते. यावरूनच तुम्ही असा निष्कर्ष काढू शकता की, संचित नावाचा प्रकार या ठिकाणी आहेच.
एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली चार मुले; चारही वेगळी. एक काळा, एक गोरा, एक बाहेरून काळा आतून गोरा, एक बाहेरून गोरा आतून काळा! एक अध्यापक होतो, दुसरा अभियंता होतो, तिसरा वकील, तर चौथा गुंड होतो. सर्वांना घरचे संस्कार सारखेच; मात्र एकालाच वाईट संगत का मिळते? इतर तिघांना चांगली संगत का मिळाली? कारण, "समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात." ज्याच्या आत वाईट आहे, तो वाईट आकर्षित करतो; तर ज्याच्या आत चांगले आहे, तो चांगले
आकर्षित करतो.




हे सगळे पाहूनच, "वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्यातच सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे," असा सिद्धांत जीवनविद्येने मांडलेला आहे. म्हणूनच, जन्माला ज्या परिस्थितीत आले, त्या परिस्थितीचा स्वीकार करूनच काही मुले स्वतःचे जीवनशिल्प घडवितात. काही ठिकाणी मुलांचे आई-वडील दोघेही मूर्ख, व्यसनी असतात; तर काही ठिकाणी दोघेही हुशार, सज्जन!
आता काही लोक म्हणतील, "ही एक अनपेक्षित घटना आहे. तो एक अपघात किंवा योगायोग आहे." असे म्हटले, तर चोरी करणारा चोरी करतो, हाही एक योगायोगच. तंटेबखेडे करणे, हाही एक योगायोगच. दंगेधोपे होतात, हाही जर योगायोग समजायचा, तर त्यात ना योग्य, ना याग; प्रत्यक्षात जीवनातील दुर्भाग्य!
हे सर्व समजून घेतले, तर संचित हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग प्रत्यक्षात आहेच, हे
लक्षात येईल.


___सद्गुरू वामनराव पै
Comments
Add Comment

आत्मपरीक्षण

आत्मज्ञान - प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनातील सर्वांत गुंतागुंतीचा शोध कोणता, असा प्रश्न विचारला तर त्याचे

एतेषु रूपेषु लक्ष्मीः प्रकट्या

ऋतुराज-ऋतुराज केळकर   ‘घाव बसलं घावावर सोसायला... झुंझायाला... अंगी बळ येऊ दे... आभाळागत माया तुझी आम्हावर राहू

नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी ।।

भारतीय संत-डॉ. अनुराधा कुलकर्णी श्री नामदेवांच्या निरागस व प्रांजल स्वभावाप्रमाणे त्यांचे अभंगही अतिशय

मोक्षाची अनुभूती

ऋतुराज-ऋतुजा केळकर “क्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट कुणी त्यागी जीवन अपुले दु:खं जागी करण्या

विचारांचे सामर्थ्य

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै   तुम्ही कुठेही जा तुमच्या जीवनात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. १. विचार २. जीभ ३.

जीवनाचे मूल्यमापन

आत्मज्ञान-प्राची परचुरे-वैद्य     मानवी जीवन हे केवळ घटनांची मालिका नसून, अनुभवांची, निवडींची, मूल्यांची आणि