Thursday, June 4, 2026

समर्थ रामदास

समर्थ रामदास

राम आकाशीं पाताळी। राम नांदे भूमंडळी। राम योगियांचे मेळी। सर्व काळी शोभतो॥ राम नित्य निरंतरी। राम सबाह्य अंतरी। राम विवेकाचे घरी। भक्तीवरी सांपडे॥ राम भावे ठायींं पडे। राम भक्तांसी सांपडे। राम मीपणें नातुडे। मौन घडे श्रुतींंसी॥ राम योग्यांचे मंडण। राम भक्तांचे भूषण। राम आनंदरक्षण। संरक्षण दासाचें॥

श्रीराम हे समर्थांचे उपास्यदैवत. ते म्हणतात, राम तिन्ही खंडात म्हणजे आकाश, पाताळ आणि भूमंडळ यात व्यापून राहिला आहे. तो पृथीतलावर नांदतो आहे. तो "सबाह्य अंतरी" म्हणजे बाहेर अणुरेणूत सामावला आहे तसाच अंतरंगी वसलेला आहे. राम हे परमशक्तीचे रूप आहे. चैतन्याचे तत्त्व आहे. राम पाहिजे असेल तर चैतन्याचे ठाणे सोडूत विवेके, ज्ञान आणि सत्वशील आचरण हवे. रामनामाचे वर्णन करताना श्रुतीही मौनावतात. राम भकांच्या सुखाची जपणूक करणारा आहे. त्याच्या सेवकांची संरक्षणकर्ता आहे. रामाकडे जाण्याचा सर्वात मोठा अडसर म्हणजे "मी" पणा वा अहंकार. जसजसा अहंकार कमी होतो तसतशी नम्रतेच्या वाटेवरून विवेकाची वाटचाल सुरू होते. रामाचा निवास भक्तीच्या घरी असल्यामुळे श्रद्धा आणि भक्ती यांचा मागोवा घेतला की 'राम' सापडतो. 'राम' नावाच्या निरामय चैतन्यरूप तत्वाच्या आपण अधिकाधिक जवळ जातो.

'राम'तत्वाची जाणीव बाह्य सगुण रूपात जशी होते तशी ती अंतरंगातही होते. राम हे आयुष्याचे सार आहे. म्हणूनच आयुष्य कंटाळवाणे झाले की" आयुष्यात राम नाही 'असे म्हणतात. 'राम' हे आपल्या आतील आत्मतत्वाचेच रूप आहे. कृष्ण, हरि ही रामाचीच चैतव्य वेगवेगळी रूपे आहे. राममय चैतन्य अंगोपांगी सामावले की सकल अरिष्टांचा विनाश होतो. राम हे नाम सर्वांना तारणारे आहे. 'राम' नामाचे वर्णन करताना श्रुतीही मौन होतात. 'राम' या निर्गुण तत्वाने घेतलेले सगुण रूप म्हणजे कौसल्येचा पुत्र रघुकुलटिळक श्रीराम. समर्थ म्हणतात, सगुणाचे आधारे । निर्गुण पाविजे निर्धारे ॥" समर्थांचा 'राम'मय प्रवास सगुणाकडून निर्गुणाकडे होतो.

चारित्र्य, कर्तव्य, धर्मरक्षण है रामचरित्राचे विशेष आहेत. रामभकी काही अंशी मूर्तीच्या रूपात योग्य असते. पण वृथा कर्मकांड, पूजा यांचा अतिरेक झाला की भक्तीचे मूळ तत्वच दिशाहीन होते. रामनामाचे स्मरण हा भक्तीचा सर्वात सोपा मार्ग आहे. रामाच्या नामाने दगड तरून सेतू बांधल्याची कथा आहे. "राम, राम" या उच्चाराने वाल्याचा वाल्मीकी झाला. रामनामाने आपल्या आतील मोहाला 'बळी पडणाऱ्या 'वाला'चा अंत होतो आणि "वाल्मीकी"पणाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. राम'तत्वाचे वर्णन करताना एक कवी म्हणतो, राम कर्तव्याचा वसा, राम कर्तृत्वाचा ठसा राम आनंदनिधान, राम आदर्शाचा पसा

___डॉ. देवीदास पोटे
Comments
Add Comment