Thursday, June 4, 2026

MONSOON : मान्सूनचे केरळमध्ये दमदार आगमन; दक्षिण भारतासह देशातील २४ राज्यांना पावसाचा इशारा

MONSOON : मान्सूनचे केरळमध्ये दमदार आगमन; दक्षिण भारतासह देशातील २४ राज्यांना पावसाचा इशारा

NEW DELHI : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर नैऋत्य मान्सूनने केरळमध्ये अधिकृतपणे धडक दिली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) याबद्दलची अधिकृत घोषणा केली असून, या पावसामुळे दक्षिण भारतातील राज्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनचे आगमन नेहमीच्या १ जूनच्या तारखेपेक्षा चार दिवस उशिराने झाले असले तरी, आता याचा जोर वाढणार आहे.

केरळमध्ये ऑरेंज अलर्ट

मान्सूनच्या आगमनानंतर केरळमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय तिरुवनंतपुरम, कोल्लम, पत्तनमथिट्टा, इडुक्की आणि त्रिशूरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

दक्षिण भारतासह २४ राज्यांत पावसाचा इशारा

पुढील ७ दिवस केरळसह तामिळनाडू आणि कर्नाटकच्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनच्या प्रवासाबाबत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ दक्षिण भारतच नव्हे तर ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणासह देशातील एकूण २४ राज्यांमध्ये पावसाची हजेरी आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मान्सूनचे वेध

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, येत्या २ दिवसांत मान्सून राज्याच्या सीमेवर पोहोचण्याची शक्यता आहे. ६ ते ७ जूनदरम्यान मान्सून तळकोकणात दाखल होईल, त्यानंतर मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित राज्यांत पावसाचे आगमन होईल.

देशभरात कधी पोहोचणार मान्सून?

सध्या उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक राज्ये भीषण उष्णतेचा सामना करत आहेत. मात्र, मान्सूनच्या वाटचालीमुळे लवकरच दिलासा मिळणार आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार:

उत्तर प्रदेश: १५ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन अपेक्षित.

दिल्ली: २५ ते ३० जूनदरम्यान मान्सून राजधानीत पोहोचण्याची शक्यता.

संपूर्ण भारत: ३० जूनपर्यंत मान्सूनचा प्रवास पूर्ण होऊन तो संपूर्ण देशाला व्यापेल.

सध्या गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्राच्या काही भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे कायम आहे. मान्सूनच्या आगमनामुळे या भागांतील उष्णतेची लाट कमी होऊन तापमानात घट होईल, असा विश्वास हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >