Thursday, June 4, 2026

Iran-America-Pakistan : एकीकडे शांतिदूत होण्याचा प्रयत्न दुसरीकडे शत्रूराष्ट्राशी जवळीक; पाकिस्तानने अमेरिकेला इराणबाबत गुप्त माहिती पुरवली?

Iran-America-Pakistan : एकीकडे शांतिदूत होण्याचा प्रयत्न दुसरीकडे शत्रूराष्ट्राशी जवळीक; पाकिस्तानने अमेरिकेला इराणबाबत गुप्त माहिती पुरवली?

मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्धसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याचा दावा करत असला, तरी पडद्यामागून तो इराणची फसवणूक करत असल्याचा आरोप केला जात आहे. एका अहवालानुसार, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित माहिती शेअर केली होती. मात्र, आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्तांचे खंडन केले आहे. (Iran-America-Pakistan)

इशाक डार यांनी २९ मे रोजी वॉशिंग्टन दौऱ्यात मार्को रुबिओ यांची भेट घेतली होती. या बैठकीत द्विपक्षीय सहकार्याबरोबरच प्रादेशिक सुरक्षाविषयक मुद्द्यांवर चर्चा झाली. वृत्तानुसार, अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA) चे माजी विश्लेषक लॅरी जॉन्सन यांनी दावा केला होता की, डार आणि रुबिओ यांच्यातील चर्चेदरम्यान इराण आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी कोणती पावले उचलण्यास तयार आहे, यावर सविस्तर चर्चा झाली होती. या चर्चेमुळे रुबिओ चिंतेत पडल्याचेही त्यांनी म्हटले होते. या प्रकरणावर अमेरिकन संसदेतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. अमेरिकन खासदार स्कॉट पेरी यांनी मार्को रुबिओ यांना विचारले की, इशाक डार यांनी असा संदेश दिला होता का की सध्याचा तणाव कायम राहिल्यास इराण अण्वस्त्र क्षमतेचे प्रदर्शन करण्यास तयार आहे? यावर रुबिओ यांनी उत्तर दिले, “मी असा कोणताही अहवाल पाहिलेला नाही आणि मला अशा कोणत्याही संदेशाची माहिती नाही.” (Iran-America-Pakistan)

दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने गुरुवारी (४ जून २०२६) अशा वृत्तांचे खंडन केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी स्पष्ट केले की, इशाक डार यांनी मार्को रुबिओ यांच्यासोबतच्या बैठकीत इराणच्या अणुकार्यक्रमासंदर्भात कोणतीही माहिती अमेरिकेसोबत शेअर केलेली नव्हती. इशाक डार यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी प्रादेशिक राजनयात पाकिस्तानच्या रचनात्मक भूमिकेचे कौतुक केले होते. तसेच, तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने आपले प्रयत्न सुरू ठेवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. यावर इशाक डार यांनी सध्याचे करार अबाधित ठेवण्यासाठी युद्धविराम कायम राहणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. (Iran-America-Pakistan)

अधिकृत निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी परस्पर संपर्क कायम ठेवण्यावर सहमती दर्शवली. इराण-अमेरिका तणाव तसेच लेबनानशी संबंधित संघर्षांमुळे प्रादेशिक शांतता प्रक्रियेवर दबाव वाढत असताना ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. (Iran-America-Pakistan)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >