- मनस्विनी; पूर्णिमा शिंदे
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पूनीत झालेला जुन्नर तालुका तेथील माझं आजोळ. वडगाव कांदळी, आईचं माहेर. पाच मामा, आजी, आजोबा, मावशी जणू गोकुळ. सृष्टीसौंदर्याने सजलेलं, हिरव्या वनराईने बहरलेलं, सुंदर गाव.
१९८५ मध्ये मामाने गावात पहिला बंगला बांधला. नारायणगडाच्या पायथ्याशी आणि दावण मलिककडे समोर उभे राहावे. सुंदर काव्य सुचणार असं साजेसं वातावरण. माझी प्रतिभा याच मातीत रुजली. ओढ्याकाटी विसावलेलं मामाचं घर, आमराई, मोगरा, जाई जुई, चमेली, रातराणी, सुगंधी, केवडा या फुलांच्या वेलींचं आजूबाजूला कुंपण होतं. थोडसं पुढे गेलं की ओढ्याकाठी थाटात विसरलेला शंभू महादेव. नरवड्याचा मळा आणि महादेवापासून डाव्या बाजूला सडक. सडकेच्या त्या बाजूला रामकृष्ण मामाचं घर. बिरोबाची शांत पायवाट मामाच्या चिकूच्या बागेतून लांबच लांब रस्ता जायचा.
थोडं पुढे गेलं की कुकडी नदीचे सौंदर्य. विलोभनीय, मनाला वेड लावणारं! संधीप्रकाशात केशरी रवी राजा सोबत निसर्गाचं रमणीय दृष्य असणार! हे माझ्या स्मृतीगंधातील माझे आवडते गाव. केशर, जांभूळ मिसळावेत तसं आभाळ. केशरी वीटकरी तांबडी माती. निळ्या पाण्यामध्ये शिवार चमकायचं. क्षितिजावरती सूर्य मावळतीला आल्यावर थांबायचा. तो मुठीत जपावा असा गोड क्षण. सोनेरी आकाश आणि राखाडी क्षितिज उंच उंच हिरवाईत दडलेला रवी राजा. हे सगळं कवितेत बांधणं खूप सोपं व्हायचं. रोज नवनवीन आनंदघन ओथंबून येत. नव्या आशा अंकुरित होत. शेतात कसं अंकुरलं जातं याची एक गोड गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. १० महिने शहरांमध्ये मग १३ एप्रिल सुट्टी पडली की १३ जूनपर्यंत गावी राहायचं. दोन महिने गावचा आस्वाद घ्यायचा. शेतीची कामं शिकलो. तेही गंमतीत आवडीने. खत पांगवायचं. काटे वेचायचे. कुळवणी, नांगरणी, पेरणी काय असते. तोडणी, मळणी, लावणी काही शब्दांचे अर्थ तर तेव्हाच कळले. धान्य टाकायला लागायचे. मोट, कुळव नांगर, थारोळ, वावर, पेंड, वळई, राहाट, काट्याचे फास, गुरांना बांधतात ती चराट, वळचन, बाभळ, काटकुट, मळणी, सगळे शब्द तेव्हा कळायला लागले. विहिरीतून पाणी काढायला शिकलो आणि कसं ओढायचं पोऱ्यामध्ये. बाभळीच्या काट्याच्या फासाचं सरपण तोडायचं कसं! चूल कशी लावायची! बाभळीचे काटे टोचायचे! आणि आजी नको बाई! काट्याकुट्यात जाऊ म्हणायची, पण मी शेळ्या चारायलाही जायची. मला खूप आनंद वाटायचा. मी घर शेणाने सारवायला शिकले. गुरांसाठी घास कापायला. चूल पेटवताना रॉकेल किती टाकायचं? यावरही आप्पाचं लक्ष असायचं! बाई आणि आप्पा अत्यंत प्रेमळ, सात्त्विक, कष्टाळू, अपार माया करणारे. ओरडले तरी पुन्हा लगेच जवळ घेऊन प्रेमाने मायेचा घास भरवणारे खूप जीव लावायचे, पोरीहो काय खायचं? बोला! तोंडातून शब्द आला की दुसऱ्या दिवशी ते हातावर असायचं. पेढा, भेळ, बटाटे वडे, लस्सी, कोंबडीचं, मटणाचं कालवण, आंबे, भेळ, मिसळ, भुईमुगाच्या शेंगा, जांभळं खूप काही आवडीने घेऊन यायचे. आजीला आम्ही सारे बाई म्हणत असू, तिच्या हाताला खूप चव होती. सुगरण. गव्हाचा चीक आणि भरली वांगी, बोंबलाचं कालवण, कैरीचं लोणचं खूप छान करायची ती. फार अविस्मरणीय दिवस होते ते, आमच्या आयुष्यातले.
ही गोष्ट आमच्या मुलांना नाही देऊ शकलो आम्ही. काळाच्या ओघात सुट्ट्या माणुसकी आणि वेळ लोप पावत गेलं. हे धावत्या जगात धावण्यातच आयुष्य गेलं. तेव्हा विसावा होता. तो आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. मोठे होणे म्हणजे काय? तर मोठं होऊन आनंदाला मुकणं इतकंच!! आयुष्यभर जबाबदाऱ्यांचं ओझं. सगळ्याच बेभानपणावर मर्यादा आणि काळजी, जबाबदारीचं ओझं म्हणजे मोठं होणं, मोठेपण आता नकोच वाटतं. पण ते बालपण म्हणजे आनंद, विलक्षण गंमती, खेळकरपणा. अप्पांच्या बैलांची नावे होती मल्हार आणि साहेबराव. दोन्ही बैल दिसायला खूप सुंदर आणि कुत्र्यांची नावे सर्जा आणि राजा. सगळे मामा शिकून मोठे साहेब, मुंबईत कामाच्या ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर होते. पण सणासुदीला लग्नासाठी जत्रेला आम्ही सगळेच एकत्र जमत असू. एरवी बाई अाप्पा दोघेच राहत होते. मदतीला गडी, जोडपी असत. आम्ही गेलो की बाई आप्पांना खूप आनंद व्हायचा. त्यांच्याकडे गडी असायचे. आप्पा बारकाईने गड्यांना काम द्यायचे, दुसऱ्या दिवशी तो गडी काहीतरी चोरी करून पळून गेलेला असायचा! एकदा तर एकाने टिपेतलं धान्य रात्रीतून चोरीला नेलं होतं. इथं पडवीत विसाव्याला होता. तिथून पहाटे कधी गेला कळलंच नाही. जेव्हा आप्पा उठले उजेडलेलं तेव्हा त्यांनी पाहिलं. तर खूप हानी झाली होती. गावचे पाणी आणि गावची माती सोनं उगवायची.“गावची माणसं” प्रेमळ. जेवल्याशिवाय सोडायची नाही. “गावची देवळं” वार्षिक सप्ताह, कीर्तने, पारायण, काला सांप्रदायिक असणारे प्राचीन मंदिर, बिरोबा महाराज. साप चावला या मंदिरात आणून सोडलं की तो माणूस कधीच मृत्यू पावत नाही. बिरोबा हे महादेवाच्या शक्ती, भक्ती श्रद्धेच असतात. खरंच ही आख्यायिका आहे. वर्षातून एकदा या देवाची जत्रा असते. त्या जत्रेला नामांकित लोकांचा तमाशा असायचा. कुस्ती, बैलगाडा शर्यत बघायला लांबून लोक यायचे. सभ्य, सज्जन, शांत असणारे माझे पप्पा सासरवाडीला एकदा जत्रेत बैलगाडी शर्यत बघायला गेले. तेव्हाच एक बैलगाडा शर्यतीचा जोरदार गाडा त्यांच्या अंगावरून गेला. प्रचंड लागले होते. उसाचा रस, भजी, पकोडे, रेवड्या, शेंगोळ्या विशेषत: पेढे. पेढेवाले गेलेच वर्षी मृत पावले पण त्यांच्यासारखा पेढा अखंड जुन्नर तालुक्यात दुर्मीळ.
बिरोबा महाराजांच्या यात्रेला मुंबईकर सगळे आवर्जून जात. सगळ्या माहेरवाशीनी एकत्रित येत. तमाशाच्या दुसऱ्या दिवशी हजेरी असे आणि हजेरीमध्ये काल चमकणाऱ्या गोऱ्या, गोमट्या बायका सकाळी काळ्या कुळकुळीत दिसत असत. नदीच्या काठी मुक्ताई मंदिर. तिथे आवर्जून १०-१५ माणसांमध्ये लग्नं लावली जायची. सत्याईचं मंदिर खूप सुंदर नदीकाठी वसलेले आणि प्राचीन पवित्र मंदिर.
“गावची लग्न” विशेष पर्वणीच.मांडवात मांडी घालून पंगतीत जेवायला बसायचं. सगळ्यात गंमत म्हणजे बुंदी, लापशी, भात भातावरती हुसेन भाईंचं वरण! इतकं सुंदर!! की कधीच खाल्लं नाही असं. सामुदायिक विवाह पद्धती अतिशय मजेशीर आणि अगदी कमी खर्चात सुंदर लग्न पार पाडायचे. आमच्या बाईला सगळी गाणी, जात्यावरल्या ओव्या, लग्नाच्या हळदीची, मांडव डहाळेची गाणी, उखाणे पाठ असत. ती पहाटे उठून सुंदर बोलत असतो. तिचा गळाही गोड खूप होता. ती भावंडांमध्ये थोरली असल्यामुळे तिलाही आनंदाने काम करण्याची सवय, उद्योगी वृत्ती होती. दोनच वेळ गावात ठरलेली एसटी यायची आणि त्या शिरूर गाडीच्या जाण्यायेण्याने अवलंबून आमचं घड्याळ टाईम टेबल असायचं. सहा वाजता पहाटे दूध काढून आप्पा डेरीवर दूध घालून यायचे. संध्याकाळी भोर मळ्यातून वडापाव, दळण घेऊन यायचे.
आता आम्ही गावी जातो पण बाई अप्पा नाही. आता बंगल्याला शोभा नाही. वात्सल्य, आपुलकी मिळायचं ते संपलं. अचानक ओटी शब्द येतात, पहिली माणसं वेगळी होती. शहरी करणांमध्ये गावचं आकर्षण किती असलं तरी प्रपंचामध्ये व्यस्त असल्याने गावी जाणं दुर्मीळ झाले. त्या ओट्यावरल्या गप्पा परसातल्या बागा आणि ओसरी रिकामीच दिसते. आठवणीतलं गाव साठवणीचं झालं. आठवणी जपून पुढल्या पिढीला सांगता येण्यासारख्या.






