पहिले बक्षीस

- कथा; रमेश तांबे


मला आठवतंय मी त्यावेळी साधारण सहावी-सातवीत शिकत असेन. मी महापालिकेच्या शाळेत होतो. आम्ही ज्या ठिकाणी राहायचो ती एक गरीब लोकांची वस्ती होती. मुंबईतले मिल कामगार, छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक अगदी गुण्यागोविंदाने राहायचे. त्या काळी विविध सण आमच्या वस्तीत साजरे व्हायचे. गणपती उत्सव, नवरात्र, दिवाळी, महापूजा. अशा प्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन केले जायचे. मी अशा स्पर्धेत मोठ्या आवडीने भाग घ्यायचो. अन् बक्षिसेदेखील मिळवायचो. हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा अशा विविध स्पर्धा वर्षभर कुठे ना कुठे सुरूच असायच्या. मी आणि माझे दोन-चार मित्र आम्ही आवर्जून अशा स्पर्धेत भाग घ्यायचो. त्यातही निबंध स्पर्धा मला विशेष आवडायची. त्यावेळी निबंध स्पर्धेचे विषय एक आठवडा आधीच देत असत. मग आम्ही मित्रमंडळी निबंधाची तयारी करत असू. निबंधांची विविध पुस्तकं चाळून, निबंध चक्क पाठ करून आम्ही त्या स्पर्धांना जायचो.


एकदा एका संस्थेतर्फे आमच्या वस्तीत निबंध स्पर्धेचं आयोजन केलं होतं. विषय होता, ‘पावसाळ्यातील एका अविस्मरणीय प्रसंग.’ निबंधाचे नाव कळताच मी तयारीला लागलो. माझा मित्र उदय हादेखील भाग घेणार होता.


निबंधाची पुस्तके चाळता चाळता एका पुस्तकात तोच निबंध आम्हाला सापडला आणि आम्हाला विशेष आनंद झाला. मग काय निबंधाची घोकमपट्टी सुरू झाली. विशेष म्हणजे आम्ही दोघेही मित्र एकाच विषयावरचा हुबेहुब, अगदी शब्दाचाही फरक असणार नाही असा निबंध लिहिणार होतो. तरी पण आमच्या मनात कोणताही किंतु नव्हता. कारण ते वय विचार करण्याचे नव्हतेच मुळी! निबंध स्वतःच्या मनाने, विचार करून, अनुभवातून लिहायचा असतो हेच आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे दोघांनीही एकच निबंध लिहिला, तर आयोजकांना शंका येईल असा क्षुद्र विचार आमच्या मनाला शिवलादेखील नाही.


स्पर्धा यथासांग पार पडली. पंधरा दिवसांतच निकाल जाहीर झाला. त्यात मी ३० पैकी २९ गुण मिळवून प्रथम आलो आणि माझा मित्रसुद्धा २८ गुण मिळवून दुसरा आला. जर आयोजकांनी दोघांनीही एकच निबंध कसा लिहिला असा प्रश्न आम्हाला विचारला असता तर आमच्या दोघांची चांगलीच भंबेरी उडाली असती.
एका लेखकाच्या हस्ते मला निबंध स्पर्धेचं पहिलं बक्षीस मिळालं. ना. धो. ताम्हणकरांचं “गोट्या” नावाचं पुस्तक! माझ्या आयुष्यात मिळालेलं पहिलं बक्षीस अन् तेही पुस्तकाच्या रूपाने. मग काय माझा आनंद गगनात मावत नव्हता. घरी येऊन ज्याला त्याला बक्षीस दाखवत सुटलो. माझं पहिलं बक्षीस म्हणून नाचत होतो. पण पुस्तकं वाचायची असतात, याचं भान किंवा समजच मला त्या वयात नव्हती. त्यामुळे थोड्याच दिवसांत त्या पुस्तकाची रवानगी एका लोखंडी पेटीत झाली. पुढे किती तरी वर्षे ते पुस्तक तसंच पडून होते.


पुढे तरुणपणात जेव्हा मला वाचनाची आवड निर्माण झाली, तेव्हा ते पुस्तक मी पहिल्यांदा वाचून काढलं आणि त्या पुस्तकांमुळे शाळेतलं जीवन पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभं राहिलं.


पहिलं बक्षीस मला पुस्तक रूपानं मिळालं होतं आणि ते जरी मी लगेच वाचलं नाही तरी त्या बक्षिसाची आठवण माझ्या मनात खोलवर रुजून बसली होती. एखाद्या मातीत पडलेल्या बी सारखी! पुढे कालांतराने तीच बी रुजून तिला कोंब फुटले. आता त्याचाच एक मोठा वृक्ष झालेला आहे. कारण नित्य रोज विविध पुस्तकांचं वाचन करण्याचा छंद मला लागला आहे.

Comments
Add Comment

सरकारी योजना

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ एका वर्तमानपत्रात एक बातमी वाचली, की पोलीस पथकाने मालाडच्या एस. व्ही. रोडवरून

नदी कशी बनते?

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील सहलीमध्ये शिवम व त्याची मित्रमंडळी यांची चर्चा चांगलीच रंगत होती. नदी कशी बनते? या

प्रबळ महत्वाकांक्षी बना

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर मनुष्याच्या जीवनात प्रगती, यश आणि समाधान मिळवण्यासाठी महत्त्वाकांक्षा

आनंद देऊ या आणि घेऊ या!

प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ लहानपणापासून एका कर्मठ कुटुंबामध्ये मी वाढले. माझे लग्न झाल्यावर माझे मिस्टर मला

स्वप्न...

कथा - रमेश तांबे नील घाईघाईने शाळेत निघाला होता. आज शाळेत पाहुणे येणार होते. त्या पाहुण्यांची ओळख करून देण्याचे

रेती कशी बनते?

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील सहलीवर गेलेले असताना शिवमला त्याचे मित्र प्रश्न विचारीत होते. “कारे गड्या,