पृथ्वीचे सरासरी तापमान गेल्या दशकापासून दरवर्षी नवनवे विक्रम मोडीत काढत आहे. सद्यस्थिती पाहता हा उन्हाळा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण उन्हाळा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात असह्य उष्ण लहरी, हिवाळ्यात अचानक येणारी थंडीची लाट आणि मान्सूनमध्ये ढगफुटीसदृश वादळी पाऊस हे आता ऋतुचक्राचे कायमचेच विस्कळीत झालेले रूप बनले आहे. हवामान बदलाचा हा मार केवळ निसर्गाच्या नोंदींपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. मानवी आरोग्य, मुके प्राणी, शहरी वन्यजीव आणि महाराष्ट्राचे भौगोलिक भवितव्य या तापमान वाढीच्या विळख्यात पुरते होरपळून निघत आहे.
ध्या देशभरात उन्हाचा पारा सातत्याने नवनवे उच्चांक गाठत असून, उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये भीषण उष्णतेची लाट पसरली आहे. दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरांमधून समोर येणारी आकडेवारी केवळ अंगाची लाहीलाही करणारी नाही, तर मानवी आरोग्यासाठी एक गंभीर धोक्याची घंटा वाजवणारी आहे. आजवर आपल्याला उन्हाळ्यातील आजार म्हणजे केवळ अस्वस्थता, घाम येणे, थकवा किंवा जास्तीत जास्त 'सनस्ट्रोक' इतकेच माहीत आहे; मात्र यंदा उन्हाळ्याने धारण केलेले रौद्ररूप आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेले इशारे पाहता, हा ऋतू आता सार्वजनिक आरोग्य आणीबाणी निर्माण करत आहे. या भीषण हवामानाचा परिणाम थेट 'मज्जासंस्था' आणि दृष्टीवर होत असल्याचे वैद्यकीय अहवालांमधून सिद्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर, वाढत्या तापमानाचे मानवी शरीरावरील होणारे आघात समजून घेणे आणि त्याविरुद्ध वेळीच व्यापक पावले उचलणे ही काळाची गरज बनली आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; प्रत्येक आगाराला उत्पन्नाचे टार्गेट देणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सातत्याने ...
या बदलत्या आणि अत्यंत आक्रमक बनलेल्या उन्हाळ्याच्या आजारांचे स्वरूप पूर्वीपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. दिल्लीच्या आघाडीच्या रुग्णालयांमधील ओपीडीमध्ये केवळ उन्हामुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येत तब्बल २० टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, या रुग्णांमध्ये ताप, जुलाब किंवा उलट्या यांसारख्या पारंपरिक लक्षणांपेक्षा 'न्यूरोलॉजिकल' संबंधित गंभीर आजारांची गुंतागुंत घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्टनी स्पष्ट केल्यानुसार, 'लू' आणि अतिउष्णतेचा थेट संबंध आपल्या मेंदूच्या कार्यप्रणालीशी आहे. मानवी शरीर अंतर्गत तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत संघर्ष करू शकते; परंतु जेव्हा बाहेरील तापमान सातत्याने ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्या पार जाते आणि व्यक्ती प्रदीर्घ काळ या वातावरणाच्या संपर्कात राहते, तेव्हा शरीराचे हे अंतर्गत संतुलन कोलमडून पडते.
अतिउष्णतेमुळे शरीराला मोठ्या प्रमाणावर घाम येतो. या घामाच्या वाटे केवळ पाणीच नाही, तर शरीरातील अत्यंत महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स वाहून जातात. शरीरात निर्माण होणारी ही पाण्याची तीव्र कमतरता आणि इलेक्ट्रोलाइट्सचे बिघडलेले संतुलन थेट मेंदूच्या रक्तप्रवाहावर परिणाम करते. मेंदूला होणारा रक्तपुरवठा मंदावल्यामुळे किंवा विस्कळीत झाल्यामुळे तंत्रिका तंत्रावर कमालीचा ताण येतो. याचे सद्यस्थितीत ओपीडीमध्ये दिसणारे परिणाम म्हणजे तीव्र डोकेदुखी, सतत चक्कर येणे, व्यक्तीला आजूबाजूच्या परिस्थितीचा अचानक विसर पडणे किंवा मानसिक भ्रम होणे हे आहेत. अनेक कमकुवत रुग्ण, वृद्ध आणि लहान मुले भर उन्हात किंवा पुरेशी हवा नसलेल्या ठिकाणी अचानक बेशुद्ध पडत आहेत. इतकेच नव्हे तर, अतितापमानामुळे मेंदूतील विद्युत लहरींचे नियंत्रण सुटून रुग्णांना झटके येण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या लक्षणांकडे केवळ उन्हाळ्याचा थकवा म्हणून दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते; कारण ही न्यूरोलॉजिकल आणीबाणी असून, यामध्ये तत्काळ वैद्यकीय उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या जीवाला कायमचा धोका निर्माण होऊ शकतो.
नाशिक : नाशिकच्या कश्यपी धरण (Kashyapi Dam) येथे गेलेल्या पती-पत्नी आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोघा मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब ...
या महातापमानाचा दुसरा मोठा फटका आधीपासूनच विशिष्ट आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बसत आहे. मायग्रेन, अपस्मार किंवा नसांच्या जुन्या विकारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी हा उन्हाळा एका छळासारखा ठरत आहे. अतिउष्णतेचे दिवस आणि त्याहूनही अधिक त्रासदायक असणाऱ्या उष्ण रात्री यामुळे रुग्णांची झोप पूर्ण होत नाही. अनेक भागांत होणारी वीज कपात या त्रासात भर घालत आहे. अपुऱ्या झोपेमुळे आणि सततच्या शारीरिक ताणामुळे मायग्रेनच्या रुग्णांमध्ये डोकेदुखीची वारंवारता आणि तीव्रता कमालीची वाढली आहे. अपस्माराच्या रुग्णांमध्ये झटके येण्याचे प्रमाण उन्हाळ्यात वाढते, कारण त्यांचे शरीर अंतर्गत उष्णतेचा ताण सहन करू शकत नाही.
मज्जासंस्थेइतकाच उन्हाचा थेट आणि मोठा मारा आपल्या नाजूक डोळ्यांवर होत आहे. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे, हवेतील उष्ण वारे, वाढती धूळ आणि प्रदूषण डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहेत. नेत्ररोग तज्ज्ञांच्या मते, या ऋतूत 'ड्राय आय सिंड्रोम'च्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. डोळ्यांमधील पाण्याचा थर उन्हामुळे वेगाने सुकतो, ज्यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे, सतत खाज सुटणे आणि डोळ्यांवर प्रचंड ताण येणे अशा समस्या उद्भवतात. उष्ण हवेतील धुळीच्या कणांमुळे 'ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस' म्हणजेच डोळे येण्याची साथ पसरत आहे. या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी आता केवळ शासकीय पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन पुरसे ठरणार नाही, तर प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक पातळीवर आरोग्याची शिस्त लावावी लागेल. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेले सल्ले आता मार्गदर्शक तत्त्वे म्हणून स्वीकारण्याची वेळ आली आहे.