Sunday, May 24, 2026

Monsoon 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी टाळा; कृषी विद्यापीठाचा इशारा

Monsoon 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी टाळा; कृषी विद्यापीठाचा इशारा

मुंबई : राज्यातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या २९ मेपर्यंत राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे वेगाने पुढे सरकत असल्याने महाराष्ट्रात मान्सून नेहमीपेक्षा काही दिवस आधी दाखल होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Monsoon 2026)

मान्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी पेरणी करताना घाई करू नये, असा महत्त्वाचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिला आहे. हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, शेतात किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास बी उगवणीत अडचणी निर्माण होऊन दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. (Monsoon 2026)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा मान्सूनची वाटचाल अनुकूल असून जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील तापमानातही घट होणार असून उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. (Monsoon 2026)

दरम्यान, मान्सूनपूर्व पाऊस अनेकदा वादळी स्वरूपाचा असतो. त्यामुळे काही भागांत जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतात काम करताना तसेच बाहेर प्रवास करताना नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. विशेषतः वीज कडकडाटाच्या वेळी झाडाखाली उभे राहणे टाळावे आणि पाळीव प्राण्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असेही सांगण्यात आले आहे. (Monsoon 2026)

मुंबईसह राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दादरमधील शिवाजी पार्क परिसरासह अनेक भागांत हलक्या सरी कोसळल्या असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. (Monsoon 2026)

दरम्यान, राज्यातील धरणांतील पाणीसाठ्याची स्थितीही चिंतेचीच आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये एकूण ३०.५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जायकवाडी धरणात ३७ टक्के, खडकवासला धरणात ५७.४७ टक्के, तर कोयना धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. (Monsoon 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >