शिक्षा नव्हे शिक्षण

कथा - रमेश तांबे


नमस्कार बाल मित्रांनो, मी आज तुम्हाला दक्षिण कोरिया या देशातल्या एका शाळेची आणि त्या शाळेत होणाऱ्या शिक्षांची गोष्ट सांगणार आहे. दक्षिण कोरिया या देशात बुसान नावाचे एक शहर आहे. त्या शहरात एका साध्या वस्तीत एक शाळा आहे. फार जुनी, त्याच शाळेची ही गोष्ट!


ही शाळा फक्त मुलींची शाळा होती. या शाळेचा निकालदेखील दरवर्षी ठीकठाकच लागत असे. मुलांच्या विविध कलागुणांना वाव देणारी, त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाला समृद्ध करणारी असा काही तिचा नावलौकिक नव्हता. पण शाळा एका गोष्टीसाठी सर्वत्र प्रसिद्ध होती ती म्हणजे शाळेत होणाऱ्या शिक्षांसाठी!


मित्रांनो आपल्या देशातील शाळांमध्ये आजकाल विद्यार्थ्यांना शिक्षा केल्या जात नाहीत. त्यांना मारायचं नाही, ओरडायचं नाही, त्यांचा अपमान होईल असं बोलायचं नाही. पण काही वर्षांपूर्वी आपल्या देशातील शाळांमध्येदेखील खूप शिक्षा व्हायच्या. “छडी लागे छम छम, विद्या येई घमघम” हे तर शाळेचं ब्रीद वाक्यच असायचं किंवा त्यावेळचे पालक शाळेत येऊन शिक्षकांना सांगायचे, याला चांगला फोडून काढा म्हणजे हा अभ्यासात हुशार होईल!


तर विद्यार्थ्यांना शिक्षा सर्वत्रच व्हायच्या. अगदी दक्षिण कोरियातल्या शाळेतदेखील! पण इथल्या शिक्षांची पद्धत निराळी होती. तेथे कुण्या मुलीने काही चुकीचं केलं, शाळेचा नियम मोडला, तर त्या शाळेतले शिक्षक शिक्षा म्हणून त्या मुलीला पुस्तक वाचण्याची शिक्षा देत, कधी काही तुटलं, फुटलं तर पुस्तकातलेच एखादे प्रकरण पाच वेळा वहीत लिहून आणण्याची शिक्षा मिळे. कधी वर्गात गडबड करताना कोणी सापडलाच तर त्याला भरवर्गात एखाद्या विषयावर बोलण्याची शिक्षा मिळे. अशा विचित्र शिक्षांमुळे मुलांमध्ये त्या शिक्षांची चांगलीच दहशत पसरली होती. तर आपल्या या मुलींच्या शाळेत से-यून नावाची एक साधी भोळी मुलगीदेखील शिकत होती. से-यून एका गरीब घरातली मुलगी. समंजस, कुणाशी जास्त न बोलणारी, आपण भले आणि आपला अभ्यास भला असे समजून चालणारी. पण तिच्या या साधेपणाचा वर्गातल्या मुली गैरफायदा घ्यायच्या. तिला उगाचच त्रास द्यायच्या. वर्गात काही घडले की शिक्षकांना सांगायच्या से-यूनने केले. मग काय, प्रत्येक वेळी से-यूनलाच शिक्षा मिळायची. कधी पुस्तकं वाचण्याची, तर कधी पुस्तकातले धडे वहीत उतरून काढण्याची! दहा दिवसांतून एकदा तिला भरवर्गात सगळ्यांसमोर भाषण करण्याची शिक्षा मिळायची. बिचारी से-यून कोणतीही तक्रार न करता शिक्षा भोगत असे. साऱ्या मुलींना मात्र तिला रोज शिक्षा होते याचा असुरी आनंद व्हायचा. प्रत्येक वेळी से-यूनलाच शिक्षा कशी होते याचा विचार शिक्षकांच्याही मनात कधीही आला नाही हे विशेषच! असे करता करता अनेक वर्षे गेली. वर्षोनुवर्ष अशा शिक्षा मिळाल्यामुळे से-यूनचे वाचन खूपच वाढले. तिने खूप पुस्तके वाचली. जरी शिक्षा म्हणून वाचली तरी त्या पुस्तक वाचनाचा तिच्यावर सकारात्मक परिणाम झाला. तिचे हस्ताक्षर सुधारले. भाषणांच्या शिक्षेमुळे नवनवीन विषयांचा अभ्यास करून सर्वांसमोर स्वतःची मते मांडण्याचे कौशल्य तिला प्राप्त झाले.


बालमित्रांनो रोज शिक्षा होते किंवा सर्वजण से-यूनला कसे फसवतात असं म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. त्या सर्वांना मागे टाकून से-यून पुढे गेली. या सर्व शिक्षांचा तिच्यावर चांगला परिणाम झाला. अन् ती समृद्ध झाली. आज से-यून दक्षिण कोरियातील एक प्रसिद्ध लेखिका बनली आहे. आपल्याला शाळेत होणाऱ्या शिक्षांकडे आपण जर वेगळ्या नजरेने बघितले, तर नक्कीच आपले जीवन यशस्वी आणि सुंदर बनू शकते हा धडा आपल्याला से-यून हिच्या गोष्टीतून मिळतो. हो ना बालमित्रांनो!

Comments
Add Comment

कसा असेल यंदाचा मान्सून?

दृष्टिक्षेप - प्रा. अशोक ढगे पाऊस कमी पडण्याचा अंदाज चिंताजनक ठरतो. अंदाज खरा ठरून पाऊस कमी पडल्यास शेतकरी, सरकार,

पृथ्वी मोलाची

ललित - डॉ. निर्मोही फडके सामुद्रधुनी’ हा शब्द लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचला. त्या वयात वाचनात नवा शब्द

हरवली रोषणाई

स्मृतीगंध - लता गुठे काही दिवसांपूर्वी रस्त्याने जात असताना एक दृश्य पाहिले ते असे होते. एक आंधळा माणूस

‘उगा मनाला भास असे!’

नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे पूर्वी रेडिओ हा समाजाच्या जीवन संगीतामधला ‘सा’ हा स्वर होता. सकाळी उठल्यापासून

दानाचे प्रकार आणि पुण्य

महाभारतातील मोतीकण - भालचंद्र ठोंबरे न म्हणजे स्वकष्टार्जित वस्तूपैकी स्वतःच्या इच्छेने उपकाराची व परतीची

मन... मन... मन...

संवाद - गुरुनाथ तेंडुलकर इंटरनेटवर वाचलेला एक किस्सा... एक मध्यमवयीन माणूस एका मानसोपचार तज्ज्ञाकडे गेला होता.