‘उगा मनाला भास असे!’

नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे


पूर्वी रेडिओ हा समाजाच्या जीवन संगीतामधला ‘सा’ हा स्वर होता. सकाळी उठल्यापासून रेडिओचा हा ‘सा’ अगदी ‘समे’सारखा सगळ्या हालचालींमागे सतत सुरू असायचा! त्याकाळी खासगी रेडिओ वाहिन्या नव्हत्या. त्यामुळे सवंग मनोरंजन देऊन त्या बदल्यात जाहिरातीमधून पैसा कमावण्याचा आणि त्यातून समाजाची अभिरुची अधिकाधिक खाली आणण्याचा ‘धंदा’ही सुरू झालेला नव्हता.
‘आकाशवाणी’ तिचे अभिरुचीसंपन्न मनोरंजन आणि समाजप्रबोधनाचे काम प्रामाणिकपणे पार पाडत होती. रेडिओच्या सगळ्याच कार्यक्रमांची निर्मिती करताना उच्च अभिरुची आणि कार्यक्रमाचा व्यावसायिक दर्जा सांभाळला जायचा. हल्लीसारखे काहीही सवंग, अभिरुचीहीन असे नसायचे.


बिस्मिल्लाखां साहेबांच्या सनईच्या मंगलसुरांनी सुरू होणारी सकाळ ‘प्रभातकिरणे’सारख्या अध्यात्मिक विचारांनी समृद्ध व्हायची. लगेच दिवसाच्या सुरुवातीलाच देशभरातल्या आणि जगातल्या महत्त्वाच्या बातम्या श्रोत्यांना १० मिनिटांत मिळायच्या. त्याही कोणता मालमसाला न लावता किंवा कुणाचा राजकीय अजेंडा न चालवता!


कार्यक्रमात भक्तिगीते असत, सिनेगीते असत, लोकगीते असत, नाट्यलेखनाला उत्तेजन देणाऱ्या श्रुतिका असत, शैक्षणिक कार्यक्रम होत. सगळा खटाटोप प्रांजळ मनोरंजन आणि जनहितासाठी चाललेला! त्याकाळी आकाशवाणी हे सर्वांना सहज उपलब्ध असलेले मनोरंजनाचे सर्वोत्तम आणि विनामूल्य साधन होते.


त्यात भावगीतांना एक विशेष महत्त्वाचे स्थान होते. गाणे लोकप्रिय होण्यासाठी ते सिनेमातलेच असले पाहिजे, अशी अट त्याकाळी नव्हती!


अनेक सिद्धहस्त मराठी कवींच्या कवितांना उत्तम संगीत देऊन आकाशवाणीने त्यांना ‘भावगीत’ ही कल्पक संज्ञा दिली. कितीतरी कवींनी भावगीतांतून मराठी लोकमानसावर राज्य केले. ते कवी, गायक, संगीतकार त्या आजही लोकांच्या मनात विराजमान आहेत. कवी म्हटले तर गदिमांपासून शांताराम नांदगावकर, शांता शेळके, रमेश अणावकर, राजा मंगळवेढेकर, मधुकर जोशी, राजा बढे, पी. सावळाराम, जगदीश खेबूडकर असे अनेक कविवर्य होते, तर गायकात गजानन वाटवे, माणिक वर्मा, सुधा मल्होत्रा, मालती पांडे, रामदास कामत असे कितीतरी दिग्गज आकाशवाणीने श्रोत्यांसमोर आणले!


आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी निवडलेल्या या मुळातल्या भावमधुर कवितांना अनुरूप संगीत देणाऱ्यात सुधीर फडके, पं. हृदयनाथ मंगेशकर, दत्ता डावजेकर, वसंत प्रभू, श्रीधर फडके, यशवंत देव, दादा चांदेकर, वसंत पवार असे अनेक कलाकार होते.


असेच एक सुंदर भावगीत लिहिले होते रमेश अणावकर यांनी! वसंत प्रभू यांच्या संगीत दिग्दर्शनात आशा भोसले यांनी एखाद्या लाजऱ्या-बुजऱ्या मुलीचा मोहक आवाज लावून गायलेल्या या भावगीतालाही खूप लोकप्रियता मिळाली.
यौवनात प्रवेश करताच तरुण मनात प्रथमच जी प्रेमभावना जन्म घेते त्या मानसिक अवस्थेचे वर्णन अणावकरांनी दिलखुलासपणे केले होते. नुकतीच प्रेमात पडलेल्या त्या युवतीच्या मनातील भावभावनांचे चित्रण सहजपणे करणारे अणावकरांचे ते भावमधुर


शब्द होते -


‘मी मनात हसता प्रीत हसे,
हे गुपित कुणाला सांगू कसे?’


कुणीतरी मनापासून आवडले, त्याच्याबद्दल अनावर ओढ वाटू लागली की, आपल्या मनातले हे गुपित जवळच्या कुणाला तरी सांगावे असे युवतीला वाटू लागते. पण त्याचबरोबर नैसर्गिक लज्जेच्या भावनेमुळे हे सर्वापासून लपवावे अशी अगदी विरोधी भावनाही त्याच वेळी तिच्या मनात असते. ती गंमतीशीर गोंधळाची, अनामिक हुरहुरीची भावना अणावकरांनी गाण्यात अलगद उकलून दाखवली होती. तिला ‘त्याचे’ येणे-जाणे एकांतातही सहजच जाणवत राहते! पण दोघात कोणताच संवाद होत नसल्याने नंतर तिच्या लक्षात येते की, अरे तो तर आलाच नाही. त्याच्या येण्याचा मला फक्त भास झाला होता. माझा एकांत तर तसाच कायम आहे.


मग तिच्या डोळ्यांपुढे त्या संभाव्य गुप्त भेटीची दिवास्वप्नेच रंगू लागतात. हे माझे विचित्र गुपित आता कुणाला सांगू? असे पुन्हा पुन्हा तिला वाटत राहते -


‘चाहुल येता ओळखिची ती,
बावरल्या परी मी एकांती.
धुंद जीवाला डोळ्यांपुढती,
नव्या नवतीचे स्वप्न दिसे
हे गुपित कुणाला सांगू कसे?’


प्रेमाचे वादळ सतत मनाला घेरत असल्याने ही अवखळ, अल्लड प्रेमिका अगदी सैरभैर झाली आहे. उगीचच तिला जीवलगाच्या येण्याचे, त्याच्या सहवासाचे भास होऊ लागतात. त्याच्या उपस्थितीच्या जाणिवेने लाजल्यासारखे होते. मुळीच न ढळलेला पदर ती उगाचच सावरत राहते.


सारखे आपण कसे दिसतो, त्याला कसे दिसू, त्याचे काय मत होईल, असे विचार तिला बैचेन करतात. मध्येच आपली अवस्था लक्षात आल्यावर तिला वाटते मला हे कसले विचित्र वेड लागले आहे? पण मग ती स्वत:लाच विचारते, ‘याला वेड तरी कसे म्हणू?’ मला तर खरोखरंच माझ्या प्रियकराबद्दलची ओढ अनावर होते आहे. मनाची ही विचित्र अवस्था कुणाला सांगून टाकली तर निदान माझी या घालमेलीतून सुटका तरी होईल. पण हे असले गुपित मी कसे कुणाला सांगू? मैत्रिणी मला काय म्हणतील?-


‘किंचित ढळता पदर सावरी,
येता जाता माझी मला मी.
एकसारखी पाहे दर्पणी,
वेड म्हणू तर वेड नसे.
हे गुपित कुणाला सांगू कसे?’


मध्येच तिला वाटते, हे आपले आपल्यापुरते गुपित मैत्रिणीना सांगून हसे कशाला करून घेऊ? त्यापेक्षा आपल्या या प्रामाणिक भावना त्या जीवलगालाच का कळवू नयेत? त्यालाच प्रेमपत्र लिहून सगळे कळवून मोकळे होऊ या! पण तेही तिला जमत नाही. ती स्वत:शीच बोलत राहते. तिच्यासमोर नवीच अडचण उभी राहते. ती म्हणते, मी पत्र लिहायचे म्हटले तर मला शब्दच सुचत नाहीत! काय लिहावे तेही कळत नाही. उलट त्याला पत्र लिहायची नुसती कल्पना केली तरी लगेच “प्रिय...” असे लिहावे लागेल म्हणून त्याचे नाव डोळ्यांसमोर येते. नाव नुसते आठवले तरी त्याचे देखणे रूप समोर येऊन मी अजूनच गोंधळते.


‘काही सुचेना काय लिहावे?
पत्र लिहू तर शब्द न ठावे.
नाव काढीता रूप आठवे,
उगा मनाला भास असे
हे गुपित कुणाला सांगू कसे?’


त्याकाळी इतक्या नाजूक भावना असतही आणि त्या भावगीतातून सहज मांडल्याही जात. मनाची जडणघडणच सुसंस्कृत, संयत असल्याने त्यावेळच्या युवक युवतींना अशा गाण्यात आपल्याच भावनांचे प्रतिबिंब दिसायचे आणि ती गाणी लोकप्रिय होत. नाते कोणतेही असो, सगळा संवादच थेट, बटबटीत आणि टोकाचा शारीर झाल्यामुळे पुन्हा मानवी मनातील हे असे आतले नाजूक पदर हळुवारपणे उलगडून दाखवणारी गाणी कुठे सापडणार? म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!

Comments
Add Comment

कसा असेल यंदाचा मान्सून?

दृष्टिक्षेप - प्रा. अशोक ढगे पाऊस कमी पडण्याचा अंदाज चिंताजनक ठरतो. अंदाज खरा ठरून पाऊस कमी पडल्यास शेतकरी, सरकार,

पृथ्वी मोलाची

ललित - डॉ. निर्मोही फडके सामुद्रधुनी’ हा शब्द लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचला. त्या वयात वाचनात नवा शब्द

हरवली रोषणाई

स्मृतीगंध - लता गुठे काही दिवसांपूर्वी रस्त्याने जात असताना एक दृश्य पाहिले ते असे होते. एक आंधळा माणूस

दानाचे प्रकार आणि पुण्य

महाभारतातील मोतीकण - भालचंद्र ठोंबरे न म्हणजे स्वकष्टार्जित वस्तूपैकी स्वतःच्या इच्छेने उपकाराची व परतीची

मन... मन... मन...

संवाद - गुरुनाथ तेंडुलकर इंटरनेटवर वाचलेला एक किस्सा... एक मध्यमवयीन माणूस एका मानसोपचार तज्ज्ञाकडे गेला होता.

नाबालिक

क्राइम - अ‍ॅड. रिया करंजकर गुन्हेगार कोणत्या स्वरूपात आपल्यासमोर वावरत असतील याचा थांबपत्ता कोणालाच नसतो.