Thursday, May 14, 2026

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणेंचा मंत्रालयापर्यंत पायी प्रवास

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणेंचा मंत्रालयापर्यंत पायी प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 'काटकसरी'च्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलेटवरून विधानभवन गाठल्यानंतर, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी चक्क पायी प्रवास करत मंत्रालय गाठले. 'सुवर्णगड' या आपल्या शासकीय निवासस्थानापासून ते मंत्रालयापर्यंतचा प्रवास त्यांनी चालत पूर्ण केल्याने सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे वळल्या होत्या.

या प्रवासादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन हे देशहितासाठी आहे. यात कोणतेही राजकारण न आणता इंधन बचतीसाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. मी माझ्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली असून, यापुढे केवळ सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यक असलेल्या दोनच गाड्या माझ्या ताफ्यात असतील." तसेच, आजपासून आपण इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

इंधन बचतीचा हा मंत्र वैयक्तिक प्रवासापुरता मर्यादित न ठेवता नितेश राणे यांनी प्रशासकीय कामकाजातही बदल केले आहेत. "माझ्या खात्याच्या सर्व बैठका यापुढे 'ऑनलाइन' पद्धतीने घेण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांना विनाकारण प्रवास करावा लागणार नाही आणि इंधनासोबतच वेळेचीही बचत होईल," असे त्यांनी नमूद केले.

सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दुचाकीवरून प्रवास करून इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून दिला आहे. याच पावलावर पाऊल ठेवून सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही राणे यांनी यावेळी केले. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटाचा सामना करण्यासाठी अशा प्रकारच्या छोट्या कृतीही राष्ट्रीय हिताच्या ठरणार आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा