Free kidney, liver transplant surgery : मविप्र रुग्णालयात आता विनामूल्य किडनी, लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना दिलासा

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये आता किडनी आणि लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार असून, नुकतीच आईने मुलाला दिलेली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य या दोन्ही योजनांच्या अंतर्गत या शस्त्रक्रिया विनामूल्य होणार आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांसाठी ही दिलासादायक बाब असून, जास्तीत जास्त रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व कार्यकारिणी मंडळाने केले.


आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये मंगळवारी (दि. १२) आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. नितीन ठाकरे यांनी रुग्णालयाच्या या नवीन विभागांची माहिती दिली. याप्रसंगी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे, प्रा. शशिकांत मोगल, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, किडनी प्रत्यारोपण समन्वयक डॉ. संजय रकिबे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.



यावेळी ॲड. ठाकरे म्हणाले की, मविप्र रुग्णालयात मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण विभाग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. येथे अत्याधुनिक डायलिसिस युनिटसह तज्ज्ञ नेफ्रोलॉजिस्ट, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ व प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत. आतापर्यंत आईने मुलाला किंवा वडिलांनी मुलाला, आजीने नातवाला अशा रक्ताच्या नात्यातील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. मविप्र रुग्णालयात लवकरच यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियादेखील सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा झाली असून, शासनाची परवानगी मिळाल्यानंतर ही सुविधा सुरू केली जाईल.


तसेच स्पोर्ट फिजिओथेरपी, होमिओपॅथी हे विभागदेखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मविप्र रुग्णालयात नुकत्याच पार पडलेल्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील रुग्ण रोशन बच्छाव (मुलगा), मनिषा बच्छाव (आई) आणि विनायक बच्छाव (वडील) यांचा मविप्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. विवाहानंतर अवघ्या १५ दिवसांत रोशनची किडनी केवळ १० टक्के कार्यक्षम असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आईने मुलाला किडनी देण्याचा निर्णय घेतला. मविप्र रुग्णालयातील डॉक्टर व संपूर्ण टीमच्या प्रयत्नांनंतर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.



नाव नोंदणीचे आवाहन


ज्या रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज आहे, परंतु रक्ताच्या नात्यातील दाता उपलब्ध नाही, अशा रुग्णांनी ‘झेडटीसीसी’कडे (ZTCC) नाव नोंदणी करावी. अशा रुग्णांना मेंदूमृत दात्यांकडून मूत्रपिंड उपलब्ध होऊ शकते. मविप्र रुग्णालय यासाठी पूर्ण सहकार्य करेल.
भारतामध्ये सध्या ५ लाखांहून अधिक रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे समाजाने मेंदू मृत्यूनंतर अवयवदानासाठी पुढे यावे, यासाठी रुग्णालयामार्फत जनजागृती व समुपदेशन केले जात आहे, अशी माहिती ॲड. ठाकरे यांनी दिली.


सिडको परिसरात ओपीडी सुरू


नाशिक शहरातील सिडको परिसरातील नागरिकांना माफक दरात व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मविप्र संस्थेच्या वतीने उत्तमनगर येथील ‘जनशिक्षण संस्थान’च्या इमारतीत बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला आहे. ही ओपीडी सोमवार ते शनिवार (सार्वजनिक सुट्ट्या वगळून) सुरू असते. सामान्य ओपीडी सेवा दिवसभर उपलब्ध असून, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला सकाळी ९:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत, तसेच सायंकाळी ५:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत उपलब्ध आहे. या केंद्रामध्ये ओपीडी केसपेपर, ईसीजी, रक्तातील साखर तपासणी विनामूल्य असून, इतर प्रयोगशाळा तपासण्या अत्यंत माफक दरात केल्या जातात. अधिक उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात पाठवले जाते. अशा रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध आहे.



शैक्षणिक विस्ताराच्या दिशेने मोठे पाऊल


डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाने शैक्षणिक विस्ताराच्या दिशेने मोठे पाऊल टाकले असून, एमबीबीएस (MBBS) पदवी अभ्यासक्रमाच्या जागा १२० वरून १५० करण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात २५० जागांपर्यंत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात मेडिसिन, रेडिओलॉजी आणि मानसोपचार यांसारख्या विषयांतील जागा वाढवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


सुपर स्पेशालिटी कोर्सेस सुरू करणार


ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी, या उद्देशाने महाविद्यालयात लवकरच सुपर स्पेशालिटी कोर्सेस सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. जागा वाढल्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी मिळेल. तसेच नवीन कोर्सेसमुळे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावेल. यामुळे जिल्हा व राज्यातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे स्थान अधिक बळकट होणार आहे, असेही ॲड. ठाकरे यांनी सांगितले.



आदिवासी कुटुंबाचा अवयवदानाचा आदर्श


सटाणा तालुक्यातील गोलवाड येथील १४ वर्षीय विकास यशवंत महाले हा युवक मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात उपचार सुरू असताना मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने तो ब्रेन डेड घोषित करण्यात आला. मविप्र रुग्णालयाच्या ब्रेन डेड समितीने तपासणी करून ही घोषणा केली. त्यानंतर कुटुंबाचे समुपदेशन करून अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. त्यानंतर कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतला.
या प्रक्रियेत चार पथकांनी अहोरात्र काम केले. या मुलाचे यकृत व दोन मूत्रपिंड पुण्यात, तर नेत्र व त्वचा नाशिकमध्ये गरजू रुग्णांसाठी वापरण्यात आले.


‘त्या’ कुटुंबाला मदतीचा हात


मविप्र रुग्णालयात गेल्या आठवड्यात घडलेल्या दुर्घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबियांना मविप्रने मदतीचा हात दिला आहे. तात्काळ मदत म्हणून १ लाख रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे. तसेच पीएफच्या माध्यमातून ६ हजार रुपयांची पेन्शन सुरू केली जाणार आहे. कुटुंबातील वारसाला नोकरी देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी दिली.

Comments
Add Comment

Nashik : वनवासी बांधवांसोबत जुळणार दैवी बंधाची वीण, धनश्रीदीदींच्या उपस्थितीत शुक्रवारी चारोसे येथे रक्षाबंधन उत्सव

Nashik : भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमाला दैवी भ्रातृभावाची व्यापक जोड देणारा स्वाध्याय परिवाराचा विशेष ‘रक्षाबंधन

Dhule Crime News : 'त्या मुलीशी लग्न करू नका, माझे तिच्याशी प्रेमसंबंध'...घटनेचा जाब विचारल्याच्या रागातून दोघांवर जीवघेणा हल्ला

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. साक्री तालुक्यातील रायपूर येथे फोन करून

Natural Skincare : रक्षाबंधनासाठी घरच्या घरी चेहऱ्यावर आणा नैसर्गिक ग्लो; बेसनाचा हा फेसपॅक ठरेल उपयोगी

रक्षाबंधनाच्या दिवशी चेहरा तजेलदार आणि फ्रेश दिसावा असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी महागड्या फेशियलसाठी

Nashik : ‘मिशन ग्रीन मान्सून’च्या नवव्या टप्प्यात सिन्नर औद्योगिक क्षेत्रात वृक्षारोपण

Nashik : उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहर व जिल्हा हरित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ग्रीन

Nashik Accident News : पिकअपची दुचाकीला भीषण धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या २७

Vaidyanath Temple : वैद्यनाथ मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवरासाठी चोख बंदोबस्त

बीड : पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ