Monday, May 11, 2026

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील अवकाळीग्रस्तांना तातडीने मदत द्या; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला आदेश

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील अवकाळीग्रस्तांना तातडीने मदत द्या; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला आदेश

जिल्ह्यातील वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नुकसानग्रस्त नागरिकांना कोणताही विलंब न लावता सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून द्या, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोमवारी दिले. मंत्रालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत त्यांनी प्रत्येक तालुकानिहाय नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला आणि प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले.

वादळामुळे जिल्ह्यातील वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून अनेक भागांतील पाणीपुरवठाही खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. वीज आणि पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकांशी सातत्याने संवाद ठेवावा. लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.

येत्या काही दिवसांत सुरू होणारा पावसाळा आणि 'एल-निनो'च्या प्रभावामुळे हवामानात होणारे संभाव्य बदल लक्षात घेता, प्रशासनाने गाफील न राहता पूर्वतयारी करावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. महावितरणसह सर्वच विभागांनी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक यंत्रसामग्री आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी 'ब्रेकडाऊन पथके' सज्ज ठेवावीत. तसेच संपर्कयंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला परिस्थितीचा आढावा

पालकमंत्र्यांसोबतच्या या बैठकीला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सद्यस्थिती आणि राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या बैठकीला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >