Monday, May 11, 2026

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा: राहुल गांधींवर बोचरी टीका; म्हणाले त्यांची समजच...

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा: राहुल गांधींवर बोचरी टीका; म्हणाले त्यांची समजच...
नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे सध्या दिल्लीच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर असून, राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी ते विविध केंद्रीय नेते आणि उद्योगपतींसोबत चर्चा करत आहेत. आज नवी दिल्लीत 'भारतीय उद्योग महासंघा'च्या (CII) एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात त्यांनी महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडली. या बैठकीनंतर गुवाहाटीला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्याच्या प्रगतीचा आलेख उलगडला. "महाराष्ट्र आज स्टार्टअप क्षेत्रात देशात अव्वल स्थानावर आहे आणि २०२५-३० या काळासाठी मल्टी-इयर टॅरिफलाही नुकतीच मंजुरी मिळाली आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
यानंतर त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि इंधन संकटावर भाष्य केले. शेजारील पाकिस्तानचे उदाहरण देत ते म्हणाले की, "सध्या जागतिक स्तरावर इंधनाची मोठी टंचाई निर्माण झाली असून पाकिस्तानात पेट्रोलचे दर ४५० रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कुशल नेतृत्वामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा अत्यंत सुरळीत आहे. तरीही, जागतिक पुरवठा साखळीवरील ताण लक्षात घेता आपण इंधनाचा अतिवापर टाळून परकीय चलन वाचवले पाहिजे, हे पंतप्रधानांचे आवाहन अत्यंत योग्य आणि काळाची गरज आहे." याच आवाहनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचा फडणवीसांनी खरपूस समाचार घेतला.

"त्यांची समजच कमी आहे..." - राहुल गांधींवर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या हितासाठी केलेल्या आवाहनावर राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड भूमिका मांडली. ते म्हणाले की, "पंतप्रधानांच्या बोलण्याचा सखोल अर्थ जर राहुल गांधींना (Rahul Gandhi) समजत नसेल, तर त्यात त्यांना दोष देऊन काहीही उपयोग नाही; मुळात त्यांची राजकीय आणि व्यावहारिक समजच खूप कमी आहे." देशातील जनता सुज्ञ असून ती पंतप्रधानांच्या आवाहनाचे गांभीर्य ओळखून त्याला नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. "राहुल गांधी हे देशातील जनतेने वारंवार आणि सर्वाधिक नाकारलेले नेते आहेत," असा सणसणीत टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.

"आम्ही राहुल गांधींना महत्त्व देत नाही"

माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना फडणवीसांनी राहुल गांधींवरील आपला हल्लाबोल सुरूच ठेवला. त्यांनी स्पष्ट केले की, "केवळ प्रसारमाध्यमेच राहुल गांधींच्या विधानांना महत्त्व देतात, आम्ही त्यांना अजिबात महत्त्व देत नाही." जगातील अनेक प्रगत आणि विकसनशील देशांना आज पेट्रोल आणि डिझेलच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असताना, भारताची स्थिती बरीच सुरक्षित आहे. या जागतिक संकटाची झळ भारताला बसू नये म्हणूनच पंतप्रधानांनी इंधन बचतीचे आवाहन केले आहे. हे आवाहन सर्वस्वी योग्यच असल्याचा पुनरुच्चार करत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >