बघ्यांची गर्दी नि रेंगाळणारा न्याय...

स्पंदन; अश्विनी शिंदे-भोईर


उन्हाळ्यात लालभडक फुललेला गुलमोहोर. ज्याच्या सावलीत कदाचित अनेकांचं बालपण रुजलेलं असेल. घराघरांतून चालणारे पापड, लोणच्याचे बेत. बिनधास्तपणे या घरातून त्या घरात धावणारी पावलं. कैरीच्या पन्ह्याचा आत आत मुरणारा थंडगारपणा. ठकठक, चांदोबा सोबत मजेत जाणारी सुट्टी... दुपारभर सापशिडी, कॅरम, पत्ते आणि उन्ह कलल्यावर डब्बाऐसपैस. डब्बा लांब कुठे तरी फेकून कोणत्या तरी गल्लीबोळात, अनवट जागा शोधत बराच काळ चालणारी लपाछपी. मुलांच्या कल्ल्याने गोंगाटणाऱ्या गल्ल्या.


बालपणीच्या या सुखद आठवणी आजही मनाला गारवा देतात. पण आज मात्र लहान लहान मुलींवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्यावर भीती वाटते ती लपाछपीच्या अनवट जागांवर भिरभिरणाऱ्या विकृत नजरांची. लैंगिक भुकेने हपापलेल्या नराधामांमुळे मुलांच्या मुक्त वावरण्याच्या गल्ल्या, घर आज असुरक्षित झाल्या आहेत. नराधमांची ही कृत्यं वाचून आम्ही चिडतो, संतापतो, शिव्यांची लाखोली वाहतो आणि नंतर या नराधमाला फाशीची शिक्षा कधी होणार याची वर्षानुवर्ष वाट पाहतो. ती घटना मनाच्या कोलाहलातून थोडीशी बाजूला सरकते न सरकते तोच अशीच कोणती तरी दुसरी बातमी मनावर येऊन आदळते. घरातून शाळा – कॉलेजसाठी, नोकरीसाठी नव्हे अगदी खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या मुलीबद्दल आई-वडिलांच्या मनात चिंता, काळजी घर करून राहत आहे. मला तुम्हाला देखील दैनंदिन जीवनात मनात भीती निर्माण करणारे असे काही अनुभव येत असतात.


सुट्टीचा दिवस म्हणजे बहुधा रविवारचा दिवस होता. या दिवशी नेहमी तुडुंब भरून वाहणाऱ्या विरार लोकल थोडा मोकळा श्वास घेतात. बोरिवलीला धावत येऊनच ट्रेन पकडली. लेडीज फर्स्ट क्लास लांब असल्याने जनरल फर्स्ट क्लास मध्येच चढले. डबा तसा रिकामाच होता. खिडकीजवळची सीट पकडून बसले. जागेवर सेट झाल्यावर समोर नजर गेली नि एकदम नजर थरथरली. लांबलचक दाढी वाढलेला, कळकट मळकट कपडे घातलेला, नजरेत खुंखारपणा असणारा एक माणूस दरवाजाच्या पलीकडच्या बाजूच्या सीटवर एकटाच बसला होता. त्या माणसाला पाहून भीतीच वाटली. पुढच्याच स्टेशनला उतरून दुसऱ्या डब्यात चढावं असा विचार मनात आला. मग म्हटलं नको शांतपणे इथेच बसू या. बाकीची माणसं पण आहेत डब्यात. त्या माणसाचा अवतार पाहून डब्यातून खाली उतर असं सांगायची कोणाची हिंमत होत नव्हती. त्या माणसाकडे पाहताना मनात अनेक विचार येत होते. मध्यंतरी सोशल मीडियावर अर्धनग्न अवस्थेतील विक्षिप्त चाळे करणाऱ्या एसी ट्रेनमधील एका माणसाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशी माणसे कोणत्या न कोणत्या स्टेशनवर चढत असतील. प्लॅटफॉर्मवर व स्टेशन परिसरात कोणत्याच पोलिसांच्या नजरेत ही माणसं पडत नसतील का? कोणत्याच पोलिसांनी या माणसांचे हे अवतार पाहून यांना हटकलं नसेल का, की दिवसाढवळ्या शिताफीने अशी माणसे ट्रेनमध्ये शिरतात. छे ! या गोष्टीची शक्यता तर फारच कमी वाटत होती. एरव्ही जथ्या जथ्याने प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासणीसाठी असणाऱ्या टीसींची देखील यांच्यावर नजर गेली नसेल का? की केवळ आपलं काम करणं या पलीकडे दुसरी जबाबदारी पार पाडू नये अशा सूचना यांना दिलेल्या आहेत. एकूणच ‘राम भरोसे’ सुरक्षेवर आपण प्रवास करतोय हे मला जाणवलं. प्लॅटफॉर्मवर स्टेशन बाहेरच्या परिसरात अशी किती तरी गर्दुल्ली, विचित्र माणसं राजरोसपणे पथाऱ्या मांडून बसलेली आपल्याला दिसत असतात. ही माणसं गरीब आहेत. दुर्दैवी आहेत अशी त्यांची कणव यायची. पण आता घडणाऱ्या घटना ऐकल्यावर वाटतं कोणाचा काय भरोसा, चालत्या ट्रेनमध्ये रिकाम्या डब्यात यातलंच कोणीतरी चढलं तर आणि कोणी काही केलं तर असे नको नको ते विचार येतात. अशा माणसांपासून स्टेशन कधी मुक्त होणार? यासाठी आपण काहीतरी घडण्याची वाट पाहणार आहोत का? ट्रेनच्या प्रवासात असे अनुभव अनेकदा येतात. अशीच एकदा सुट्टीच्या दिवशी जनरल फर्स्ट क्लासमधून प्रवास करत होते. बोरिवली स्टेशनला दोन मुली चढल्या. बहुधा अकरावी-बारावीतील असाव्यात. क्लासेसमधून घरी चालल्या असाव्यात. माझ्या पलीकडच्या बाजूला येऊन बसल्या. ट्रेन सुटली नि दरवाजाला जोराची धडक देऊन तीन मुले चढली. बराच वेळ दरवाजात लटकून, हवेवर केस उडवून मस्ती करत आत आली. अवतारावरून छपरी वाटत होती. त्या दोन मुली समोरून दिसतील अशा बेताने बसली.


बसली म्हणजे एकमेकांना ढुशा देत, त्या दोघींकडे बघून एकमेकांना टाळ्या काय देत होती, हसत काय होती. त्या दोघी थोड्या चलबिचल झाल्या. पुस्तकात डोकं घालून बसल्या. त्यातील एक जण एकटक त्या मुलींकडे पाहू लागला. इतकी घाणेरडी नजर होती त्या मुलाची की ती नजर मलाही खूपत होती. आवडता पदार्थ पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटावं आणि तो पदार्थ कधी खाऊ नि कधी नको व्हावं असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. हे लक्षात येताच त्या बैचेन झाल्या. काय करूया आपण असं एकमेकींशी कुजबुजत होत्या.


हा सगळा प्रकार मी बघत होते. माझ्या आजूबाजूला असणारी माणसंही हा प्रकार बघतच होती. पण सगळे केवळ बघेच.
सरळ उठून कानशिलात लगावावी असं वाटत होतं. पण हल्ली अशा गोष्टी कोणत्याही थराला जातात याचं भान ठेवून मी संयम ठेवला. मी माझ्या जागेवरून उठले. त्या दोघींच्या बाजूलाच जाऊन बसले. डोळ्यांवरचा गॉगल काढला, त्या टपोरी मुलांच्या नजरेला थेट नजर मिळवली, रागाने त्या मुलांकडे मी पाहिले. डकीतून बाहेर पाहू लागली. त्या मुलींशी मी बोलू लागले. त्या मुलींना थोडं हायसं वाटलं. मग बॅगेतून मोबाईल काढला नि नंबर लावल्यासारखं करून फोन कानाला लावला. हे बघितल्यावरती मुलं उठून दरवाजात आली आणि नालासोपाऱ्याला ट्रेन थांबायच्या आधीच पसार झाली. त्या दोघी माझ्याकडे बघून निर्धास्त मनाने हसू लागल्या. मीही दोघींच्या पाठीवर हात ठेवला. पण त्यावेळी मला प्रचंड राग आला होता तो केवळ मोबाईलमध्ये माना खुपसून बघ्याची भूमिका घेणाऱ्या माणसांचा. आपल्या आयाबहिणींवर प्रसंग येईस्तोवर आपण केवळ हाताची घडी घालून बसणार आहोत का.
समाजात थोडी जरी सजगता आजूबाजूच्या माणसांनी दाखवली तरी अनेक प्रसंग टळू शकतील, नाही का?


मी कार्यक्रमाचं निवेदन करत असल्याने अनेकदा एखादा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाल्यामुळे कार्यक्रम संपून, जेवण आटोपून निघेपर्यंत बराच उशीर होतो. मरिन लाइन्स स्टेशन बाहेरील क्रिकेट क्लबमध्ये एकदा कार्यक्रम होता. रात्री १२च्या सुमारास मी मरिन लाइन्सला ट्रेन पकडली होती. महिलांच्या डब्यात चढले होते. चार-पाच बायका डब्यात होत्या. पुढे हळूहळू प्रत्येक स्टेशनवर बायका चढत गेल्या. एक महिला पोलीसही डब्यात होती. ट्रेन स्लो होती. त्यामुळे वसई येईपर्यंत ट्रेन बऱ्यापैकी रिकामी झाली होती. डब्यात चार-पाच बायका राहिल्या होत्या. नालासोपारा स्टेशन येतच होतं. दोन बायका उतरल्या. माझ्या समोरच दरवाजात ती महिला पोलीस होती. दिसायला सुंदर, केस मागे घट्ट बांधलेले आंबाड्याला वरून जाळी, दरवाजात अगदी ताठ उभी होती. अंगापिंडाने तशी मजबूत,भारदस्त दिसत नव्हती तशी म्हणायला बारक्या चणीची दिसत होती. तिला पाहताना मला एका महिला पोलीस अधिकाऱ्यांची मुलाखत आठवली. त्या अधिकारी बाईंना एक प्रश्न विचारण्यात आला होता ,“तुम्ही जास्त सुंदर केव्हा दिसता असं तुम्हाला वाटत ?” यावर त्या म्हणाल्या होत्या ,“युनिफॉर्म मध्ये.” माझ्यासमोरील ती पोलीस त्याच युनिफॉर्म मध्ये खरंच खूप रुबाबदार दिसत होती, त्यात तिचं ताठ उभं राहणं अधिकच ग्रेसफुल वाटत होतं.


हातातील घड्याळात बघितलं तर रात्रीचे दीड वाजत आले होते. वेळ बघायला आडवा केलेला हात खाली करता करताच तिच्याशी हलकेच हसत तिला विचारलं,‘तुम्ही रोज असता का या ट्रेनला ?’ यावर ती म्हणाली ,“ड्युटी लागेल त्याप्रमाणे.” तिने माझ्या पहिल्या प्रश्नाचं लगेचच उत्तर दिल्यावर मी काहीसा आगाऊपणा करत तिला दुसरा प्रश्न विचारला. म्हणजे हा प्रश्न मला कधीपासूनच पडला होता आणि विचारल्याशिवाय राहवतच नव्हतं. शेवटी ती पोलीस असली तरी एक माणूसच आहे, तिला पण आपल्यासारख्या आंनद, राग,भीती सगळ्या भावना आहेत. हा सगळा विचार करत मी तिला माझा आगाऊ प्रश्न विचारला,” तुम्हाला एवढ्या रात्री एकट्याने ट्रेनमधून प्रवास करताना भीती नाही का वाटतं? “ माझा हा प्रश्न ऐकल्यावर ती हसली. बहुधा तिने हा विचार केला असावा पोलीस रक्षण करण्यासाठी आहेत आणि ही बाई त्यांनाच हा प्रश्न विचारते की भीती नाही का वाटतं? तिची प्रतिक्रिया पाहून मी तिला स्पष्टीकरण देत म्हणाले,“म्हणजे अचानक कोणी जीवघेणं हत्यार घेऊन डब्यात घुसलं तर तुम्ही काय करणार ?” तिने मला मोकळ्या मनाने उत्तर दिलं,“ताई मला पण कधी कधी भीती वाटते.


इथे नालासोपारा – विरारच्या मध्ये कधी कधी बराच वेळ ट्रेन थांबते. . असं वाटतं अचानक कधी कोण डब्यात चढलं तर. आपल्यकडे पिस्तुल नाही फक्त काठी आहे. फोनवरून इन्फॉर्म करेपर्यंत काही बरं वाईट घडलं मग. हा विचार मनात आला की मी भीतीला मागे सारते, अॅक्शन मोडमध्ये उभी राहते.”
तिच्याशी बोलता बोलता विरार – नालासोपाऱ्याच्या मध्ये थांबलेली ट्रेन आम्हाला कळलीच नाही आणि ट्रेन फलाटाला लागली. ट्रेन मधून उतरताना मी तिला बाय केलं आणि मनोमन एक कडक सॅल्युट केला.


तिच्या आत्मविश्वासाला. तिचं बोलणं ऐकल्यावर मला आठवण झाली होती ती दहशतवादी कसाबला पकडून देणाऱ्या आमच्या शूरवीर दंडुकधारी शहीद तुकाराम ओंबळेची. काय ते मनोधैर्य, अभिमान वाटतो. आपल्या पोलीस दलाचा. त्या महिला पोलिसाच्या उत्तराने अधोरेखित केलं की प्रतिकार करायला आवश्यकता आहे ती मनोधैर्याची नि हे मनोबल तयार होण्यासाठी आवश्यकता आहे ती योग्य प्रशिक्षणाची.


शालेय पातळीपासून बालवयापासूनच शिक्षणव्यवस्थेत मुलींना सक्तीने आत्मसंरक्षणाचे, गुड टच बॅड टच याचे धडे देण, ही काळाची गरज आहे. कारण द्रौपदीला वस्त्र पुरवणारा कृष्ण आजच्या काळात आपल्याला सापडणारा नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील टकमक गडावरील कठोर शिक्षेसारखा धाकही आज राहिलेला नाही. बघ्यांचीच गर्दी जास्त आहे नि कठोर व जलद न्याय आपल्याच व्यवस्थेच्या पायऱ्यांवर हतबलतेने रेंगाळत आहे.
Ashwinibhoir23@gmail.com

Comments
Add Comment

“माझं बाळ हट्टी नाही, ते मला काही तरी सांगतंय!”

आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू अभिषेक आणि समिधा दोघेही तीन वर्षांच्या निहारला घेऊन एका मोठ्या हॉटेलमध्ये

अस्तित्व

प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ अंदमानची राजधानी श्री विजयपुरम (जुने नाव-पोर्ट ब्लेअर) इथे विमान वा बोटीने

दरड काय असते?

विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील शिवम या मुलाची त्याच्या मित्रांना माहिती देणे सुरू होते.“सेंद्रिय खडक कसे असतात?”

प्रेम आईचे

कथा; रमेश तांबे एका गोठ्यात गाय आणि तिचं वासरू राहायचं. सकाळचे ९ वाजले की, त्यांचा शेतकरी त्या दोघांना रानात

मधुर, चांगली वाणी नेहमीच प्रशंसनीय

गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर मानवाच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात प्रभावी साधन म्हणजे त्याची वाणी. आपण

पश्चाताप बदल घडवितो

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात चुका होणे स्वाभाविक आहे. कोणीही परिपूर्ण नसतो; परंतु त्या