काल्हेर, वाशी, गेट वे ऑफ इंडिया आणि नवी मुंबई विमानतळ स्थानकांचा समावेश
मुंबई : मुंबईकरांना गर्दी आणि वाहतूक कोंडीपासून मुक्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मुंबई वॉटर मेट्रो’ प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या विविध स्थानकांच्या संकल्पना आणि आराखड्यांचे (डिझाइन) सादरीकरण बुधवारी मंत्रालयात पार पडले. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.
आयआयटी मुंबईच्या ‘इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर’च्या वतीने वॉटर मेट्रो स्थानकांच्या विविध संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत प्रामुख्याने काल्हेर, वाशी, गेट वे ऑफ इंडिया आणि प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वाच्या स्थानकांच्या ले-आऊटवर सखोल चर्चा करण्यात आली. या सादरीकरणामध्ये प्रामुख्याने स्थानकांवरील डॉकची रचना कशी असावी, प्रवाशांची सुरक्षित आणि सुलभ हाताळणी कशी केली जाईल, गर्दीचे व्यवस्थापन (ट्राफिक मॅनेजमेंट), तसेच जलमार्गावरील बोटींची हालचाल आणि वळण व्यवस्थेबाबत नियोजन मांडण्यात आले.
या बैठकीला आमदार दीपक केसरकर आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्थानकांची रचना करण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले.






