वॉशिंग्टन, डी.सी. : मागील आठवड्यात व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनरमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली. डोनाल्ड ट्रम्प, जे. डी. व्हान्स यांच्यासह अनेक मोठे नेते आणि अधिकारी यावेळी घटनास्थळी हजर होते. ही गोळीबाराची ही घटना ताजी असताना सोमवारी व्हाईट हाऊसच्या परिसरात गोळीबाराची घटना घडली. व्हाईट हाऊसच्या परिसरात बंदूकधारी व्यक्तीने सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार केला. या चकमकीत संशयित व्यक्ती जखमी झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे व्हाईट हाऊसमध्ये काही काळ ‘लॉकडाऊन’ केला होता.
अमेरिका सीक्रेट सर्व्हिसचे उपसंचालक मॅथ्यू क्विन यांनी गोळीबाराच्या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. वॉशिंग्टन डी.सी. मधील १५ वा मार्ग आणि इंडिपेंडन्स एव्हेन्यूच्या परिसरात ही घडली. व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्सच्या बाहेर गस्त घालणाऱ्या एजंटस् ना एका संशयित व्यक्तीकडे बंदूक असल्याचे दिसून आले. सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस करण्यासाठी जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, त्या व्यक्तीने पळ काढत अधिकाऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला, अशी माहिती मॅथ्यू क्विन यांनी दिली. तसेच गोळीबाराची घटना घडण्यापूर्वी उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांचा ताफा त्याच भागातून गेला होता, असे क्वीन माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रत्युत्तर म्हणून सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी देखील संशयित व्यक्तीच्या दिशेने गोळीबार केला यात, संशयित व्यक्ती जखमी झाला आहे. त्याला तत्काळ ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चकमकीत संशयिताच्या गोळीबारात एक पादचारी किरकोळ जखमी झाला आहे. जखमी झालेली ही व्यक्ती अल्पवयीन असल्याचे रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले असून, त्याला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला नेमका का केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे क्विन यांनी स्पष्ट केले आहे.






