Tuesday, May 5, 2026

Raghav Chadha : पंजाब सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत आहे; राघव चढ्ढा यांची पंजाब सरकारवर जहरी टीका

Raghav Chadha : पंजाब सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत आहे; राघव चढ्ढा यांची पंजाब सरकारवर जहरी टीका

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षात सामील झालेले राज्यसभा खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी आज म्हणजेच मंगळवार ५ मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांची भेट घेत पंजाबमधील राजकीय परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी आम आदमी पक्ष सरकारवर राज्य यंत्रणेचा कथित गैरवापर केल्याचा आरोप करत औपचारिक तक्रार देखील सादर केली आहे.

विरोधी पक्षात गेलेल्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर :

भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राघव चड्ढा यांनी आरोप केला की, पंजाबमधील ‘आप’ सरकार (AAP Party) विरोधी पक्षात गेलेल्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत आहे. विशेषतः संदीप पाठक यांच्या विरोधात “द्वेषयुक्त आणि बनावट” एफआयआर दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याशिवाय, माध्यमांद्वारे अटकेच्या अफवा पसरवून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा त्यांनी केला.

आप पक्षाचा दुटप्पीपणा :

चड्ढा यांनी पुढे सांगितले की, विजिलन्स विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पंजाब पोलिस यांचा सूडबुद्धीने वापर होत असल्याचा आरोप आहे. “जोपर्यंत नेते ‘आप’मध्ये असतात, तोपर्यंत ते प्रामाणिक मानले जातात; मात्र पक्ष सोडताच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात,” असे म्हणत त्यांनी या भूमिकेला दुटप्पीपणा म्हटले.

दरम्यान, या घडामोडींना आणखी वेग देत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही राष्ट्रपतींची भेट घेण्याची तयारी दर्शवली असून, त्यांनी या आरोपांवर आपली बाजू मांडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंमध्ये राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ :

राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे खळबळ उडाली असून, केंद्र आणि राज्य सरकारांमधील संबंधांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता राष्ट्रपती कार्यालयाकडून या तक्रारीवर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा