Monday, May 4, 2026

Trisha Krishnan: निकालानंतर त्रिशा कृष्णन थेट विजयच्या निवासस्थानी

Trisha Krishnan: निकालानंतर त्रिशा कृष्णन थेट विजयच्या निवासस्थानी

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात आज मोठा बदल पाहायला मिळाला आहे. ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती, असं चित्र समोर आलं आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) या विजयच्या पक्षाने दमदार कामगिरी करत बाजी मारली आहे. तामिळनाडूच्या राजकारणात TVK हा आता सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे.

थलपती विजयचा TVK पक्ष १०५ पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. मतदानानंतर जवळपास सर्व एक्झिट पोल्सनी द्रमुक (DMK)च्या विजयाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्ष निकालात चित्र पूर्णपणे उलट झालं आहे. द्रमुक (DMK) आणि अण्णाद्रमुक (AIADMK) हे दोन्ही पक्ष आता विरोधी पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत.

TVK च्या या प्रचंड यशामागे पक्षाचे संस्थापक विजय यांचा मोठा वाटा मानला जात आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती. तब्बल २७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर त्यांनी पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. याच काळात अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबतचं त्यांचे कथित प्रेमसंबंधही चर्चेचा विषय झाले होते.

TVK च्या या ऐतिहासिक यशानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर जल्लोष सुरू झाला आहे. पुढील मुख्यमंत्री म्हणून विजय यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप विजय यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. ते सध्या कुठे आहेत, याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. संपूर्ण निकाल स्पष्ट झाल्यानंतरच ते माध्यमांसमोर येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आजचा दिवस विजय आणि त्रिशा कृष्णन या दोघांसाठीही खास ठरला आहे. एका बाजूला विजय यांनी राजकारणात मोठं यश मिळवलं आहे, तर दुसऱ्या बाजूला आजच त्रिशा कृष्णनचा वाढदिवस आहे. त्यामुळे हा दुहेरी आनंदाचा क्षण मानला जात आहे.

दरम्यान, विजय अद्याप समर्थकांसमोर आलेले नसले तरी त्रिशा कृष्णन या थेट त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचं दिसून आलं आहे. तिरुमाला येथे दर्शन घेतल्यानंतर त्या विजय यांच्या घरी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा