Monday, May 4, 2026

Nashik : शिक्षिकेचं संतापजनक कृत्य; १० वीतील तरुणीला बेडरुममध्ये पाठवलं, अन तिथेच नको नको ते घडलं...

Nashik : शिक्षिकेचं संतापजनक कृत्य; १० वीतील तरुणीला बेडरुममध्ये पाठवलं, अन तिथेच नको नको ते घडलं...

नाशिक: नाशिक शहरात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या गुलशन कॉलनी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे क्लासचालक शिक्षिकेच्याच मदतीने तिच्या भाच्याने तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. (Nashik Crime News)

नेमकं प्रकरण काय ? मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नाशिकमधील पखाल रोडवरील गुलशन कॉलनीतील एका इमारतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. फिर्यादी मुलगी ही संशयित आरोपी राशेदा राशिद शेख यांच्याकडे शिकवणीसाठी जात होती. त्या दरम्यान,राशेदा शेख (रा.तिसरा माळा, कसक पार्क, गुलशन कॉलनी, पखालरोड, नाशिक) हिने विविध कारणांमधून फिर्यादीला त्यांच्या बेडरूममध्ये पाठवले, तिथे आरोपी सिब्तेन रजा शेख (रा.गरीब नवाज मस्जिदसमोर, मेहबूब नगर, वडाळा गाव, नाशिक) या नराधमाने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. (Nashik Crime News)

आणखी धक्कादायक म्हणजे हा प्रकार कोणालाही न सांगण्यासाठी आरोपींनी पीडित मुलीला वेळोवेळी धमकावले आणि प्रलोभनेही दाखवली होती. अखेर वारंवार होत असलेल्या या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने धाडस दाखवले आणि पोलिसांत धाव घेतली. यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोउनि शेख पुढील तपास करत आहेत. (Nashik Crime News)

आरोपी सिब्तेन रजा शेख आणि राशेदा राशिद शेख यांच्या अटकेसाठी पोलीस पथक शोध घेत असून, ते अद्याप फरार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >