Monday, May 4, 2026

Birth and Death Records : जन्म आणि मृत्यू नोंदींमध्ये अनियमितता, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करा

Birth and Death Records : जन्म आणि मृत्यू नोंदींमध्ये अनियमितता, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या ८७ हजार पेक्षा अधिक जन्म आणि मृत्यू नोंदींमध्ये अनियमितता समाेर आली असून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करण्याची आणि त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी केली आहे. महापौर रितू तावडे आणि मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना लिहिलेल्या पत्रात आमदार साटम यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी (एमएचओ) केलेल्या नोंदणीमधील गंभीर विसंगतींवर प्रकाश टाकला आहे. या नोंदी अनिवार्य नागरी नोंदणी प्रणाली ऐवजी (सीआरएस) सॅप पोर्टलवर करण्यात आल्या असून त्यांच्या सत्यतेची सध्या पडताळणी सुरू असल्याचे आमदार साटम यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

“मुंबई महापालिकेने प्रभागनिहाय बनावट नोंदण्यांचे वर्गीकरण सुनिश्चित करावे आणि त्यात सामील असलेल्या एमएचओंची ओळख पटवावी. दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे आणि योग्य कायदेशीर प्रक्रियेनुसार गुन्हे नोंदवावेत,” अशी मागणी आमदार साटम यांनी केली आहे. या कथित घोटाळ्यामुळे घुसखोरांना बनावट कागदपत्रे मिळवून महापालिकेच्या कामकाज प्रणालीमध्ये (सॉफ्टवेअर ) प्रवेश करणे शक्य झाले असावे. ज्यामुळे शहराच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अहवालानुसार, २०२४ ते २०२६ या कालावधीत जन्म-मृत्यु नोंदीच्या एसएपी प्रणालीद्वारे ८७,००० हून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या असून सीआरएस पोर्टलवर केवळ ३३,७७२ नोंदी करण्यात आल्या, या प्रकरणावर आमदार साटम यांनी बोट ठेवले आहे.

मुंबई महापालिकेच्या अनेक प्रभागांमधील एमएचओ यांनी भारताच्या रजिस्ट्रार जनरलने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. तसेच केवळ अनिवार्य सीआरएस पोर्टलवरच नव्हे तर मुंबई महापालिकेच्या अंतर्गत प्लॅटफॉर्म असलेल्या जुन्या सॅप-सीपीडब्ल्यूएम प्रणालीवरही ते दुरुस्त्या करत होते, ही गंभीर बाब तपासात समोर आल्याचा दावा आमदार अमीत साटम यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >