नंदूरबार : चिकन म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. आणि तुम्ही देखील याच अनेकांमध्ये असाल तर वेळीच सावध व्हा कारण महाराष्ट्रात नव्या संकटानं शिरकाव केला आहे. आधीच राज्यातील नागरिक कडक उन्हामुळे होरपळून निघाले आहेत. राज्यात आतापर्यंत उष्माघाताने 9 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. हे संकट असतानाच आता राज्यात दुसरं संकट धडकलं आहे. राज्यात बर्ड फ्ल्यूने शिरकाव केला आहे. ( Nawapur News )
नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूचा कहर
नंदूरबार जिल्ह्याच्या नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूने(Bird flu ) कहर केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मारल्या जाणार आहेत. बर्ड फ्ल्यू राज्यात इतर ठिकाणी फोफावला तर अनेकांचे चिकन खाण्याचेही वांदे होणार आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने 1 लाख 40 हजार कोंबड्यांचे किलिंग केले जाणार आहे. तीन पोल्ट्री फार्मचे सॅम्पल इंदूरच्या प्रयोगशाळात पाठवले होते. ते सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Bird flu wreaks havoc in Navapur)
परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मचे सॅम्पल घेणार
जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने प्रशासनही खडबडून जागं झालं आहे. बर्ड फ्ल्यूचा शिरकाव रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावलं उचलली आहेत. एक तालुकास्तरीय समिती तयार करण्यात आली असून, नवापूरच्या परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मचे आता सॅम्पल घेतले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिली आहे. (Bird flu wreaks havoc in Navapur)
1 लाख 40 हजार कोंबड्या मारणार
पॉझिटिव्ह आलेल्या पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या मारणार असल्याची माहिती समोर आली आहे . इतर कोंबड्यांना आजाराची लागन होऊ नये आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. एक किलोमीटरच्या परिसरात असलेल्या सहा पोल्ट्री फॉर्ममध्ये 1 लाख 40 हजार कोंबड्या आहेत. या सर्व कोंबड्या ठार मारल्या जाणार आहेत, अशी माहितीही मिताली सेठी यांनी दिली. त्यासोबतच ज्या पोल्ट्री फार्मचं नुकसान होणार आहे, त्यांची माहिती शासनाकडे पाठवून शासनाच्या नियमानुसार त्यांना मदत दिली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.






