समाधी साधन संजीवन नाम

भारतीय संत : डॉ. अनुराधा कुलकर्णी


श्रीज्ञानेश्वरांच्या पुढील अभंगाचा अर्थ-भावार्थ पाहू या.....


समाधि साधन संजीवन नाम ।
शांती दया सम सर्वाभूती ।।
शांतीची पै शांती निवृत्ति दातारू ।
हरिनाम उच्चारू दिधला तेणे ।।
शम दम कळा विज्ञान सज्ञान ।
परतोनि अज्ञान न ये घरा ।।
ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट ।
भक्तिमार्गे नीट हरिपंथी ।।


ज्ञानियांचे राजे श्रीज्ञानेश्वरमहाराज या अभंगातून आपणास अध्यात्मातील एक महत्त्वाचे गुह्य सांगत आहेत. ते म्हणतात की समाधी साधण्यासाठी संजीवन हरिनामाचे अखंड उच्चारण हाच एक मार्ग आहे. ज्ञानेश्वरांचा हा सिद्धान्त समजून घेण्यासाठी प्रथम आपण ‘समाधी’ या शब्दाचा मागोवा घेऊ या.


‘समाधियते अस्मिन् बुद्धिः इति समाधि’ किंवा ‘समाधियते चित्तम् अस्मिन् इति समाधि’ अशा समाधीच्या व्याख्या केल्या जातात. म्हणजे ज्यात बुद्धी स्थिर केली जाते किंवा ज्यात चित्ताचे समाधान केले जाते ती समाधी. म्हणजेच समाधीत आनंदपूर्ण अविचलता असते, हे या व्याख्यांमधून सिद्ध होते.


समाधी या शब्दाची व्युत्पत्ती, सम + आ + ध्यै = समाधी अशी आहे. यात ‘ध्यैः’ म्हणजे चिंतन करणे व ‘आ’ म्हणजे पर्यंत. ज्याचे चिंतन चालले आहे, त्याच्यापर्यंत चिंतकाची पातळी सम होणे म्हणजे समाधी होय. म्हणजेच चिंतक व चिंत्यविषय यांची एकतानता होणे, याचा अर्थ समाधी लागणे हा होय. या अभंगातील चिंत्यविषय अर्थातच परमात्मा आहे. समाधीत जीवाची परमात्मस्वरूपाशी एकतानता होते.


समाधीसाधना करणारा साधक, एकांतात डोळे बंद करून दृढ आसनस्थ होतो. त्यामुळे त्याच्या सर्व इंद्रियांचे बाह्य विषय स्वीकारण्याचे कार्य काही अंशी थांबू शकते. पण इंद्रिये जरी समाधीसाधनेच्या काळात विषयांपासून परावृत्त झालेली दिसत असली तरी विषयवासनांनी गजबजलेले मन मात्र जागृत असते. मनातील संकल्पविकल्प, भावभावना, विचार यांचा गोंधळ अविरत चालूच असतो. त्या मनाला गप्प कसे करावे? समाधीत अध्याहृत असलेले आत्मचिंतन आणि त्या चिंतनातून साधणारी परमात्मतद्रूपता यात रजोगुणी मनाचा फार मोठा अडसर असतो. या मनाचे उन्मन होण्यासाठी ज्ञानेश्वरांनी संजीवन नामाचे साधन सांगितले आहे.


ज्ञानेश्वरांनी हरिनामाला संजीवन हे विशेषण का बरे वापरले असावे? जे जे निर्माण होते ते ते नष्ट पावते. नाम निर्माण होत नाही, ते असतेच. म्हणून ते अविनाशी होय. अर्थात हे नाम अनादिअनंत परमात्म्याचे नाम आहे. इतर कुठल्याही नामात सुखदुःखादी द्वन्द्व भरलेले असते. द्वन्द्व म्हणजेच प्रपंच. हरिनाम हेच एक निर्द्वन्द्व, निर्विकल्प आहे. म्हणूनच ते संजीवन आहे.


हे नाम अनंतकोटी ब्रह्मांडनायकाचे असल्याने तेही तितकेच अनंत शक्तियुक्त आहे. ते कुठल्याही पार्थिव गोष्टींनी घडत नाही की मोडत नाही. ते वैखरीने उच्चारण्याचीही गरज नसते. तर जे आपल्या श्वासाच्या लयीत भरूनच आहे, त्याचे फक्त स्मरण करावयाचे. अशा या नामस्मरणातून प्रपंचात्मक द्वन्द्वे निर्माण होत नसल्याने मनाला गप्प बसणे भाग पडते. मन त्या हरिनामाच्या खुंटीला जणु बांधले जाते. मन निःशब्द झाल्यावर श्वासोच्छवास आपोआप संथ होऊन प्राणायाम होऊ लागतो. बहिर्मुखतेमुळे इतस्ततः झालेली प्राणशक्ती एकाग्र होऊ लागते. ज्या आनंदासाठी आपण सर्वदूर फिरलो, तो आनंद आपल्यातच असल्याचा अनुभव येऊ लागतो. आणि मग अकल्पित, असीम गाढ शांतीने अंतःकरण भरून जाते.


समाधीसाधना येथवरच संपत नाही. आनंदमय आत्मस्वरूपाची अंतरंगात ओळख झाली की मग जाणवते की तो आनंद ओसंडून वाहतोय. आत्मतृप्तीने मिटलेले नेत्र जेव्हा उघडतात तेव्हा ते आत्मस्वरूपच चराचरात भरलेले असल्याचे दिसून येते. भूतमात्रांबद्दलच्या प्रीतीचा, दयेचा सागर आपल्या हृदयात उसळत असलेला साधकाला प्रतीत होतो. कोणी लहान असो वा थोर, सुष्ट असो वा दुष्ट, एकच परमात्मचैतन्य सर्वांमध्ये ओतप्रोत भरलेले दिसते. त्यामुळे सर्वाभूती साम्यभावाची दृष्टी साधकास लाभते.


हे विश्वचि माझे घर - अशा अनुभूतीप्रत गेलेल्या ज्ञानेश्वरांनी या प्रेमलाभाचे सारे श्रेय आपल्या गुरूमाउलीला दिले आहे. त्यांचे सद्गुरू श्रीनिवृत्तिनाथ कसे आहेत? तर साक्षात शांतीला लाभलेली ते शांती आहेत. समाधीमुळे लाभणारी जी शांती, त्या शांतीप्रत नेणारे सद्गुरू स्वयं शांतिरूप आहेत. मी, माझेपणा नसल्याने शिष्यास आत्मशांती प्रदान करूनही त्यांना त्याविषयी दातेपणा नाही. प्रपंचभासातून निवृत्त असूनही आपल्या भावंडांच्या आध्यात्मिक संगोपनाची, वडीलभावाची जबाबदारी त्यांनी सोडलेली नाही. पण त्यांना स्वतःच्या कर्तेपणाचा यात्किंचितही अभिनिवेश नाही. म्हणूनच निवृत्तिनाथ अथांग शांतिरूप आहेत. अशा या सद्गुरू निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना हरिनामाचा उच्चारू दिला.


ज्ञानेश्वरांच्या या अभंगातील ‘उच्चारू’ आणि ‘दिधला’ या दोन्ही शब्दांना सखोलार्थ आहे. सद्गुरू आपल्या सद् शिष्यास हरिनाम म्हणण्यास नुसते सांगत नाहीत तर परावाणीच्या मूळापासून ब्रह्मरंध्रापर्यंत हा हरिनामाचा उच्चार कसा विकसित करावा, याचे प्रशिक्षण देतात. हे प्रशिक्षण विशिष्ट कालावधीचे वगैरे असे नसते तर फक्त गुरूमाउलीचा कृपाहस्त, त्यांच्या शिष्यत्वाच्या कसोटीत परिपूर्ण उतरलेल्या शिष्योत्तमाच्या मस्तकावर विराजमान होतो आणि सद्गुरूंच्या दिव्य देहातील जागृत ज्ञानशक्ती शिष्याच्या अंतरी संक्रमित होते. सद्गुरूंच्या पंचप्राणात सामावून गेलेले हरिनाम शिष्याच्याही प्राणांमध्ये भरले जाऊ लागते. असे हे हरिनाम उच्चाराचे देणे आहे. अनंत परमात्म्याचे अनंत शक्तिपूर्ण नाम सद्गुरूकडून शिष्य आपल्या प्रगाढ श्रद्धेच्या पदरात घेतो. हरिनाम त्याच्या रोमारोमात जाऊन बसते. यानंतरच्या समाधीसाधनेत जेव्हा मनाचा व प्राणाचा लय होतो तेव्हा हरिनामयुक्त चैतन्यशक्ती शिवात समरस होते. श्रीनिवृत्तिनाथांनी जो हरिनाम उच्चारू दिधला त्यामुळे ज्ञानदेवांचे विश्व बदलून गेले. त्या उच्चाराने त्यांच्या संपूर्ण जाणीवांचा स्तरच वेगळा झाला! त्यांचा अनुभव शारीर चौकटीला भेदून विश्वंभर झाला!
शम म्हणजे मनाचे समाधान आणि दम म्हणजे इंद्रियांवरील नियंत्रण. या शमदमाच्या व्याख्या ज्ञानदेवांसाठी निराळ्या झाल्या. ‘योगः कर्मसु कौशलम्’ प्रमाणे शमदमातले


आगळेच कलाकौशल्य ज्ञानदेवांच्या ध्यानी आले. ज्ञानदेवांचा ‘मीपणा’ विश्वव्यापी झाल्यामुळे त्यांच्यासाठी विश्वापासून काही मिळवायचे शिल्लकच राहिले नाही. साक्षात समाधान स्वतः झाल्यामुळे, पाण्याला पाण्याची तहान कशी लागणार?, या न्यायाने मनाचे समाधान होणे, ही प्राक्रियाच राहिली नाही. तसेच जेव्हा सर्व विषयांचा विषय हरी हाच होतो, तेव्हा त्या इंद्रियांचे द्वारे बंद न करता उलट ती अखंड, पूर्ण खुली करणे योग्य व आनंददायी ठरले. त्यामुळे दमाचे काम राहिले नाही. ज्ञानदेव म्हणतात, विज्ञान सज्ञान झाले. म्हणजे प्रपंच ज्ञानमय झाला. ज्ञानदेव प्रपंचाला विज्ञान म्हणतात. मानवी संस्कृतीसमाधीसाधनेमुळे सर्वदेशी, सर्वकाली असणाऱ्या अद्वय परमात्म्याचा अनुभव आला. त्यामुळे प्रपंचातील भेदमयतेचा भास तर दूर झालाच शिवाय त्या प्रपंचातूनही परमात्म्याची अभेदलीला प्रत्ययास येऊ लागली. म्हणून ज्ञानदेवांसाठी प्रपंच सज्ञान झाला. अशा स्वरूपस्थ झालेल्यांच्या घरी अज्ञानाचे परतणे नाही. ज्याची अखंड ज्ञानमय समाधी लागली आहे, तेथे व्युत्थान संभवत नाही. याउलट ज्याला क्षणभरच प्रभूच्या एकरसतेची जाणीव झाली त्याला दुसऱ्याच क्षणी भेदमय प्रपंच (अज्ञान) दिसू लागतो. पण श्रीहरीच्या संजीवन नामस्मरणामुळे साधलेल्या अखंड समाधीने अज्ञानाचे नावही राहात नाही.


या अखंड समाधीची सिद्धी ज्ञानदेवांना गुरूकृपेमुळे साधली. त्या समाधीचे साधन, जे श्रीहरीचे संजीवन नाम, त्या नामाच्या उच्चारातली अवीट गोडी त्यांना अनुभवास आली. ज्ञानदेव आपल्याला मोठ्या ममतेने मार्गदर्शन करतात की हरीच्या पंथात म्हणजे संप्रदायात सामील व्हायचे असेल, म्हणजेच देहपरता सोडून विश्वात्मक व्हायचे असेल तर चला, त्यासाठी संजीवन नामभक्तीचा सरळ नीट मार्ग आहे.


Anuradha.klkrn@gmail.com

Comments
Add Comment

मानवी संस्कृती

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आज जगात जे काही चाललेले आहे ते सर्वकाही संस्कारांमुळे चाललेले आहे. अनिष्ट

आत्मशांती

आत्मज्ञान : प्राची परचुरे-वैद्य आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि गोंधळलेल्या जगात ‘शांती’ हा शब्द जरी सहज

प्रपंच करावा नेटका

ऋतुराज : ऋतुजा केळकर प्रपंच हे वन, मोहाचे काटे दाटती । ध्यान दीप उजळे, अंधारे सारे हटती ॥ गुरुनाम फुले, सुवास

ठरलं तर ! इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात होणार 'या' महाराजांचे कीर्तन

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार

श्रद्धा की अंधश्रद्धा?

आत्मज्ञान : प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनाच्या घडणीत ‘श्रद्धा’ हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

आत्मतेजाचा निनाद अंतरी सद्गुरूंचा नाद

ऋतुराज : ऋतुजा केळकर “वाऱ्याच्या लयीसंगे विवेक जागतो... स्मरणातल्या सुरांनी मन शुद्ध होतं... सद्गुरूंच्या कृपेने