आदिवासी हक्काच्या लढाईसाठी बळ

जंगल राणी न्यूज प्लॅटफॉर्म, फोर्ब्स इंडिया सन्मान
उडिसाच्या एका अग्रगण्य टीव्ही चॅनलमध्ये सुमारे सहा महिने काम केल्यानंतर, माझ्या लक्षात आले की मल्कानगिरी आणि आदिवासी जीवनाबद्दलच्या कथांना मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये स्थान मिळत नाही. कमी पगार आणि मर्यादित संसाधनांशी संघर्ष करूनही, मी हार मानली नाही. २०१७ मध्ये एनडब्ल्यूएमआयतर्फे पत्रकारांसाठीची फेलोशिप मिळाली. त्या शिष्यवृत्तीचा वापर करून मी एक लॅपटॉप आणि कॅमेरा विकत घेतला. आदिवासी समाजाच्या कथा, व्यथा निसंकोचपणे मांडता याव्यात तसेच आदिवासी देखील समाजाच्या मानवजातीचा एक भाग आहेत हे जगाला दाखवून द्यावं यासाठी मी 'जंगल राणी' हे सोशल मीडिया-आधारित न्यूज प्लॅटफॉर्म सुरू केलं. फोर्ब्स इंडियांनं माझ्या कामाची दखल घेऊन मला ‘फोर्ब्स इंडिया वुमन पॉवर लिस्ट २०२४’ मध्ये स्थान दिलं, ज्यात देशभरातील २३ आत्मनिर्भर महिलांचा समावेश होता.


लहानपणी आपल्या आईसोबत घनदाट जंगलातील वाटेवर लाकडं गोळा करणं, महुआची फुलं वेचणं आणि गायी चरायला नेणं अशी कामं करणाऱ्या जयंती बुरुडा आज आदिवासी समाजाचा आवाज बनल्या आहेत. उडिसामधील एका छोट्या गावातून पुढे येऊन पत्रकारिता आणि सामाजिक बदलाच्या क्षेत्रात एक खंबीर व्यक्तिमत्त्व बनलेल्या जयंती यांनी, आदिवासी लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपली लेखणी आणि कॅमेरा यांचा साधन म्हणून वापर केला. त्या आदिवासी समाजाच्या आवाज बनल्या.
जयंती बुरुडा यांच्या या ध्यासाची आणि धैर्याची कहाणी, त्यांच्याच शब्दांत...



जन्म उडिसा, ११ भावंडं


माझा जन्म उडिसा राज्यातील मल्कानगिरी येथील सर्पल्ली या छोट्या गावात झाला. मी ११ भावंडांमध्ये नववी आहे. लहानपणी मला अभ्यास करण्याची इच्छा नव्हती. आईसोबत जंगलात जाऊन लाकडं तोडणं, मजा करणं आणि दिवसभर खेळणं यावरच माझं लक्ष असायचं. माझे वडील खूप कडक होते. ते शिक्षक होते. माझी आई शिकलेली नसली तरी, आम्ही शिकावं अशी तिची इच्छा होती. माझ्या वडिलांनी एका आदिवासी वस्तीत शाळा सुरू केली, जिथे जेमतेम ८-९ मुलंच शिकण्यासाठी येत असत. शाळेत दोन शिक्षक होते. आम्हीही तिथेच शिकलो.


या १० मुलांच्या वर्गात, दहावी उत्तीर्ण होणारी मी एकमेव मुलगी होते. पुढील शिक्षणासाठी कोणतीही सोय नव्हती. मी बारावीसाठी घरापासून २५ किलोमीटर दूर असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मी ओडिया भाषेत शिकले, पण कॉलेजमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेत शिकवले जात होते, ज्या भाषा मला अजिबात येत नव्हत्या. आम्ही राहायचो त्या भागात चौदा आदिवासी समुदाय आहेत. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. माझी मातृभाषा कोया आहे. आम्ही आदिवासी दिस्या भाषा बोलतो. आमच्या भाषेत कोणतीही पुस्तके नाहीत. आम्हाला शाळेत जाऊन ओडिया भाषेतच शिकावे लागते. अनेक आदिवासी मुलांना ती भाषाही येत नाही. त्यामुळेच ते अर्धवट शिक्षण सोडून देतात.
आईचा कर्करोगाने मृत्यू आणि वडिलांची जबाबदारी


कॉलेज झाल्यावर, मी जवळच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मजुरांच्या मुलांना शिकवणी द्यायला सुरुवात केली. पुढे मी इंडियन रेड क्रॉस सोसायटी या स्वयंसेवा संस्थेशी जोडली गेले. बारावी पूर्ण झाल्यावर मी पदवीसाठी प्रवेश घेतला. माझी आई कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात होती आणि वडिलांचा अपघात झाला होता. माझ्या बहिणी त्यांच्या सासरी होत्या. माझे भाऊ विभक्त झाले होते. तिची काळजी घेण्यासाठी मी आणि माझी धाकटी बहीण दोघीच होतो. काही दिवसांतच माझ्या आईचे निधन झाले आणि वडिलांची व घराची जबाबदारी माझ्यावर आली. पदवीनंतर माझे शिक्षण थांबले.



पत्रकारितेचा अभ्यासक्रम


वडिलांची आणि घराची जबाबदारी सांभाळत असतानाच उरलेल्या वेळेत मी मुलांना शिकवत असे. सरकारी रुग्णालयांमध्येही भाषेचा अडथळा असल्याने, तेथे जाऊन आदिवासी लोकांना उपचार मिळवून देण्यास मी मदत करत असे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मी पत्रकारितेचा अभ्यासक्रम करण्यासाठी कोरापुटच्या केंद्रीय विद्यापीठात गेले. माझी फी भरण्यासाठी माझ्या मित्रांनी पैसे गोळा केले. मला सर्वतोपरी मदत केली. पत्रकारिता आणि जनसंवादातील दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, मी भुवनेश्वर येथील एका स्टुडिओमध्ये इंटर्नशिप करत असताना कॅमेरा चालवायला, मुलाखती घ्यायला आणि चित्रपट संपादित करायला शिकले.
पॅड बँक सुरू


गावात मुली दर महिन्याला मासिक पाळी दरम्यान कापड वापरतात. म्हणून, मी त्यांच्यासाठी पॅड बँक सुरू केली, जिथे त्या मोफत पॅड घेऊ शकतात. आम्ही मल्कानगिरी आणि आसपासच्या परिसरातील आठ ठिकाणी पॅड बँक स्थापन केल्या आहेत. आम्हाला इतर संस्थांकडून पाठिंबा मिळतो आणि आम्ही या मुलींना पॅडचे वाटप करतो.
बडी दीदी युनियन


माझ्या भावाच्या मित्रांच्या मदतीने, मी एक व्हिडिओ कॅमेरा विकत घेतला आणि चॅनलसाठी रिपोर्टिंग सुरू केले. या काळात, मला वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या अशा मुलीही भेटल्या ज्या कमी वयात गरोदर राहत होत्या. मी त्यांच्या समस्या मांडायला सुरुवात केली. त्यांना मदत करण्यासाठी, मी २०१८ मध्ये 'बडी दीदी युनियन' सुरू केली. आदिवासी समुदायातील महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेचे महत्त्व आणि प्रजननाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही तरुण महिला स्वयंसेवकांची एक चळवळ बनली आहे. जवळच्या गावातील मुलांमध्ये वाचनाची सवय लागावी म्हणून मी मल्कानगिरीमध्ये एक छोटे खुले ग्रंथालयही सुरू केले आहे.


गेली ८ वर्षे मी चार मुलांचे संगोपन करत आहे आणि त्यांच्या शिक्षणासाठीही मदत करत आहे. आदिवासी समाजातील या मुलांना आई-वडील नाहीत. शिवाय त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांची जबाबदारी घेण्यास नकार दिला, म्हणून मी त्यांची जबाबदारी घेतली असून त्यांना शिक्षण देत आहे. या आधीही मी सहा मुलींना आश्रय दिलेला आहे. मला माझ्या समाजासाठी अजून खूप काम करायचे आहे. त्यामुळे सध्या तरी माझा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. मी मल्कानगिरीमधील ५० हून अधिक आदिवासी महिलांना वार्तांकनाचे प्रशिक्षण दिले आहे.

Comments
Add Comment

Majhi Kanya Bhagyashree Yojana : ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे फायदे ऐकूनही तुम्ही चकीत व्हाल

Majhi Kanya Bhagyashree Yojana : राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून

Ramai Awas Yojana : घर बांधायला पैसे नाहीत ? मग काळजी कशाला ? 'रमाई आवास' घरकुल योजना आहे ना !

Ramai Awas Yojana : राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘रमाई आवास (घरकुल) गृहनिर्माण योजना’ सुरू केली

Luck : चंगळता !

आमचे एक स्नेही आहेत. अगदी खेड्यात बालपण गेलेले असताना स्वकर्तृत्वाने शिक्षण घेतले, शिष्यवृत्त्यांवर शिकून

Lazy Pallu : उन्हाळ्यात वाढली ‘लेझी पल्लू’ची क्रेझ

एकेकाळी साडीचा पदर अगदी चापून-चोपून, नीट प्लेट्स घालून पिनअप करणं हीच एलिगंट फॅशन मानली जायची. पण बदलत्या

Kajuli biswas : संघर्ष आणि नि:स्वार्थ सेवेची कहाणी : काजुली विश्वास

पश्चिम बंगालच्या काजुली विश्वास यांनी गरिबी, उपासमार, बेघरपणा आणि आपल्याच लोकांची उपेक्षा सहन केली, पण या

Abhilasha Barak : मेजर अभिलाषा बराक यांना 'मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार

भारतीय लष्करातील धडाडीच्या महिला अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांनी आपल्या कर्तृत्वाने जागतिक पातळीवर देशाचे नाव