Tuesday, April 28, 2026

Indonesia Train Accident : इंडोनेशियात भीषण रेल्वे दुर्घटना; मृतांचा आकडा १४ वर, बचावकार्य वेगाने सुरू

Indonesia Train Accident : इंडोनेशियात भीषण रेल्वे दुर्घटना; मृतांचा आकडा १४ वर, बचावकार्य वेगाने सुरू

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता बाहेरील भागात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांची संख्या वाढून १४ वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी याची पुष्टी केली. अपघातानंतर मदत व बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

सरकारी रेल्वे कंपनी पीटी केरेटा एपी इंडोनेशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉबी रसीदिन यांनी सांगितले की, आतापर्यंत १४ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. सर्व मृतदेह ओळख पटविणे आणि इतर औपचारिकतांसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.हा अपघात सोमवारी बेकासी तिमुर स्थानकावर झाला, जे जकार्ताबाहेरील एक अतिव्यस्त रेल्वे स्थानक आहे. येथे एका लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीने स्थानकावर उभ्या असलेल्या कम्युटर रेल्वेच्या मागील डब्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की डब्यांचे मोठे नुकसान झाले आणि अनेक प्रवासी त्यात अडकले.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. बचाव पथकांनी आणि आपत्कालीन सेवांनी जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे, मात्र जखमींची अचूक संख्या अद्याप समोर आलेली नाही. इंडोनेशियाच्या शोध व बचाव संस्थेचे प्रमुख मोहम्मद सयाफी यांनी सांगितले की, अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे अत्यंत संवेदनशील आणि कठीण काम आहे. बचाव पथके विशेष उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने डबे कापून प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक अजूनही जिवंत अवस्थेत अडकले असल्याचे त्यांनी सांगितले.घटनास्थळी गोंधळाचे वातावरण असून अनेक लोक आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी स्थानकावर पोहोचले आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, कम्युटर रेल्वेगाडी आधी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या टॅक्सीला धडकली, त्यानंतर मागून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीने तिला धडक दिली. अपघाताचा सर्वाधिक फटका महिलांसाठी राखीव डब्याला बसला, जिथे मोठे नुकसान झाले. ग्रीन एसएम इंडोनेशियाने सांगितले की, अपघातात सामील टॅक्सी त्यांच्या ताफ्यातील होती आणि तपास यंत्रणांना आवश्यक माहिती देण्यात आली आहे.
अपघातानंतर राष्ट्रपती प्रबोवो सुबियांटो यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी सांगितले की, रेल्वे रुळांजवळील मोठ्या वाहतूक कोंडीच्या समस्येचा विचार करून तेथे उड्डाणपूल बांधण्यात येईल. तसेच अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. देशातील अनेक रेल्वे नेटवर्कचे देखभाल कार्य योग्यरीत्या होत नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. राष्ट्रीय परिवहन सुरक्षा समितीने अपघाताची चौकशी सुरू केली आहे. इंडोनेशियामध्ये रस्ते आणि रेल्वे अपघात वारंवार घडत असतात. यापूर्वी २०२४ मध्ये पश्चिम जावा प्रांतात झालेल्या रेल्वे अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >