फसवणूक

कथा : रमेश तांबे 


दुपारची वेळ होती. मी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत होतो. गाडीत तुरळक गर्दी होती. गाडी वेगाने पळत होती. खिडकीतून गार वारा अंगावर येत होता. पळणारी झाडे, पळणाऱ्या इमारती बघत बघत माझा प्रवास सुरू झाला होता. तेवढ्यात एक दहा-बारा वर्षांचा मुलगा हातात पुस्तकांचा गठ्ठा घेऊन आमच्या डब्यात शिरला. वीस रुपये, वीस रुपये असा ओरडत लोकांच्या समोर जाऊन पुस्तक घेण्यासाठी विनंती करीत होता.


मी दुरूनच त्याला पाहिलं. त्याच्या एका हातात चित्रांची आणि इंग्रजी गोष्टींची रंगीत पुस्तकं होती, तर दुसऱ्या हातात फूटभर लांबीचे बाॅलपेन होते. आमच्या डब्यात साधारण पंधरा-वीस माणसं होती. तो मुलगा प्रत्येकाच्या समोर जाऊन पुस्तकं घेण्याविषयी बोलू लागला. पण कोणीच त्याच्याकडून काहीच खरेदी केली नाही. ना पुस्तक ना पेन. आता मात्र त्याचा हात तोंडाकडून पोटावर फिरू लागला. भूक लागली म्हणून सांगू लागला. त्याचा चेहरा केविलवाणा झाला होता. त्याची वेशभूषा पाहून तो अत्यंत गरीब घरातला मुलगा आहे हे लक्षात येत होतं. तरीही प्रत्येक जण त्याला मदत करण्याचे सोडून तोंड फिरवत होते. त्याला “माफ करो” म्हणून सांगत होते. ते दृश्य बघून मला कसेसेच वाटले. निदान आपण तरी त्याला मदत करावी असे मनापासून वाटले. पुढचे स्टेशन जवळ येत होते. मी अगदी दरवाजाच्या जवळच बसलो होतो. आता तो मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “काका पुस्तक घ्या ना, नाहीतर पेन तरी घ्या. कालपासून मी काही खाल्लं नाही.” त्याची केविलवाणी नजर मला सांगत होती, की खरंच हा मुलगा मोठ्या अडचणीत असावा. आता मी काय करतो हे माझे सहप्रवासी एकटक माझ्याकडे बघू लागले. त्या मुलाला आपण चांगली भरीव मदत करून दानाचं, मदतीचं महत्त्व आपल्या सहप्रवाशांना पटवून द्यावं, या उद्देशाने मी पाकीट बाहेर काढलं. मोठ्या दिमाखात पाचशे रुपयांची नोट बाहेर काढली आणि म्हणालो, “मला तुझी सगळी पुस्तकं दे. मी आदिवासी शाळेंमध्ये जात असतो. तिथल्या मुलांना तुझी ही रंगीत पुस्तकं खूप आवडतील.” मग त्याने भरभर पुस्तके मोजली, पेन मोजले.


सगळे मिळून किंमत सहाशे पन्नास रुपये झाली. तोच माझ्या समोरचा प्रवासी पुन्हा मला म्हणाला, “अहो, नका करू त्याला मदत. ही मुलं अशीच आपल्याला ब्लॅकमेल करतात. दोन दिवस उपाशी असल्याचे खोटेच सांगतात. खरंच सांगतो लबाड असतात ही मुलं. तुम्ही त्याच्या नादी लागू नका.” तरीही मी पाचशे रुपयांच्या दोन नोटा काढून त्या माणसाला बोलू लागलो, “नाही हो, हा मुलगा स्वतः कष्ट करतोय, पुस्तके विकण्याचं कामं करतोय. तुम्हाला त्याची दया नाही का येत”. मला त्या माणसाच्या स्वार्थीपणाचा आणि गरिबांप्रती असलेल्या तुसड्या वृत्तीचा मनस्वी संताप आला. पण पुढच्या दोन मिनिटांत असे काही घडले की मी जागच्या जागी थिजून गेलो.


स्टेशन जवळ येताच, कुणाच्याही काही लक्षात येण्याच्या आधीच त्या मुलाने माझ्या हातातल्या पाचशेच्या दोन्ही नोटा हिसकावून घेतल्या आणि धावत्या गाडीतून उडी मारून फलाटावरून पळ काढला. मी उठून बघेपर्यंत तो पसारदेखील झाला होता. माझी झालेली फजिती बघून आजूबाजूचे प्रवासी बोलू लागले, “आम्हाला माहीत होती, या मुलांची कार्यपद्धती. पहिल्यांदा काहीतरी विकण्याचं नाटक, नंतर भुकेचं सोंग आणि शेवटी चोरी.” तो समोरचा प्रवासी माझ्याकडे कुत्सित नजरेने बघून हसत होता. सर्वांच्या समोर माझी झालेली फजिती मी मान खाली घालून स्वीकारली आणि यापुढे कोणालाही मदत करण्यापूर्वी नीट खातरजमा करून घेईन असा निर्धार करून मी माझ्या इच्छित स्थळी नवा अनुभव घेऊन उतरलो.

Comments
Add Comment

जीवन एक शाळा

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर जीवन ही केवळ जगण्याची प्रक्रिया नसून सतत शिकत राहण्याची एक अखंड शाळा आहे.

संमोहन

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ भूलशास्त्राचा (Anesthesia) शोध लागण्याच्या आधीची एक घटना आहे. ही एक ऐतिहासिक महत्त्वाची

पृथ्वी सपाट का दिसते?

विज्ञानकथा : प्रा. देवबा पाटील  सहलीला गेले असताना शिवम त्याच्या मित्रांना माहिती सांगत होता. “आपल्या लाडक्या

मौलिक वेळ

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ सकाळी उठतो आणि आपण मोबाईल हातात देतो. सवयीप्रमाणे फेसबुक उघडतो आणि पहिलीच बातमी

लहरी राजा

कथा : रमेश तांबे  एक होता राजा. तो खूपच लहरी होता. मनाला वाटेल तसे आदेश द्यायचा आणि सैनिकांच्या बळावर जनतेला ते

प्रवास

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवाच्या आयुष्यात शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षण केवळ