Tuesday, April 21, 2026

Mumbai Against Drugs : मुंबईत ‘Mumbai Against Drugs’ मोहिमेची १ मे २०२६ पासून सुरुवात; मुंबई उपनगर सह पालकमंत्री खासदार लोढा यांच्या बैठकीत आज निर्णय 

Mumbai Against Drugs : मुंबईत ‘Mumbai Against Drugs’ मोहिमेची १ मे २०२६ पासून सुरुवात; मुंबई उपनगर सह पालकमंत्री खासदार लोढा यांच्या बैठकीत आज निर्णय 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर चालणाऱ्या या मोहिमेद्वारे जनजागृती आणि सामाजिक सहभाग वाढवण्याचा उद्देश – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

सरकार, स्वयंसेवी संस्था, शाळा आणि नागरिक मिळून अंमली पदार्थांविरुद्ध लढा उभारणार – आमदार अमीत साटम

वाढत्या अतिसेवनाच्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर मुंबईत व्यापक अंमली पदार्थविरोधी चळवळ – आमदार अमीत साटम

मुंबई: अंमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध जनआंदोलन उभे करण्याच्या उद्देशाने “Mumbai Against Drugs” ही विशेष मोहीम १ मे २०२६ पासून मुंबईत एक वर्षासाठी राबविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिली.

मुंबई उपनगर सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम उपस्थित होते. या मोहिमेचे नियोजन व आराखडा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, क्रीडा अधिकारी, महानगरपालिका अधिकारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘Mumbai Against Drugs’ ही मोहीम १ मे २०२६ पासून सुरू करण्यात येईल. ही मोहीम सलग १२ महिने (३६५ दिवस) चालणार आहे, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.

अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे होत असलेल्या अलीकडील मृत्यू ही गंभीर इशारा देणारी बाब आहे की, केवळ पोलीस कारवाईने हा प्रश्न सुटणार नाही. या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून व्यापक अंमली पदार्थविरोधी जनआंदोलन उभारण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे आपण प्रभावीपणे अंमली पदार्थांच्या विरोधात लढा उभारू शकतो, असे आमदार साटम यांनी पुढे सांगितले.

या मोहिमेत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था (NGOs), धार्मिक संस्था व प्रमुख उपासना स्थळे, रहिवासी संघटना (RWAs), विविध क्षेत्रातील मान्यवर (सेलिब्रिटी), पालक-शिक्षक संघटना (PTAs), विविध कॉर्पोरेट संस्था तसेच सर्व शासकीय कार्यालयांचा सहभाग राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या मोहिमेचा मुख्य उद्देश विशेषतः तरुणांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागृती निर्माण करणे हा आहे. महाविद्यालये, शाळा, शैक्षणिक संस्था आणि जिथे तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येतील. जनजागृती, समुदाय सहभाग आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यावर भर देत अंमली पदार्थांच्या विरोधात प्रभावी लढा उभारण्यात येईल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >