मौलिक वेळ

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


सकाळी उठतो आणि आपण मोबाईल हातात देतो. सवयीप्रमाणे फेसबुक उघडतो आणि पहिलीच बातमी दृष्टीस पडते. परीक्षा संपल्या म्हणून चार मुली नदीकिनारी श्रमपरिहारासाठी गेलेल्या असतात. अलीकडच्या मुलांचा श्रमपरिहारात आणखी एक आनंददायी पर्याय म्हणजे सेल्फी काढणे आणि रील बनवणे हेही आहे. त्यानुसार यांची एक मैत्रीण पाण्यात उतरून स्वतःचा तोल सांभाळत व्यवस्थित व्हिडीओ शूट करत असते आणि इतर तिघी पाण्यामध्ये स्टंट करत असतात. अचानक एक मुलगी वाहून जाऊ लागते. स्वाभाविकपणे दुसऱ्या दोघी तिला वाचवायला जातात आणि त्याही तिच्यासोबत वाहून जातात. हे सर्व दृश्य त्यांच्या मैत्रिणीच्या मोबाईल कॅमेरात बंदिस्त होते आणि तिघांचे आयुष्य क्षणार्धात संपून जाते हे जसेच्या तसे त्या क्षणी चित्रित झालेले व्हिडीओ आपण सोशल मीडियावरून पाहतो. अस्वस्थ होतो. खरं तर लाखो-करोडो लोक हे पाहात असतात आणि तरीही याच घटना परत परत घडत राहतात. इथे या चौघीनाही पोहता येत नसते तरी त्या खोल पाण्याकडे केवळ रील बनवण्यासाठी गेलेल्या असतात, असे त्या बातमीत लिहिलेले होते.


दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर दुसरी घटना वाचायला मिळते. परीक्षा संपल्यावर चार मित्र श्रमपरिवारासाठी नदीकिनारी जातात. पाण्यात उतरतात. त्यातल्या चौघांनाही व्यवस्थित पोहता येत असते तरीही त्यांचा एक मित्र बुडतो आणि इतर तिघे तो बुडल्याचे सांगत बाहेर येतात. आसपास फारशी माणसे नसतात, त्यामुळे ते जे सांगतात ते इतर ऐकतात. चोवीस तासांनंतर त्या बुडलेल्या मुलाचे प्रेत बाहेर काढले जाते. तेव्हा त्या मुलाची आई आरडाओरडा करते की माझ्या मुलाला उत्तम पोहता येत असताना, तो बुडलाच कसा? या त्याच्या जवळच्या तीन मित्रांची चौकशी करा.


आता पुढे आणखी काय? तिसऱ्या दिवशी तिसरी नवी बातमी आणि कोणीतरी वाहून गेल्याची घटना वाचायला मिळते. अस्वस्थ होण्यापलीकडे समाजाचा एक घटक म्हणून आपण काय करू शकतो असा मी विचार केला. तरुण मुलांनी श्रमपरिहार म्हणून नेमके काय केले पाहिजे? कारण तेही फार आवश्यक आहे. मुलांना पाण्याकडे जायची बंदी घालायची की डोंगर चढायची बंदी घालायची? डोंगरावरून आठवले ती अगदी अलीकडची घटना. दहा मुलींना घेऊन एक प्रशिक्षक ट्रेकिंगसाठी गेला. त्यातली एक मुलगी अचानक गायब झाली आणि अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी अजूनही सापडलेली नाही. याचा अर्थ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काही चांगल्या गोष्टी करताना अशाही गोष्टींना कधीकधी तोंड द्यावे लागते. एक संवेदनशील माणूस म्हणून मी त्या कुटुंबाचा, मित्रपरिवाराचा विचार करते तेव्हा त्यातून काही मार्ग मला सापडत नाही, याचे वाईट वाटते. म्हणजे आपण आपल्या मुलांना घरात डांबून ठेवून ‘कॅरम बोर्ड घरातच खेळ’ असे सांगून कधी घराबाहेर पडतो आणि कॅरम बोर्डवर खेळताना अचानक गरगरणारा पंखा या चारी मुलांच्या डोक्यावर पडतो आणि त्यांचे जग होत्याचे नव्हते होऊन जाते, तर आता मुलांनी करायचे तर काय करायचे?


‘काळजी घ्या’ हा शब्द आपण सातत्याने आपल्या मुलांसाठी वापरत असतो. मुले कशाची आणि कशी काळजी घेणार, असाही प्रश्न त्यावेळेस आपल्या मनात असतो.
शारीरिक-मानसिक-भावनिकदृष्ट्या स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी कधी पाण्यात पोहायला जाणे, ट्रेकिंग करणे, जिममध्ये जाणे, योगासने करणे, बैठे खेळ खेळणे आणि तेही समूहाने आवश्यक असते. या समूहात वेगवेगळ्या विचारांची आणि प्रवृत्तींची माणसे एकत्र असतात. या पलीकडे जाऊन निसर्ग आणि नियतीमुळे आपात्कालीन परिस्थितीला तोंड द्यावे लागते. याला काही पर्याय नाही. तरीही ‘काळजी घ्या’ हे सांगणे हा एवढाच पर्याय आजच्या काळात आपल्या
हातात आहे!


शेवटी एवढेच की, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादे मूल सापडते तेव्हा त्याला आपल्याला करता येईल ती मदत करणे किंवा काही कारणास्तव ते मूल मृत्युमुखी पडलेच तर त्याच्या कुटुंबाला मानसिक आधार देणे. अशा दुःखातून बाहेर पडण्यासाठी फार मोठा काळ द्यावा लागतो तेव्हा आपला मौलिक वेळ जर देता आला तर मला वाटते की तेही फार मोठे सामाजिक कार्य आहे!


pratibha.saraph@ gmail.com


Comments
Add Comment

लहरी राजा

कथा : रमेश तांबे  एक होता राजा. तो खूपच लहरी होता. मनाला वाटेल तसे आदेश द्यायचा आणि सैनिकांच्या बळावर जनतेला ते

प्रवास

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवाच्या आयुष्यात शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षण केवळ

पृथ्वीचे ध्रुव

विज्ञानकथा : प्रा. देवबा पाटील शिवम आणि त्याच्या मित्रांचे सहलीला गेले असताना ज्ञान ग्रहण सुरू होते. “पण आपली

प्रेरणाच महत्त्वाची...

गोष्ट लहान, मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात यश, प्रगती आणि समाधान मिळवण्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे असतात;

उत्तर व दक्षिण गोलार्ध

विज्ञानकथा - प्रा. देवबा पाटील शिवम व त्याचे मित्र सहलीला गेले असताना चर्चा करत होते.“आपली पृथ्वीही फिरते वाटते?”

गॅस दुरुस्ती आणि मी

प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ रोघरी गॅस शेगडी आहे. आपल्याला नेहमीच एक अनुभव येत असेल जो मलाही नेहमी येतो तो मी