नवी दिल्ली : महागाईच्या काळात सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला. केंद्र करकारने त्यांना अक्षय्य तृतीयानिमित्त मोठे गिफ्ट दिले. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात म्हणजे डीएमध्ये २ टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतनात मोठी वाढ होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना फक्त आर्थिक दिलासा मिळाला नाही तर वाढत्या महागाईच्या काळात त्यांचे बजेट कोलमडणार नाही. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे एक कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनर्सना फायदा होणार आहे. देशात सध्या ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६४ लाख पेन्शनर्स आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. कर्मचारी संघटना ८व्या वेतन आयोगाअंतर्गत सॅलरी स्ट्रक्चर बदलण्याची मागणी करत असतानाच सरकारने महागाई भत्त्यात वाढीचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीच्या घोषणेला पहिल्यांदाच इतका उशीर झाला आहे. सर्वसामान्यपणे सरकारकडून जानेवारी ते जूनच्या सहामाहीसाठी होळीच्या दरम्यान, म्हणजेच मार्च महिन्यात निर्णय घेते. पण यंदा यासाठी उशीर झाला आहे. १० वर्षात पहिल्यांदाच सरकारने महागाई भत्त्याची घोषणा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात केली आहे. महागाई भत्त्यात वाढीची घोषणा ही जानेवारी महिन्यापासून लागू असणार आहे. एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा महागाई भत्ता मिळणार आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात २०२५च्या दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्त्याची घोषणा केली होती.
कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता त्यांच्या बेसिक सॅलरीनुसार ठरवला जातो. जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ६०,००० रुपये असेल तर त्याला पूर्वी ५८ टक्के महागाई भत्त्यानुसार ३४८०० रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता त्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणजे त्यांना ६० टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. त्यानुसार महागाई भत्ता ३६,००० रुपये असेल. म्हणजेच कर्मचाऱ्याच्या पगारात दरमहा १२०० रुपयांची वाढ झाली.






