Thursday, August 6, 2026

Amitabh Bachchan : "शूट चुकवलं असतं तर माझी..."; KBC साठी सलग २४ तास काम! ८३ व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांच्या जिद्दीला सलाम

Amitabh Bachchan :

मुंबई : वयाच्या ८३व्या वर्षीही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि शिस्त कायम ठेवत आहेत. लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) च्या आगामी पर्वाच्या तयारीसाठी त्यांनी सलग २४ तास काम केल्याचा खुलासा केला आहे. एवढेच नव्हे तर, हे शूटिंग चुकले असते तर "माझ्या जागी दुसऱ्याची नियुक्ती झाली असती," असेही त्यांनी विनोदी शैलीत म्हटले आहे.

सकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७; अमिताभ बच्चन यांची २४ तासांची शिफ्ट

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या नियमित ब्लॉगमध्ये या अनुभवाबद्दल लिहिताना सांगितले की, एका दिवसाच्या सकाळी ७ वाजता सुरू झालेले काम दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता संपले. म्हणजेच त्यांनी सलग २४ तास काम केले. ब्लॉगमध्ये त्यांनी लिहिले, "अखेर वेळेत काम पूर्ण झाले. काल सकाळी ७ वाजता सुरू झालेले काम आज सकाळी ७ वाजता संपले. हे सादरीकरण वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक होते, त्यामुळे ते पूर्ण केले."

त्यांनी पुढे सांगितले की, काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ब्लॉग आणि चाहत्यांशी संवाद साधता आल्याचा त्यांना आनंद झाला. आता थोडे अन्न खाऊन विश्रांती घेणार असून दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी लवकर शूटिंगसाठी हजर व्हायचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘KBC’चा प्रीमियर जवळ; चुकवणं शक्यच नव्हतं

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ब्लॉगमध्ये ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या पर्वाच्या प्रसारणाची तारीख जाहीर झाल्याचे सांगितले. त्यामुळे कोणतीही चूक परवडणारी नव्हती. "KBC च्या पहिल्या भागाच्या प्रसारणाची तारीख जाहीर झाली आहे. हे शूट चुकवले असते, तर माझ्या जागी दुसऱ्याची नियुक्ती झाली असती. त्यामुळे जे करायचे आहे ते पूर्ण करायलाच हवे," असे त्यांनी मिश्कील अंदाजात लिहिले.

मागील २४ वर्षांपासून KBCचा चेहरा :

सन २००० मध्ये सुरू झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा चेहरा अमिताभ बच्चनच (Amitabh Bachchan) राहिले आहेत. केवळ तिसऱ्या पर्वात शाहरुख खान यांनी सूत्रसंचालन केले होते. यंदा हा लोकप्रिय शो १८ व्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वय फक्त आकडा; व्यावसायिकतेचा आदर्श कायम

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आरोग्यविषयक अडचणींवर मात केली आहे. १९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या गंभीर अपघातातून ते मृत्यूच्या दारातून परतले. त्यानंतर त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. याशिवाय, दूषित रक्त चढवल्यामुळे त्यांना हिपॅटायटिस झाला होता. यापूर्वी त्यांनी स्वतःच सांगितले होते की, आज ते केवळ २५ टक्के यकृताच्या (लिव्हर) क्षमतेवर जगत आहेत. तरीही वय आणि आरोग्याच्या आव्हानांवर मात करत ते आजही तेवढ्याच उत्साहाने काम करत आहेत.

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव :

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 83 व्या वर्षीही सलग 24 तास काम करण्याची त्यांची जिद्द, शिस्त आणि कामावरील निष्ठा अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >