Saturday, April 18, 2026

Data Centers in Maharashtra : मध्य आशियातील नामांकित कंपन्या महाराष्ट्रात डेटा सेंटर स्थापन करणार

Data Centers in Maharashtra : मध्य आशियातील नामांकित कंपन्या महाराष्ट्रात डेटा सेंटर स्थापन करणार

मुंबई : राज्यातील उद्योगस्नेही वातावरणाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, मध्य आशियातील डेटा सेंटर क्षेत्रातील दिग्गज कंपन्या महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्यास सज्ज झाल्या आहेत. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संबंधित कंपन्यांना जागा आणि वीज उपलब्धता प्राधान्याने करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे डेटा सेंटर्स संदर्भात शनिवारी आयोजित सादरीकरण व बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीस महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव लोकेश चंद्रा, डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विकास आयुक्त, व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "डेटा सेंटर क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. या कंपन्यांच्या प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक असलेली सर्व तांत्रिक कामे आणि प्रामुख्याने जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावी. या प्रकल्पांना लागणारा वीजपुरवठा ही प्राथमिकता मानून ऊर्जा विभागाने त्याबाबत योग्य दक्षता घ्यावी."

वीज उपलब्धता त्वरित करा

प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला महत्त्वपूर्ण सूचना केल्या. सिडकोने डेटा सेंटर प्रकल्पांसाठी स्वतंत्र 'लँड बँक' विकसित करावी. ऊर्जा विभागाने सब स्टेशनसाठी (उपकेंद्र) आवश्यक असलेली जागा त्वरित ताब्यात घेऊन कामाला गती द्यावी, असे निर्देश देण्यात आले. सिडकोच्या वतीने डेटा सेंटरसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून, पुरेशी वीज उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी ऊर्जा विभागाने दिली.

Comments
Add Comment