Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर


मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही भागांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर इतर भागांमध्ये उष्णतेची लाट आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने २१ एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.


भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, १९ एप्रिलपर्यंत पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, तेलंगणा, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशामध्ये १७ ते १९ एप्रिल, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि रायलसीमामध्ये १७ व १८ एप्रिल रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


आयएमडीच्या मते, वायव्य भारतावर पश्चिमी वाऱ्यांसह एक पश्चिमी प्रणाली सक्रिय आहे. १६ एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर एक नवीन परंतु कमकुवत पश्चिमी प्रणाली येण्याची शक्यता आहे. यामुळे वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसह दमट हवामानाची शक्यता आहे.


ईशान्य भारतातील आसाम आणि मेघालयमध्ये १६ ते १९ एप्रिल दरम्यान हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अशीच हवामान परिस्थिती नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये राहील. अरुणाचल प्रदेशात १६ ते १९ एप्रिल दरम्यान विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या सर्व भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे. पश्चिम भारतातील मध्य महाराष्ट्रात १८ ते २१ एप्रिल दरम्यान हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.



अकोला जिल्हा प्रशासन सज्ज


राज्यातील उष्णता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. अकोल्याचा पारा ४४अंशांच्या पार गेला आहे. अकोला राज्य आणि देशातच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी शहर बनलं आहे. त्यामुळे उन्हाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. उन्हापासून वाचण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काही मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व विभागांची तातडीची बैठक घेतली आहे. वाढत्या उन्हाचा आणि उष्माघाताचा सामना करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिलेयेत. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय. जिल्ह्यात शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १३७ खाटा राखीव ठेवण्यात आल्यायेत. ओआरएस व औषधसाठा पुरेसा ठेवावा. त्याचप्रमाणे, नागरिकांमध्ये उष्माघातापासून दक्षता बाळगण्याबाबत प्रभावी जनजागृती करावी. ग्रामीण भागात दवंडी देऊन जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



विदर्भात उष्णतेची लाट, पारा ४४ अंश सेल्सिअसवर


सध्या विदर्भात उष्णतेची लाट असून पारा ४४ अंश सेल्सिअसच्या घरात आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनने सर्व आरोग्य यंत्रणेला हाय अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहे. उष्माघाताचा रुग्णांनसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विशेष कोल्ड वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या कोल्डवॉर्ड मध्ये उष्मघाताच्या रुग्णांसाठी शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कुलर, एसी, कोल्ड बाथ ठेवण्यात आले असून सोबतच पुरेसा औषध पुरवण्यात आल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अविनाश गावंडे यांनी सांगितले.


आज आणि उद्या पुण्यातील तापमान वाढणार असून १७ एप्रिलला पुण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी काम नसल्यास बाहेर पडू नका असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे. पुण्यातील तापमान ४२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. १८ आणि १९ एप्रिलला पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा शहरात काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे.



हे करू नका…


दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात फिरू नका.


मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नका. त्यामुळे डीहायड्रेट होते.


उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.


उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.


पार्किंगमधील वाहनात मुले किंवा पाळीव प्राण्यांना ठेवू नका.


बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.



हे करा…


तहान लागली नसली तरी पाणी प्या


सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा


बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.


प्रवासात पाणी सोबत ठेवा.


आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.


कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा.



प्रशासनाला कोणत्या सूचना?


प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणे


जिल्हास्तरावर Heat Action Plan कार्यान्वित करणे तसेच रुग्णालयांत आवश्यक औषध साठा ठेवणे यावर भर द्यावा.


शाळांना सूचना देणे, गरजेनुसार शाळांच्या वेळेत बदल करणे आणि माध्यमांद्वारे जनजागृती करणे यासंदर्भातही उपाययोजना करण्यात येत आहेत.


जनसमूह कार्यक्रमांसाठी सावली आणि पाण्याची सोय करावी, वैद्यकीय मदत आणि ORS उपलब्ध ठेवावे. तसेच कार्यक्रमाचा वेळ शक्यतो बदलावा, असे सांगण्यात आले आहे.


कामगार, शेतकरी आणि बाहेर काम करणाऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी काम करावे. नियमित पाणी प्यावे, विश्रांती घ्यावी आणि उष्माघाताची लक्षणे लक्षात ठेवावीत.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.