नाशिक : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याच्यावर अखेर सोमवारी ईडीने छापे टाकले. या कारवाईत अनेक गैरव्यवहार तसेच बेकायदेशीर मार्गाने पैसा मिळविल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत ईडीकडून लवकरच अधिकृत माहिती दिली जाणार आहे.
छाप्यात विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढालीचे आणि गैरव्यवहाराचे पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. तब्बल ११ ठिकाणी ईडीकडून छापे टाकून कागदपत्रे आणि मालमत्तांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
नाशिक शहरात मागील महिन्यात, १८ मार्च २०२६ रोजी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुदगल यांनी खरात यांच्यावर कारवाई केली होती. धर्माच्या नावावर महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांवरून अशोक खरात याच्या गोविंदनगरजवळील कर्मयोगी नगर येथील घरावर पहाटे छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत अशोक खरात याला अटक करण्यात आली होती. एका महिलेने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने अधिकृतरित्या सांगितले होते. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते.
अशोक खरात प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना आठ दिवसांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले. या पथकाच्या प्रमुखपदी आयपीएस अधिकारी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर तपासाला गती मिळाली. पुढे नाशिक, शिर्डी तसेच इतर काही भागांतही खरातविरोधात आर्थिक फसवणूक व लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झाले. या सर्व गुन्ह्यांचा तपास एसआयटीमार्फत सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल ईडीसह इतर तपास यंत्रणांनीही घेतली. राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीकडून संबंधित माहिती घेण्यात आली. मागील आठवड्यात एसआयटीने नाशिकमधून तपास सुरू करत आवश्यक कागदपत्रे गोळा केली होती. त्यानंतर सोमवारी (१३ एप्रिल) सकाळी अशोक खरातच्या सिन्नर येथील आश्रमावर तसेच कर्मयोगी नगर येथील घरावर ईडीने छापे टाकले. यानंतर ईडीचे छापा सत्र सुरू झाले.