पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) येथे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली बहुचर्चित शांती चर्चा अखेर निष्फळ ठरली आहे. जवळपास २१ तास चाललेल्या या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते, मात्र या २१ तासांच्या चर्चेमधून कोणताही ठोस निष्कर्ष निघू शकला नाही.
इराणचा करार अटींना नकार :
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स (J. D. Vance) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आम्ही प्रामाणिक हेतूने चर्चेसाठी आलो होतो, पण इराण कराराच्या अटी मान्य करण्यास तयार नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, ते आता अमेरिकेला परत जात असून संपूर्ण परिस्थितीची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना देणार आहेत. दुसरीकडे, अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा फिस्कटल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.
ही परिस्थिती इराणसाठी अधिक नुकसानकारक ठरू शकते :
दरम्यान, चर्चा सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणवर टीका करत त्याला “अपयशी देश” असे संबोधले. तसेच, अमेरिकेकडे प्रचंड तेलसाठा असल्याचा दावा करत, Strait of Hormuz लवकरच खुली होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या चर्चेच्या अपयशानंतर पुढे अमेरिका कोणती भूमिका घेणार आणि या तणावाचे रूपांतर संघर्षात होणार का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.