फाटक्या आंतरपाटाला सेलिब्रिटींचे ठिगळ म्हणजे लग्नपंचमी...!

पाचवा वेद : भालचंद्र कुबल


अभिनय क्षेत्राला मार्केटिंगची अतीव आवश्यकता नव्वदीच्या दशकात भासू लागली आणि जाहिरातबाजीला धुमारे फुटू लागले. त्यात प्रसार माध्यमापैकी सोशल मिडीया ९० कोटी जनतेच्या हातात पडल्यावर मार्केटिंगचे नवनवे ट्रेंड सुरु झाले. त्याआधी नाटक, चित्रपट केवळ प्रिंट मिडीया पुरतेच मर्यादित होते, त्याची पाळेमुळे ग्लोबलायझेशने पार परदेशात पोचवली. मनोरंजन विश्वातील ही उलथापालथ सर्व भाषांसाठी सारखीच परिणामकारक होती. हिंदी चित्रपटांमधील बदल तर लक्षणीय होते. "कंटेंट" नावाचा एलिमेंट (घटक) महत्त्वाची भूमिका बजावू लागल्यावर छोटेखानी चित्रपटसुद्धा गर्दी खेचू लागले.


थोडक्यात आजचा प्रेक्षकवर्ग कंटेंटला किंमत देऊ लागला. मात्र मराठी चित्रपट काही सुधारण्याची चिन्हे आजही दिसत नाहीत. एकावर एक चित्रपट रिलिज होतात आणि त्याच वेगात एकावर एक कोसळण्याचे प्रमाण सुरुच आहे. जागतिकीकरणाच्या धोरणांशी जुळवून न घेतल्यामुळे, पुरेसा सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांचा अभ्यास न केल्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांत अनेक निर्मात्यांची बलिदाने पुनःर्निमितीत वाया गेली. केवळ काही निर्माते सोडल्यास (ते देखील एका हाताच्या बोटावर मोजण्यापुरते) मराठी चित्रपट देशोधडीला लागला. यात सर्वांचेच नुकसान झाले. या पडझडीत मराठी अभिनयक्षेत्राला मोठी झळ बसली.


कलाकारांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी चित्रपट हे महत्त्वाचे माध्यम होते परंतू ते बघण्यासाठी प्रेक्षक कुठून आणायचा? हा यक्ष प्रश्न उभा राहिला. साहजिकच यात अर्थकारणाची भूमिका महत्त्वाची असल्याने 'पडेल' हिरो-हिरोईनचा शिक्का माथी बसल्याने त्यांची फेसव्हॅल्यू कोसळली. ही फेसव्हॅल्यू पुन्हा चर्चेत आणायची तर माध्यमांमधून सततचे दिसणे गरजेचे भासू लागले... आणि अभिनय क्षेत्राला मार्केटिंगची अतीव गरज भासू लागली.


"मी मराठी नाटक मुळीच करणार नाही..." किंवा मराठी नाट्यक्षेत्राला डाऊन मार्केट समजणाऱ्या कलाकार मंडळीनी कोवीड पश्च्यात मराठी रंगभूमीचा गुपचुप आसरा घ्यायला सुरुवात केली. मग अमुक एक वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या नटनट्यांची संख्या वाढत चाललीय. त्यातून निर्माता जगतोय की नाही किंवा नाटकाला व्यावसायिक दर्जा आहे की नाही, या बाबींचा विधीनिषेध न बाळगता स्वार्थी मनोवृत्तीने मराठी सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या नटमंडळींची नाटके गावखेड्यात दौऱ्यातून सादर होताना दिसू लागली. कारण प्रत्येक अभिनेत्याला आपली फेस व्हॅल्यू जपायची आहे किंबहुना ती वाढवायचीही आहे.


नटमंडळींच्या या अॅप्रोचमधे मराठी नाटक ट्रॅप झाले. मराठी चित्रपटात वारंवार दिसणारी मंडळी नाटकाच्या थेटरात दिसायला लागल्यावर 'अजि म्या ब्रह्म पाहिले' प्रमाणे सर्वसाधारण मराठी प्रेक्षक थेटरात धाव घेतोय आणि कलाकारांसाठी नाटक हे प्रसिद्धी माध्यम आहे, हे अधोरेखित करायला भाग पाडतोय.


हल्लीच लग्नपंचमी नामक नाटक रंगभूमीवर सेलिब्रिटी नटनट्यांना घेऊन बागडतंय... आणि खरंच बागडतंय. म्हणायला यात नाव ठेवायला जागाही नाही पण मराठी नाटकाची व्याख्या वरवरच्या मनोरंजनाची नाही. यात ठोस असे कथासूत्र नाही मात्र भक्कम अशी संहितेची तटबंदीही नाही. चार क्षण टाईमपास झाला की पुरे हो...! असा अॅटीट्यूड मालिका लेखनातून निर्माण झाल्याने परिपक्व विषय नाटकासाठी निवडावा, हा विचार फारच दूर राहतो. कानेटकर, दळवी, सबनीस, तेंडुलकरांची नाटके जगायला आणि जगाकडे बघायला शिकवायची तर आजची नाटके फक्त पहायला सांगतात.


"लग्नपंचमी" हे असंच एक नाटक जे फक्त "पाहा" एवढंच सांगतं. ‘लग्न पंचमी' हे स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर अभिनित, मधुगंधा कुलकर्णी लिखित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित एक नवीन मराठी कॉमेडी नाटक आहे. हे नाटक आधुनिक वैवाहिक जीवनातील गोंधळ, नातेसंबंध आणि समजूतदारपणावर भाष्य करणारे कौटुंबिक नाटक आहे.


लग्न हे केवळ दोन व्यक्तींमधील नसून त्यातील अनेक व्यक्तिमत्त्वांमधील असते, हे नाटक हलक्या-फुलक्या विनोदी शैलीतून मांडते. आता खरंच ही विनोदी शैली म्हणावी तर माझ्यासारख्या प्रेक्षकाला गुदगुल्या करुन हसवण्यासाठी तिकिटाबरोबर एक माणूस द्यावा ही लेखिकेला नम्र विनंती. नाटकाचा नायक हा लेखक आहे, तो चॅनल्सच्या रिक्वायरमेंटप्रमाणे एपिसोड पाडतो आणि इतक्या बालिश गोष्टी मान्य करताना प्रेक्षकांनी खळखळून हसायला लावणारी ही कॉमेडी आहे. एक जोडपे जे विभक्त होणार आहे, का ? तर ठोस कारण नायकाला सापडत नाही. असं काही "अरे हसा ना रे..!" असं विनवणारी ही पंचमी आहे.


सुरुवातीच्या परिच्छेदांमधे नटनट्यांची, लेखकाची, दिग्दर्शकाची जिवंत राहण्याची धडपड म्हणजे हे नाटक होय. मंधुगंधा कुलकर्णींच्या तीन आणि सुनील अभ्यंकरांच्या चार भूमिकांना पुरून उरणारी अमृता खानविलकरने 'सुर्यजा' ही भूमिका मात्र पदार्पणाच्या प्रयोगात अफाट साकारली आहे. म्हणजे नाटकाला लागणारा लाऊडनेस अमृताने सहजगत्या मुरवलाय त्यामानाने स्वप्नील जोशीकडे फारशी व्हरायटी नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेय. असो. तर फार काही अपेक्षा ठेऊन आजकालचं नाटक पाहायचं नसतं असं सांगायचं तर नाही ना? असा सवाल उभी करणारी ही लग्नपंचमी आहे.

Comments
Add Comment

राणादाचा ट्रॅप

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल झ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणाची भूमिका करून लोकप्रियतेचा कळस गाठलेला चॉकलेट

माध्यमांतराची गाथा...

कोणत्याही क्षेत्रातल्या कुणा व्यक्तीची जन्मशताब्दी असली की त्या व्यक्तीने त्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे,

कलाकृती एक, कलाकार अनेक...

राजरंग : राज चिंचणकर रंगभूमीवर सादर होणारा प्रत्येक प्रयोग हा ठरलेल्या पद्धतीनेच सादर होतो. संवाद, प्रकाशयोजना,

मुंबईला आल्यावर ‘कलावैभव’मध्ये काम करण्याची मिळाली संधी : सचिन देशपांडे

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  सचिन देशपांडे यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपले स्थान भक्कम केले आहे. गेली पंचवीस

रंगकर्मींच्या नाट्यकट्ट्याची मुहूर्तमेढ...!

राजरंग : राज चिंचणकर नाट्यसृष्टीत विविध उप्रक्रमांची पायाभरणी केली जाते आणि यातले काही उपक्रम सातत्याने सुरु

व्याधींच्या आधीची समाधी

भालचंद्र कुबल : पाचवा वेद आमच्या पुष्पा भावे मॅडम नेहमी जयंताची उदाहरणे द्यायच्या, जयंता म्हणजे जयंत पवार..! मला