Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टिने पूल विभाग व रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उपाययोजनेला गती द्यावी, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले.


अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात सुरु असलेली विकास कामे, मूलभूत नागरी सेवा - सुविधा तसेच नागरिकांना  भेडसावणाऱ्या समस्या या विषयांवर मुंबईच्या महापौर  रितू तावडे यांनी महापौर दालनात बुधवारी ८ एप्रिल २०२६ रोजी संयुक्त बैठकीमधून आढावा घेतला. अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार मुरजी पटेल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


नगरसेवक  प्रकाश मुसळे, उपआयुक्त (सामान्य प्रशासन)  किशोर गांधी, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उपआयुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, जलअभियंता  दिलीप पाटील, प्रमुख अभियंता (रस्ते) मंतय्या स्वामी, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) (अतिरिक्त कार्यभार)  नवनाथ घाडगे, सहायक आयुक्त (बाजार)  अलका ससाणे, सहायक आयुक्त (मालमत्ता) पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.  दक्षा शाह, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


मरोळ मंडई आणि रुग्णालयाचा पुनर्विकास याबाबत प्रारंभी चर्चा करण्यात आली. मरोळ रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्याचा अंतिम प्रस्ताव व मसुदापत्र मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. तर मंडईसाठीची प्राथमिक कार्यवाही सुरु आहे, असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.  विकास नियोजन आराखड्यातील रस्त्यांचा विकास करण्याची प्रक्रिया गतीने करावी, यामध्ये बाधित होणाऱ्या पात्र रहिवाशांचे योग्य पुनर्वसन करावे. तसेच रस्ता रेषा लवकर निश्चित करुन घ्याव्यात.

पाणी समस्येकरता जलकुंभ 


सुभाषनगर, गुंदवली टेकडी, शिव वसाहत, कनाकिया रेन फॉरेस्ट, मरोळ हिलटॉप, चर्च मार्ग या परिसरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी नवीन जलकुंभ उभारण्याकरिता जागा निश्चिती, टाकी व पंप क्षमता इत्यादी बाबींचे जलदरित्या सर्वेक्षण व अहवाल तयार करावेत, जेणेकरुन पुढील कार्यवाही सुरु करता येईल, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी यावेळी दिले.


ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा इमारतींमधील अतिरिक्त रकमेच्या जल देयकांमधून रहिवाशांना दिलासा देण्यासाठी, अभय योजना राबविण्याकरिता शासन निर्देशानुसार महानगरपालिकेकडून कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित रहिवाशांनी संयम बाळगावा, लवकरच त्यांना लाभ मिळेल, अशी माहिती जल खात्याच्या अधिकाऱ्यांनी महापौरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ही माहिती दिली

पोलिस चौकीसाठी जागा


अंधेरी पूर्व परिसरात सुरक्षा व वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणेला जागा आवश्यक आहे, त्यासाठी विकसित प्रकल्पांमधील सुविधा भूखंड किंवा जागेचा शोध घेवून ते पोलीस चौकीसाठी उपलब्ध करुन देता येईल किंवा कसे, यासाठी स्थानिक स्तरावर पोलीस प्रशासन व विभाग कार्यालयाची संयुक्त बैठक घ्यावी, असे निर्देशही महापौर  रितू तावडे यांनी दिले.

नाल्याच्या रुंदीकरणाची निविदा पावसाळ्यापूर्वी..


कोंडिविटा नाल्याचे रुंदीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करावी. सागबाग, मरोळ येथील हिंदू स्मशानभूमीतील विकास कामे व मूलभूत सुविधा कामे तातडीने करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याने निविदा प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.

सहा शाळांच्या दुरुस्तीची कामे विनाविलंब हाती घ्या


अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील महानगरपालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी शिक्षण विभागाने त्वरेने कार्यवाही करावी; नित्यानंद, आरके, मरोळ, गुंफा, विलेपार्ले, पूनमनगर या सहा शाळांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करुन ती कामे विनाविलंब हाती घ्यावीत; कोंडिविटा शाळेच्या नवीन इमारतीसाठी भोगवटा प्रमाणपत्र व अग्निशमन प्रमाणपत्र लवकरात लवकर प्राप्त करुन ही इमारत कार्यान्वित होईल, याकडे लक्ष पुरवावे, अशी सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

महापालिका जागेवर एस आर ए योजना...


मरोळ जलवाहिनी येथील महानगरपालिकेच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टी रहिवाशांनी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन पुनर्वसन योजना राबविण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त स्तरावर प्रस्ताव सादर पाठवून, चर्चा करुन यथायोग्य निर्णय घेण्यात येईल, असे महापौर  रितू तावडे यांनी आश्वस्त केले.

खेळाचे मैदान ताब्यात घ्या


चकाला येथील म्हाडा प्राधिकरणाच्या भूखंडावर आरक्षित मनोरंजन आणि खेळाचे मैदान, या जागेचा भाडेकरार संपुष्टात आल्याने हे मैदान महानगरपालिकेने पुन्हा ताब्यात घेणे, के दक्षिण विभागासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांनी याबाबत यथोचित कार्यवाही करण्याची सूचना महापौरांनी केली.
Comments
Add Comment

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला

Mankhurd News : मानखुर्दमधील १४०० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील अतिक्रमणाचा डाव हाणून पडला महानगरपालिका आणि उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय

BMC News : ओसीविना इमारतींसाठी अभय योजनेचा प्रस्ताव निर्णयाविना..

उबाठाला विकासक दिसतात, तर महायुतीला फसवणूक झालेले रहिवाशी मुंबई : मुंबईत आज मोठ्याप्

Bmc News : गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प कामामुळे गोरेगावकर त्रस्त; भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी मांडल्या जनतेच्या व्यथा

प्रकल्प कामात रस्ते सुरक्षेसह पर्यावरण आणि आरोग्याचा मुद्दा बनतो जटील मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने हाती

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या