Monday, April 27, 2026

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या विकासामुळेच देशाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने बळ मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी रविवारी व्यक्त केला. अंधेरी येथील भारतरत्नम सभागृहात आयोजित ६३ व्या 'राष्ट्रीय सागरी दिन' आणि 'मर्चंट नेव्ही सप्ताहा'च्या सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावर्षीचा सागरी सप्ताह 'सागरी भारत, प्रगतीला बळ' या संकल्पनेवर आधारित होता. या सप्ताहाचा प्रारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समारंभपूर्वक 'लॅपेल पिन' लावून करण्यात आला होता. रविवारी झालेल्या सांगता समारंभात मंत्री राणे यांनी सागरी क्षेत्राच्या राष्ट्रीय महत्त्वावर प्रकाश टाकला. "व्यापार सुलभता आणि आर्थिक वृद्धीसाठी सागरी क्षेत्र हे कणा आहे. भारताला जागतिक स्तरावर अग्रगण्य सागरी राष्ट्र बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे," असे राणे यावेळी म्हणाले.

सागरी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. नाविन्यपूर्ण प्रयोग आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्र सरकारचे माजी सचिव तथा नौवहन विभागाचे माजी महासंचालक दीपक शेट्टी उपस्थित होते. या सप्ताहादरम्यान देशभरात विविध परिषदा, रक्तदान शिबिरे आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांची सांगता या दिमाखदार सोहळ्याने झाली. या सोहळ्याला नौवहन महासंचालक श्याम जगन्नाथन, अतिरिक्त महासंचालक सुशील मानसिंग खोपडे, तसेच 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बी. के. त्यागी यांच्यासह सागरी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >