मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ८ एप्रिल २०२६ पासून सुधारित व अधिक प्रवासी-अनुकूल वेळापत्रक लागू केले आहे.या अंतर्गत मेट्रो लाईन ९ (दहिसर पूर्व – काशिगाव) आणि मेट्रो लाईन २बी (मंडाळे – डायमंड गार्डन, टप्पा १) या नवीन मार्गिका प्रवाशांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू झाली असून हार्बर लाईन परिसरालाही मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळाली आहे.
तसेच, मेट्रो लाईन २ए आणि लाईन ७ या आता स्वतंत्रपणे चालवण्यात येणार असून, लाईन ७ ही लाईन ९ सोबत एकत्रितपणे (इंटिग्रेटेड कॉरिडॉर) चालणार आहे, ज्यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा-भाईंदर (काशिगाव) दरम्यान थेट आणि अखंड प्रवास शक्य होणार आहे.
हे सुधारित वेळापत्रक प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी, प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी आणि भविष्यातील मेट्रो विस्तार लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे.
महत्वाचे बदल
•लाईन ९ व लाईन २बी ८ एप्रिलपासून सेवेत
•लाईन ७ आता काशिगावपर्यंत विस्तारित
•लाईन २ए व लाईन ७ स्वतंत्र मार्गिका
•प्रत्येक मार्गिकेवर वाढीव फेऱ्या व सुधारित वारंवारता
•सोपे व समजण्यास सुलभ वेळापत्रक
मार्गिकानुसार सेवा तपशील
अ) मेट्रो लाईन २ए (पिवळी लाईन) अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व
लाईन २ए आता स्वतंत्र मार्गिका म्हणून कार्यरत राहील.
•पहिली गाडी : सकाळी सुमारे ५:५० – ५:५५
•शेवटची गाडी: रात्री सुमारे १०:३५ – ११:००
•वारंवारता:
गर्दीच्या वेळेत: सुमारे ६ मिनिटे
इतर वेळेत: ८ ते १० मिनिटे
•एकूण फेऱ्या: आठवड्याचे दिवस – २८९, शनिवार – २३१, रविवार – २१३
या बदलामुळे मार्गिकेवरील सेवा अधिक कार्यक्षम आणि नियमित होणार आहे.
ब) मेट्रो लाईन ७ व लाईन ९ (संयुक्त कॉरिडॉर) गुंदवली ते काशिगाव
लाईन ९ सुरू झाल्यानंतर लाईन ७ आता विस्तारित स्वरूपात कार्यरत राहील.
•मार्ग लांबी: १९.७९ किमी
•पहिली गाडी: सकाळी सुमारे ५:५०
•शेवटची गाडी: रात्री सुमारे ११:००
•वारंवारता:
गर्दीच्या वेळेत: सुमारे ५:५० मिनिटे
इतर वेळेत: ८ ते १० मिनिटे
•एकूण फेऱ्या: आठवड्याचे दिवस – २७६, शनिवार – २२३, रविवार – २०५
या एकत्रित मार्गिकेमुळे अंधेरी पूर्व ते काशिगाव दरम्यान थेट प्रवास शक्य होणार असून प्रवास अधिक जलद व सोयीस्कर होईल.
क) मेट्रो लाईन २बी (टप्पा १) महाराष्ट्र नगर – मंडाळे ते देशभक्त एन. जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन, चेंबूर
लाईन २बी (टप्पा १) मुळे हार्बर लाईन परिसराला मेट्रो जोडणी मिळाली आहे.
•मार्ग लांबी: ५.३८ किमी
•पहिली गाडी : सकाळी ६:००
•शेवटची गाडी: रात्री सुमारे १०:१५ – १०:३०
•वारंवारता: सुमारे ९ मिनिटे ३० सेकंद
•एकूण फेऱ्या: २०९
हा कॉरिडॉर चेंबूर आणि आसपासच्या भागांना अखंड मेट्रो सुविधा प्रदान करतो, ज्यामुळे दैनंदिन प्रवाशांसाठी नवीन प्रवास पर्याय उपलब्ध होतात.
इंटरचेंज सुविधा
दहिसर स्थानकावरून प्रवासी लाईन २ए आणि लाईन ७/९ दरम्यान सहज बदल करू शकतात, त्यासाठी स्टेशनबाहेर जाण्याची आवश्यकता नाही.
प्रवाशांसाठी फायदे
•कमी प्रतीक्षा वेळ (६–१० मिनिटांत गाडी उपलब्ध)
•नव्या भागांना मेट्रो कनेक्टिव्हिटी
•अधिक जलद आणि थेट प्रवास
•सुलभ आणि समजण्यास सोपे वेळापत्रक
प्रवाशांना प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचा सल्ला देण्यात येतो, तसेच अधिक कार्यक्षम, एकात्मिक आणि प्रवासी-अनुकूल मेट्रो सेवेचा लाभ घेता येईल.
डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, “मेट्रो लाईन २ए व लाईन ७ यांचे स्वतंत्र संचालन, तसेच लाईन ९ आणि लाईन २बी (टप्पा १) सुरू होणे हा मुंबई मेट्रोच्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा आहे. या बदलांमुळे प्रवाशांच्या हालचाली अधिक सुलभ होतील, प्रतीक्षा वेळ कमी होईल आणि संपूर्ण नेटवर्क अधिक कार्यक्षम होईल.लाईन ७ आणि लाईन ९ यांच्या एकत्रीकरणामुळे उपनगरांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी मिळेल, तर लाईन २बीमुळे हार्बर लाईन परिसराला मेट्रो जोडणी मिळेल. या सर्व उपक्रमांमुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल.टप्प्याटप्प्याने आपण ३३७ किमी लांबीच्या एकात्मिक मेट्रो जाळ्याकडे वाटचाल करत आहोत आणि ‘मुंबई इन मिनिट्स’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत आहोत.”






