Tuesday, May 26, 2026

बाकी उठाठेव सोडून संजय राऊत यांनी स्वत:च्या पक्षात काय चालले ते पाहावे; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

बाकी उठाठेव सोडून संजय राऊत यांनी स्वत:च्या पक्षात काय चालले ते पाहावे; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई: अशोक खरात यांच्या तपासासंदर्भात अंजली दमानिया यांना मिळत असलेला तपशील मुख्यमंत्री कार्यालयातून लिक होत असल्याचा आरोप चुकीचा आहे. तशी कोणतीही माहिती मुख्यमंत्री कार्यालय देत नसते. तसा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना उद्धव आणि आदित्य काय करताहेत, त्यांची भूमिका काय आहे याची धड माहिती नसते. नसती उठाठेव करण्यापेक्षा त्यांनी आधी आपल्या पक्षात काय चालले आहे याची माहिती घ्यावी, अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना खडसावले. भाजपा प्रदेश कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अशोक खरात प्रकरणाच्या सध्या सुरु असलेल्या तपासातून कुणीतरी भाजपाच्या टार्गेटवर असल्याच्या राऊत यांच्या आरोपाबाबत बन म्हणाले की, भाजपाच्या टार्गेटवर कुणी नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नक्कीच जनतेच्या टार्गेटवर आहेत. महायुती म्हणून आम्ही एक आहोत. मात्र जनतेने टार्गेट करून तुम्हाला घरी बसवले आहे. घरच्यांना टार्गेट करायचे ही उद्धव ठाकरे आणि उबाठाची परंपरा आहे. भाजपा मित्रांना सोबत घेऊन चालतो. अंजली दमानिया यांना माहिती नेमकी कुठून मिळत आहे, याचा तपास होणार असल्याचे बन यांनी स्पष्ट केले.

ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या संजय राऊत यांच्या भाकिताबद्दल बोलताना बन यांनी सुनावले की, डिनर डिप्लोमसी हा प्रकार दिल्लीतील राजकारणात नवा नाही. संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाचे खासदार, आमदार आणि नगरसेवक कंटाळले आहेत. जेव्हा ४० आमदार सोडून गेले तेव्हा त्याचा थांगपत्ता उद्धवजींना लागला नाही, संजय राऊत यांना लागला नाही. अहंकाराची भाषा करायची, रोज उठून खोटे बोलायचे या सगळ्याला त्यांच्याच पक्षाचे लोक कंटाळले आहेत. त्यामुळे ऑपरेशन टायगर झाले तर त्याचा पत्ता संजय राऊत यांना अजिबात लागणार नाही.

अजितदादा पवार यांचे निधन हा महाराष्ट्राला बसलेला धक्का आहे. अपघाती निधनाने निवडणूक झाली की ती बिनविरोध व्हावी असा महाराष्ट्रात प्रघात असतो. आर.आर. पाटील यांचे निधन झाले तेव्हाही पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती. बारामती येथून सुनेत्राताई निवडणूक लढवणार आहेत. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा महायुतीचा प्रयत्न आहे आणि महायुतीचाच विजय होणार हे निश्चित असल्याचे ठामपणे सांगून बन म्हणाले की, काँग्रेसने महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांना न विचारता या निवडणुका लढवायची तयारी सुरु केली आहे. त्यातून आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेस आपली वेगळी चूल मांडत आहे. दुर्दैवाने काँग्रेसकडे आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्याकडे प्रगल्भता नाही. त्यातूनच ते असे वागत आहेत. मात्र त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही.

Comments
Add Comment