Sunday, April 5, 2026

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच 

मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर आता मोठा बदल होणार आहे. मागेच घाटात एक प्रोपोलिन गॅस ने भरलेला टेम्पो उलटला होता त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक झाले आणि नागरिकांना तिकडेच २ दिवस अडकून राहावे लागले. अनेक पर्यायी मार्गांचा शोध घेत नागरिकांनी आपली सुटका करून घेतली, अशी परिस्थिती पुन्हा उदभवू नये म्हणून सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. महामार्गाचे १० पदरीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) घेतला असून, यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.

प्रकल्पाला लवकरच गती

मिळालेल्या माहितीनुसार, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम येत्या पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करत पुढील ३ वर्षांत, म्हणजेच २०२९-३० पर्यंत संपूर्ण विस्तार पूर्ण करण्याचे उदिष्ठ आहे. सध्या असलेल्या मार्गावर वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणारी कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

टोल वसुलीचा कालावधी वाढणार

या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार असून, तो वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी सध्याच्या टोल वसुलीची मुदत १५ वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आता या मार्गावर टोल वसुली २०४५ ऐवजी २०६० पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

मिसिंग लिंक प्रकल्पही निर्णायक

दरम्यान, एक्सप्रेसवेवरील महत्त्वाचा १३ किमीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास घाटातील वळणे आणि अपघातप्रवण भाग टाळून प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. शिवाय मुंबई–पुणे अंतर कमी होऊन वेळेची बचत होईल.

वाहतुकीवर परिणाम टाळण्याचा प्रयत्न

विस्तारीकरणाचे काम सुरू असताना वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने काम करून प्रवाशांना कमीत कमी अडचण येईल, याची काळजी MSRDC कडून घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

एकीकडे १० पदरीकरण दुसरीकडे टोल वसुलीचा कालावधी वाढणार असला, तरी मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. भविष्यातील वाहतूक लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >