परीक्षा

कथा - रमेश तांबे


दोन विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले. जेव्हा त्यांची शाळा सोडण्याची वेळ झाली, तेव्हा गुरुजी म्हणाले, “माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज मी तुमची परीक्षा घेणार आहे. जो नापास होईल तो पुन्हा एक वर्ष शाळेत येईल.” मग गुरुजींनी त्यांना सांगितलं की आपल्या गावाबाहेरचा जो डोंगर आहे त्याच्या माथ्यावर जायचे आहे. डोंगर भर दुपारी १२ वाजता चढायला सुरुवात करायची. पण एकच अट आहे ती म्हणजे तुमच्या पाठीवर दहा किलो वजनाची पिशवी असेल!” हे एवढे सांगून गुरुजी निघून गेले.


दोघे विद्यार्थी विचार करत आपापल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी बरोबर १२ वाजता ठरलेल्या जागी दोघेही विद्यार्थी आले. एकाने रिकामी पिशवी आणली होती, तर दुसरा घरूनच दहा किलो वजनाची पिशवी घेऊन आला होता. त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंदही दिसत होता. शिवाय आत्मविश्वासही झळकत होता. दुसरा मात्र त्रासलेला होता. त्याच्या तोंडाची टकळी सारखी चालूच होती. ही कसली पद्धत परीक्षा घेण्याची! एक तर भर दुपारची उन्हाची वेळ, एवढं गरम होतंय इथे, घामाच्या धारा अंगातून वाहतायत. त्यात एवढा उंच डोंगर चढायचा, काट्याकुट्यांनी, झाडाझुडपांनी भरलेला आणि तोही पाठीवर दहा किलो वजन घेऊन! ही कसली परीक्षा? असं म्हणत त्या वैतागलेल्या विद्यार्थ्याने आजूबाजूला पडलेले दहा किलो भरतील इतके दगड-धोंडे पिशवीत भरले आणि तो त्याच्या मित्रासोबत डोंगर चढू लागला. डोंगर खूपच उंच होता. चढताना दोघेही चांगलेच घामाघूम झाले. अनेक ठिकाणी ते ठेचकाळले, कुठे घसरले, कुठे काट्याकुट्या बाजूला करत ते दोघे दोन तासांनी डोंगर माथ्यावर पोहोचले. दोघांनीही हुश्श केले अन् वेगवेगळ्या झाडाखाली जाऊन बसले. भर दुपारची वेळ होती. पाण्याविना घशाला कोरड पडली होती. त्याच्या पोटात भुकेने कावळे ओरडत होते.


मग एकाने पाठीवरची पिशवी खाली उतरवली. पिशवीतले सगळे दगड तिथेच फेकून दिले. अन् डोक्याला हात लावून भुकेलेल्या, तहानलेल्या अवस्थेत गुरुजींची वाट पाहत झाडाखाली बसून राहिला. तिकडे दुसरा विद्यार्थी पिशवीतून एक एक वस्तू बाहेर काढू लागला. चटई, चादर, उशी, पाण्याची बाटली, खाऊचा डबा आणि एक पुस्तक त्याने बाहेर काढले. मग झाडाच्या सावलीत त्याने चटई अंथरली. त्यावर चादर अंथरून झाडाच्या बुंध्याला उशी टेकून तो मस्तपैकी आरामात बसला. पाण्याची बाटली उघडून घटाघटा पाणी प्यायला. डब्यात आणलेल्या खाऊवर ताव मारला आणि पुस्तक उघडून वाचू लागला. कारण गुरुजींना यायला वेळ होता. खरं तर गुरुजी दूरवरून बघत होते. एका विद्यार्थ्याने सोबत आणलेले दहा किलो वजनाचे दगड आणि दुसऱ्या विद्यार्थ्याने सोबत आणलेल्या दहा किलो


वजनाच्या सर्व आवश्यक वस्तू!


मग गुरुजी त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले, “मित्रा मी तुम्हा दोघांनाही दहा किलो वजनाचा बोजा डोंगरावर घेऊन जाण्यास सांगितले होते. काय न्यावे हे मी तुम्हाला सांगितले नव्हते. त्याने सारासार विचार करून आपल्याला लागणाऱ्या आवश्यक वस्तू आणल्या आणि तू मात्र पुढचा कोणताही विचार न करता चक्क दगड आणलेस! समोर आलेल्या प्रसंगाला कशा पद्धतीने तोंड द्यावे, सकारात्मक विचार कसा करावा हेच तुला कळले नाही. याचा अर्थ अजूनही तुझं शिक्षण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे तू या परीक्षेत नापास झालेला आहेस. तुला पुन्हा येथेच राहून अभ्यास करावा लागेल,” असे म्हणून गुरुजी निघून गेले.


तर मित्रांनो, आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना, परीक्षांना, कसोटींना आपण कसं तोंड द्यायचं हे आपल्या स्वभाववृत्तीनुसार ठरत असतं. अन् आपले विचारच आपले स्वभाव बनवतात आणि त्याप्रमाणे आपली कृती ठरत असते. म्हणून जीवनात चांगला विचार करणे आवश्यक असते.

Comments
Add Comment

समुद्रात बेटे कशी तयार झाली?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील   मंदिरात शिवम मित्र गटाच्या ज्ञान विज्ञानाच्या गोष्टी खूपच वाढत होत्या. “मग

फक्त पुस्तकी पंडित बनू नका

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर   ज्ञान हे माणसाच्या जीवनाला दिशा देणारे सामर्थ्य आहे; परंतु केवळ पुस्तके

दिसतं ते विकतं

प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ   व्हिएतनामला एका थ्रीडी फोटो म्युझियमला भेट दिली होती. तिथे गेल्यावर अगदी

राजकन्या

कथा-रमेश तांबे   एक होती राजकन्या. राजाची एकुलती एक मुलगी! तिला ना भाऊ होता, ना बहीण! एवढ्या मोठ्या राजवाड्यात

चांगल्या वागण्यातून घडते चरित्र

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर   “माणसाच्या आयुष्यात ज्ञान, संपत्ती, पद किंवा प्रसिद्धी यांना महत्त्व

स्वातंत्र्याची किंमत...

कथा-रमेश तांबे   एक होतं माकड. अंगानं होतं राकट. एका जंगलात राहायचं, ताजी ताजी फळं खायचं. झाडावर राहायचं, झाडावरच